कुलधर्म
आणि कुलाचार
घराणें 1 लें, वाडें - पोंभुर्लें
या घराण्यांतील मंडळी म्हणतात कीं, पडेलचे काळे हे 10 दिवसांचे संबंधी व
उपळें व उन्डील येथील काळे 3 दिवसांचे संबंधी. यांच्या पोंभुर्लें
येथें 5 पिढ्या झाल्या. उपळें येथील काळे व ह्या घराण्यांतील काळे
ह्यांच्या पिढ्या सुमारे 75 वर्षांपूर्वी तोडल्या.
या घराण्याचा व वाडें (3) घराण्याचा निकटचा संबंध असावा. कारण त्या
घराण्यांतील पूर्वज व या घराण्यांतील पूर्वज ब्रह्मवर्तास होते.
तेथून दोघेही वाडे-पडेलकडे आले. वाडे शाखा (3) ही त्रिप्रवरी आहे.
आणि घराणें पंचप्रवरी आहे.
बाळंभट नारायण (3) यांच्या वंशाची माहिती मिळाली आहे. यांचे बंधु भिकाजी व
बचाजी यांचे वंशज सध्यां कोठें आहेत हें कळलें नाहीं. भिकाजी नारायण
(3), गणेश भिकाजी (4), कृष्ण भिकाजी (4), अंताजी कृष्ण (5), दिनकर बचाजी
(4) व नारायण बचाजी (4) हे यात्रेस गेले असतां यांस आपला गांव पडेल
सांगितला होता.
कुलदेवता-शंकरेश्वर आणि देवी सरस्वती. देवदिवाळीस नवेद्य पांच--- 1.
शंकरेश्वर (पडेल), 2. गांगोभराडीण (पोंभुर्लें), 3. स्थानेश्वर
(पोंभुर्लें), 4. जांभाई (पोंभुर्लें), 5