आपण कोण व कोठून आलों हे जाणण्याचें स्वाभाविक कुतुहल मनुष्यमात्रांत असतें. पूर्वजांचें स्मरण ठेवण्याकरिंतां कोणी श्राध्द करतो, कोणी त्यांचें नाव आपल्या वास्तूस देतो किंवा सार्वजनिक कार्यास नाव चालविण्याच्या अटीवर देणगी देऊन तें स्मरणांत राहण्याची व्यवस्था करतो. कुलवृत्तान्त-प्रकाशन हा याच वर्गांतील एक प्रयत्न आहे. आजपर्यंत महाराष्ट्रांत सुमारें पंचवीस कुलवृत्तान्त प्रसिध्द झाले आहेत व पांचसात कुलवृत्तान्तांचे काम सध्यां चालू आहे, त्यामुळें वृत्तान्ताचे कार्य लोकांच्या नजरेसमोर आलेलें आहे. लोकमान्य टिळक, डॉ. सर रघुनाथराव परांजपे, रियासतकार रावबहादूर सरदेसाई, इत्यादि निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रसिध्द व्यक्तींनीं या कार्याचे उपयुक्ततेविषयीं अनुकूल अभिप्राय व्यक्त केलेले आहेत. यामुळें कुलवृत्तान्त प्रसिध्द करण्याचें प्रयोजन काय याचा ऊहापोह करण्याचें आता कारण उरले नाही.
इ. स. 1941 त सोलापुरास भरलेल्या अखिल चित्पावन ब्राह्मण परिषदेंत केसरीचे संपादक रा. ज. स. करंदीकर यांनी पुढील प्रस्ताव मांडिला व तो सर्वांनुमतें संमत झाला; यावरून या कार्याची उपयुक्तता सर्वांस पटली आहे असे मानण्यास हरकत नाही.
"आतांपर्यंत ज्या चित्पावन घराण्यांच्या प्रमुख व्यक्तींनीं पुढाकार घेऊन आपल्या घराण्याचे कुलवृत्तान्त प्रसिध्द केले त्यांच्या त्या समाजसेवेबद्दल ही परिषद त्या व्यक्तींचें हार्दिक अभिनंदन करते. आणि इतर घराण्यांच्या पुढार्यांनां अशी सूचना करते कीं, त्यांनींही आपआपल्या घराण्यांचे कुलवृत्तान्त शक्य तितक्या लवकर प्रसिध्द करून अखिल चित्पावनांचा संकलत इतिहास समाजाला लाभेल अशी तजवीज करावी."
काळे हे उपनाव महाराष्ट्रातील चित्त्पावन ब्राम्हण पोटजातीत आहे. तसेच ब्राह्मणांच्या इतर पोटजातीत नि ब्राह्मणेतरही आहे. चित्पावनात काळे हे तीन गोत्रांचे आढळतात - वत्स, शांडिल्य व गार्ग्य. प्रस्तुत वृत्तांत वत्स गोत्र असणाऱ्या काळ्यांचा आहे. चित्तपावनात चवदा गोत्रे आहेत. गोत्रप्रवर्तक सात ऋषि असल्यामुळें ही चवदा गोत्रें पुढील सात गटांत, विभागलीं गेलीं आहेत. (1) कश्यप, (2) भरद्वाज, (3) वसिष्ठ, (4) विश्वामित्र, (5) भृगु, (6) अंगिरस, (7) अत्रि. वत्स गोत्र हे भृगु गटांतील आहे. या गटांतील दुसरें गोत्र चित्तपावनांत जामदग्न्य आहे. वत्स-गोत्रीय काळे पंचप्रवरी व त्रिप्रवरी आहेत. हे प्रवर भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व, व जामदग्न्य हे होत. तीन प्रवर असणारे काळे यांतील पहिले तीन प्रवर म्हणतात. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. पूर्वः प्रवरः उत्पादयितुः उत्तरः प्रतिग्रहीतुः प्रवरांतील पहिले ऋषि प्रवराचे उत्पादक व त्यापुढील ऋषि ती परंपरा स्विकारणारे ऋषि होत असा याचा अर्थ आहे. कांही गोत्रांत प्रवर एक असल्याचा व क्वचित् दोन असल्याचाही उल्लेख आढळतो. प्रवर चार असत नाहीत व पांचांपेक्षां अधिक असत नाहीत.
गोत्रप्रवर्तक ऋषि यांचें नाव त्यांच्या प्रवरांत असतेंच असे नाही. चवदा गोत्रांपैकीं वत्स, कपि, नित्युनंदन, बाभ्रव्य, विष्णुवृध्द या गोत्रांच्या प्रवरांत गोत्रप्रवर्तक ऋषिंचा नामनिर्देश नाही. जामदग्न्य व वत्स या दोन गोत्रांचे प्रवर एकच आहेत. सप्रवर विवाह शास्त्रनिषिध्द असल्यामुळें या दोन गोत्रांत विवाह संबंध होत नाहीत.
भृगुकुलांत या पंचप्रवरांची 92 गोत्रें व भार्गव, च्यावन, आप्नवान या त्रिप्रवरांचीं नऊ गोत्रें असून शिवाय इतर प्रवरांची अनेक गोत्रें असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो. देवरूखे व देशस्थ यांत शौनक, भार्गव, कुत्स इत्यादि भृगुकुलांतील गोत्रांचे लोक आहेत. वत्सगोत्रीय काळे आश्वलायन सूत्राचे आहेत.
भृगुंचे एकंदर पांच गण आहेत ते :-
ऋग्वेदात गोत्र शब्द अनेकदा आलेला आहे. तिथे या शब्दाचे गायीचा गोठा, गायींचा कळप, मेघ, पर्वतश्रेणी, पर्वतशिखर, किल्ला, इ. अनेक अर्थ
होतात. काही ठिकाणी गोत्र शब्दाचा समूह असा अर्थही घेतलेला दिसतो. छांदोग्योपनिषदात कुटुंब या अर्थी गोत्र शब्द आलेला आहे(4.4.1). यावरूनच त्याचा
पुढे एकाच वंशातले लोक असा अर्थ केला गेला. गो = भूमी व त्र = संरक्षक, यावरून भूमिसंरक्षक वर्ग असाही कोणी गोत्र शब्दाचा अर्थ करतात. त्यावरून आपल्या
भूमीच्या बाहेरची म्हणजे दुसऱ्या गोत्रातील मुलगी करणे किंवा पळवून आणणे, हाच पुरुषार्थ होय, अशा कल्पनेमुळे गोत्राबाहेर लग्न करण्याची प्रथाम रूढ झाली
असावी. बोधायनाने गोत्र शब्दाचा खुलासा दिला आहे, तो असा-
अर्थ - वैश्यांना वात्सप्र हा एकच प्रवर होता. बौधायनाच्या मते मात्र वैश्यांना भालंदन, वात्सप्र व मांक्तिल हे तीन प्रवर आहेत. काही गोत्रांच्या प्रवराविषयी सूत्रकारांत मतभेद आहेत. बौधायन सांगतो, की लौगाक्षी हे दिवसा वासिष्ठ आणि रात्रौ काश्यप आसतात. त्या मुळे दिवसा व रात्री त्यांचे प्रवर बदलतात. प्रवरांचा संबंध गृहकृत्यांशी जोडलेला असला, तरी मुख्यतः त्यांचा संबंध दशी व पूर्णमास या इष्टींशी येतो. सामिधेनी ऋचांचे पठण झाल्यावर होता यजमानाच्या प्रवरांचा उच्चार करत. हे प्रवर प्रपितामह, पितामह, पिता या क्रमाने उच्चारले जातात. त्यानंतर आज्याच्या आघार आहुती दिल्यावर अध्वर्यू पुन्हा एकदा यजमानाचे प्रवर व्युत्क्रमाने उच्चारतो. प्रवरांचा गृहकृत्यांशी संबंध सांगता येतो, तो पुढीलप्रमाणे - 1) वधूच्या व वराच्या पित्याचे प्रवर समान असता कामा नयेत. 2) उपनयनाच्या वेळी बटूच्या प्रवरांच्या संख्येइतक्या त्याच्या मेखलेला गाठी माराव्या. 3) चौलकर्मात शिखा ठेवताना मुलाच्या प्रवरांचा विचार करावा. प्रवरसूत्रांत वेगवेगळ्या गोत्रांच्या प्रवरांची यादी दिलेली आहे. क्षत्रिय आणि वैश्य यांच्या प्रवरांचाही त्यात उल्लेख आहे. बौधायन, आपस्तंब, सत्याषाढ (हिरण्यकेशी), मानव व कात्यायन ही प्रवरसूत्रे छापलेली आहेत. प्रवर म्हणजे त्या कुळातील पूर्वज ही कल्पना चूक असावी. प्रवर हे पिता, पुत्र व नातू यांची नामे दर्शवितात, असा समज आहे; पण तो बरोबर नाही. कुंडिन गोत्राचे प्रवर वसिष्ठ, मित्रावरुण व कुंडिन असे आहेत. यांच्या पैकी मित्रावरुण हा वसिष्ठांच्याही पूर्वकाळचा आहे, असे प्राचीन वाङ्मयातच सांगितलेले आहे. तेव्हा तो त्याचा मुलगा होऊ शकणार नाही. भारद्वाज गोत्राचे प्रवर भारद्वाज, बृहस्पती व अंगिरस हे होत. यातील बृहस्पती व अंगिरस हे पितापुत्र नसून, भाऊ-भाऊ होते, असे ऐतरेय ब्राह्मणात म्हटले आहे. एका गौतम गणात उचथ्य, वामदेव, रहूगण व बृहदुक्थ व तिसरा पुन्हा एकच म्हणजे गौतम आहे. चौघांचा पिता एकच असणे, यात काही वावगे नाही. पण चौघांचा मुलगाही एकच होता, हे म्हणणे कोणालाही पटणार नाही. यावरून गोत्र व प्रवर यांनी रक्तसंबंध दर्शविला जातो हे खरे नसल्याचे कळून येईल. प्रवर हे कुलातील पूर्वज नसून, निरनिराळ्या वैदिक शाखांचे अध्वर्यू असावे. मुलगा दत्तक गेला म्हणजे त्याच्या गोत्राबद्दल जे नियम पाळायचे असतात ते पाहिले तर प्रवर हे रक्तसंबंधांचे नसून विद्येसंबंधीचे होते, असेच दिसते.
--
गोत्र व प्रवर यांचा मुख्यत्वे लग्न ठरविताना विचार केला जातो. सगोत्र विवाह म्हणजे एकाच गोत्रील व्यक्तींचा विवाह धर्मशास्त्राने निषिद्ध मानलेला आहे. सगोत्राय दुहितरं न प्रयच्छेत् समान गोत्रातील पुरुषाला कन्या देऊ नये, असे आपस्तंब म्हणतो. सगोत्र विवाह केल्यास ती स्त्री चांडाळी व तिचा पुत्र चांडाळ होतो, असे काही स्मृतिकारांचे म्हणणे आहे. सगोत्र स्त्रीशी विवाह करणे, हे गुरुतल्पगमनाइतके वाईट कृत्य आहे, असे धर्मशास्त्रकारांचे मत आहे.
त्याचप्रमाणे असमानप्रवरैर्विवाहः = ज्या कुलांचे प्रवर समान नाहीत त्या कुलात विवाह व्हावा, असे गौतमसूत्रात म्हटले आहे.
सगोत्र विवाह का करू नये, याचे कारण ते पुढील प्रमाणे देतात-- वधू व वर या दोघांचे गोत्र एकच म्हणजे शांडिल्य असल्यास त्याचा अर्थ असा होतो, की या दोघांची कुळे सध्या कितीही दूरचीअसली, तरी शांडिल्य हा या दोघांचा एकच पूर्वज होता. आणि ज्या दोन व्यक्तींचे पूर्वज एकच आहेत, त्यांचा परस्पर लग्नसंबंध हा त्यांच्या प्रजेच्या दृष्टीने अगदी घातुक आहे.
सगोत्राप्रमाणेच आणखीही काही गोत्रांचे आपसात विवाह निषुद्ध मानलेले आहेत. जामदग्न्य व वत्स, बाभ्रव्य व कौशिक, वसिष्ठ व कौंडिन्य, इ. गोत्रांचे परस्परांशी पटत नाही. याचे कारण त्या दोन्ही गोत्रांचे सर्व प्रवर समान असतात किंवा एखादा तरी प्रवर समान असतो. आणि प्रवर याचा रूढ अर्थ गोत्रकाराचेही पूर्वज असा असल्यामुळे, जी सगोत्रांची अडचण तीच सप्रवरांचीही होते.
सगोत्र, सप्रवर व सपिंड विवाहाचा हा जो निषेध सांगितला आहे, त्याच्या मुळाशी पुढील तीन कल्पना गृहीत धरलेल्या आहेत --
1) गोत्राचे नाव रक्तसंबंधांमुळेच मिळालेले असते.
2) प्रत्येक कुलाचे जे प्रवर सांगितलेले आहेत, ते त्या कुळातील पूर्वजच होते.
3) कितीही पूर्वीच्या काळी दोन व्यक्तींचे पूर्वज एक होते असे ठरले, तर त्यांचा विवाह होणे, प्रजेच्या दृष्टीने घातुक आहे.
ऐतिहासिक आणि शास्त्रीय पद्धतीने या गृहीत गोष्टींचा विचार केला असता असे दिसून येईल, की या तीन्ही गोष्टी असिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांचा निषेध मानण्याचे कारण नाही.
वेदकाळी सगोत्र विवाहाचा निषेध नव्हता; कारण त्या काळात गोत्रे व प्रवर हीच निश्चित झालेली नव्हती. ब्राह्मण काळात प्रथमच ती निश्चित झाली.
समाज लहान असतो, तेव्हा व्यक्तीचे एकच नाव उल्लेखाला पुरेसे असते. पण समाज मोठा होऊन व्यवहार वाढला, म्हणजे निश्चितीसाठी कुलनामे देण्याची चाल पडते. अशीच परिस्थिती ब्राह्मणकाळी निर्माण होऊन गोत्रनामे प्रचारात आली. गोत्रे ही आडनावाप्रमाणेच असून आडनावाप्रमाणेच तीही निवासस्थान, धंदा, अध्ययन पध्दती, शाखा, धार्मिक मते, काही विशेष कर्तबगारी, इत्यादी वरून बनलेली असतात. गांधार, खांडव, गोदायन, सैंधव, पांचाल, इ. गोत्रनामे देशावरून पडलेली आहेत. फडणिस, जोशी,कुलकर्णी, पुणेेकर, इ. उपनामे व्यवसाय किंवा निवासस्थान यांवरून पडलेली आहेत. त्या मुळे फडणिस असे नाव असलेल्या दोन्ही कुळांत रक्तसंबंध असेल, असे आपण मानीत नाही. काही वेळा तर त्यांची जातही भिन्न असते. गोत्रांचीही हीच स्थिती आहे.
पूर्वी गोत्रे बदलता येत असत, असे शुनःशेप हा अंगिरस गणातून विश्वामित्र गणात गेला, त्या वरून कळते. भारद्वाजाचा वंशज शौनहोत्र हा भृगुकुळात गेला व त्याने शौनक हे नवीन नाव धारण केले अशीही कथा आहे.
क्षत्रिय, वैश्य वगैरे जातींतील गोत्रे ही कुलगुरूंची गोत्रे आहेत, हे कित्येक ठिकाणी स्पष्टपणें दिसून येते. तेव्हा तिथे गोत्र हे रक्तसंबंध दाखविते, असे म्हणणेच शक्य नाही.
गोत्रातील लोकांनी आपसात विवाह करू नयेत हा आजचा नियम आठ ऋषींच्या वेळी अस्तित्वात नव्हता. कारण कश्यप, वसिष्ठ व अगस्त्य हे मरीचीचे वंशज असून,काश्यप व वसिष्ठ यांमध्ये विवाह होतात. आरंभीच्या शास्त्रकारांचीही सगोत्र विवाहाकडे पाहण्याची दृष्टी सौम्य होती. सूत्रकाळी चांद्रायण
किंवा कृच्छ्र प्रायश्चित्त केले, की सगोत्र विवाहाचा दोष जात असे. मनूने सगोत्र विवाह नसावा, असे सांगितले असले, तरी तो करणाऱ्याला नुसते प्रायश्चित्तही त्याने सांगितलेले नाही. याज्ञवल्क्य, नारद, पराशर व बृहस्पती या स्मृतिकारांनी मात्र त्यांना त्याज्य वाटत नाही. यम, बृहद्यम व व्यास हे उत्तरकालीन स्मृतिकार मात्र त्या सगोत्र स्त्रीला चांडाली व तिच्या पुत्राला चांडाल असे समजतात.
गेल्या शंभर वर्षांत जीवशास्त्राच्या दृष्टीने या विषयाचा बराच अभ्यास झाला आहे. या शास्त्राचे या बाबतीतले मत पुढीलप्रमाणे आहे --
व्यक्तीमध्ये काहीं गुण असतात व काही दोषही असतात. अगदी जवळच्या रक्तात जर विवाह झाला, तर अंगी असलेले गुण प्रकर्षाने प्रगट होतात हा फायदा आहे; पण त्याबरोबर दोषही प्रबळ होतात, हा त्यातला तोटा होय. तेव्हा अगदी जवळच्या रक्त संबंधांत विवाह करू नये, हे इष्ट आहे. पण सगोत्र व सपिंड विवाहाला मुळीच हरकत नाही.
:-
"
"कुल" म्हणजे गोळा करणे, एकत्र येणे या धातूवरून कुल शब्द झाला आहे. आप्तसंबंधाने एकत्र आलेले, एका रक्ताचे व संबंधी असे जेवढे लोक असतील त्यांचे मिळून कुल बनते. मराठीत ’घराणे’ हा शब्द कुल या अर्थाने वापरला जातो. कुल म्हणजे कुटुम्ब नव्हे किंवा जात नव्हे. "जात-कुळी" हा वापरातला शब्द जात व कुळ निराळे असल्याचेच दर्शवितात. कुलीन, कुलस्त्री, कुलवधू इ. शब्दांचा मूळ अर्थ "शुद्धवंश" असाच दर्शवितात.
कुल शब्दांत संबंधी व त्यांचे राहण्याचे घर या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. कुलाला हितकारक गोश्टीचा उपभोग क्कुळतल्या प्रत्येक व्यक्तीला घेता येतो.
तसेच कुलाच्या भल्यासाठी, किर्तीसाठी कांहीं कर्तव्य, जबाबदार्याही व्यक्तीला पार पाडाव्या लागतात.
"रघुकुल रीत सदा चली आयी। प्राण जाय पर वचन न जायी ॥" अशी वचन पालनासाठीच "रामायण" घडले आहे. एका कुलांत एकाच वेळी अनेक कुटुम्बे असू शकतात. तसेच गोत्र कुलापेक्षा मोठे असल्याने एका गोत्रांत अनेक कुले असतात.
कुल शब्द भारतीयांना अतिशय प्रिय आहे. कुलाच्या प्रतिष्ठेकडे त्यांचे लक्ष असते. कुलाच्या किर्तीसाठी व्यक्ति त्रास, कष्ट सोसून सत्कर्माला प्रवृत्त होते, तसेच निंद्य कर्मापासून वाढीसाठी उपकारकच ठरतो. पूर्वी सर्वदृष्ट्या यशस्वी कुलाला ’महाकुल’ म्हणत. वेदाध्ययन केलेल्या व त्रेताग्नि उपासना करणार्या कुलाला ’श्रोत्रीय कुल’ म्हणत. "श्रोत्रीयकुलाला" समजात उच्च स्थानीं मानत.
महर्षी मनू महाराज सांगतात-
"वेदाध्ययनाने व वेदार्थज्ञानाविषयीं आकांक्षा असण्यानें दरिद्री असलेली कुलेही उत्कृष्ट कुलामध्ये गणली जातात व मोठी किर्ती प्राप्त करून घेतात.
धृतराष्ट्रानें विदुराला ’महाकुल’ कोणत्या कुलाला म्हणावे असा प्रश्न केला असतां विदुर सांगतो- "तप, इन्द्रियदमन, तत्वज्ञान, अध्यात्म, द्रव्य, यज्ञ, पुण्यविवास, व सतत अन्नदान हे सात गुण ज्यांच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वसलेले असतात त्यांना ’महाकुले’ असे म्हणतात."
याच्या उलट जे कुल वेदाध्ययनाला पारखे झाले असेल किंवा सदाचाराचा परित्याग केला असेल त्याला "अकुल" किंवा "हीनकुल" म्हणत असत.
वत्सगोत्री काळे कुल --
आत्तांपर्यंत आपण गोत्र-प्रवर व कुल या संकल्पनांचा विचार पाहिला. या संदर्भांत आता "वत्सगोत्री काळे-कुलाचा" विचार करू.
"ऋषीदर्शनात्" अशी ऋषीशब्दाची व्याख्या आहे. म्हणजे ज्यानी ध्यानावस्थेत ’मंत्र’ पाहिले, चित्तात मंत्रध्वनी प्रत्यक्ष ऎकले त्यांना "ऋषी" म्हणावे.
अशा मंत्रदृष्ट्या पहिल्या विश्वामित्र, जमदग्नि आदि 8 ॠशींच्या नावाने गोत्रे व प्रवर प्रचलीत झाले आहेत.
वत्सगोत्र हे या आठांपैकी अग्निउपासक जमदग्नि ॠषींच्या कर्म संप्रदायात गणले जाते. वत्स गोत्राचे पांच प्रवर आहेत. भार्गव, च्यवन, आप्नुवान्, और्व व जमदग्नि असे पंचप्रवरान्वित ’वत्सगोत्र’ आहे. अग्निदेवतेचे विशेषत्वाने आवाहन ज्यानी केले त्या ऋषींना ’प्रवर’ गणले जातात. पहिल्या आठ गोत्रामध्ये ज्या विशेष कर्तबगार अधिकारी व्यक्तिकालांतराने निर्माण झाल्या त्यांच्याही नावाने नवी गोत्रे प्रचलीत झाली. "वत्स गोत्र" हे अशाच रीतीने "वत्स आग्नेय" या ऋषींच्या नावाने प्रचलीत झाले आहे. हा सूक्त दृष्टा ऋषी आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील 187 क्रमांकाचे सूक्त याच्या नावावर आहे. "अग्नीस्तुती" हा या सूक्ताचा विषय आहे. या सूक्ताची देवता अग्नि आहे. "निर्मल, तेजयुक्त, राक्षससंहारक आणि कामपूरक अग्नि आमच्या शत्रूंचा नाश करतो." सारांश - वत्स गोत्री विशेषत्वाने अग्निउपासक आहेत. पंचप्रवरी म्हणजे इतर गोत्रीयांपेक्षा अधिक मात्रेने अग्निचे विशेष आवाहन करणारे ॠषी वत्सगोत्राचे आहेत. वत्सॠषी स्वत: अग्नि उपासकच आहेत. जमदग्नि ॠषींनी "चतूरात्र" नावाचा सोमायाग आपल्या कुलात कुणीही दरिद्री निपजू नये म्हणून केला होता. तो "जामदग्न चतूरात्र सोमयाग" नावाने प्रसिद्ध आहे. अशा अग्नी उपासनेचे फलस्वरूप "परशुरामासारखा" दुष्टांचे निर्दालन करून,पृथ्वी जिंकून निर्भय करणारा व तिचे विश्वजित सोमयाग करुन पृथ्वीचे, सर्वस्वाचे दान करणारा अवतारी पुरुष निर्माण झाला. परशुरामानेच अपरान्तीची म्हणजे कोंकण भूमीची समुद्र हटवून निर्मिती केली. व या अपरान्तात, कोंकणांत बाहेरून चित्पावन ब्राह्मण वैदिक, अग्नि-उपासक कुले(कुटुम्बे) आणून बसविली. त्यापैकीच वत्सगोत्री काळे कुल आहे. भगवान परशुरामानीं उत्तरेकडून ही वैदिक कुले आणून वसविली असे अनुमान करतां येते. कारण उत्तरभारतात 16 महाजनपदें होती. मगध, कोसल व वत्स ही विशेषमहत्वाची होती. वत्स प्रदेश अत्यंत समृद्ध असून तो तलम सुती वस्त्रासाठी प्रसिद्ध होता. कौशाम्बी ही त्याची राजधानी होती. यमुनेच्या तीरावर प्रयागपासून 30 मैलांवर "कोसम" नावांचे गांव आहे. तिथे ही प्राचीन नगरी होती असे संशोधकांचे मत आहे. काशीचा राजा दिवोदास याचा नातू ’वत्स’ याने आपल्या राज्याचा विस्तार करताना कौशाम्बीच्या भोवतालचा प्रदेश त्यांत समाविष्ट केला. त्यामुळे या प्रदेशाला ’वत्सभूमी’ हे नांव मिळाले. भारतीय युद्धांत काशीराजाच्या वत्सभूमितील सैन्यही पांडवांच्या बाजूने लढले. सध्याच्या "काशी" क्षेत्रातही "कालिया गली" नावाचा भाग आहे. या गल्लीत ’वत्सगोत्री काळे’ कुटुम्बे राहात. वत्स आग्नेय ॠषी व काशीचा राजा वत्स याच्या कौशाम्बी राजधानी असणार्या ’वत्स’ महाजनपदातून "वत्सगोत्री" वैदिक, अग्नि उपासक कुटुम्बे आणून भगवान परशुरामानी वसविली असे अनुमान करतां येते. अर्थांत या संबंधी पुष्कळ सखोल संशोधन करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेंच "काळे" आडनाव वत्सगोत्रीयामध्ये कसे रुढ झाले या विषयीही काही सांगता येत नाहीं. त्याचेही संशोधन होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत "वत्सगोत्री काळे कुल" हे प्राचीन कालापासून विशेषत्वाने अग्निउपासक कुल आहे हे निश्चयाने सांगता येते. त्यामुळें पुनश्च वत्सगोत्री काळे कुटुंबांना आपल्या गोत्राच्या, कुलाच्या, कुटुम्बाच्या उद्धारासाठीं, अकुलीनते पासून कुलीन, महाकुलीन, श्रोत्रीयकुलीन होण्यासाठीं वेदाध्ययन व अग्निउपासनेने अकुलीन स्थितीपासून श्रोत्रीयकुलीन स्थिती प्राप्त होवू शकते असे स्वानुभावाने सांगतां येते. भारतीय विश्वकोश, मराठी विश्वकोश, ऋग्वेद यांचे आधारे)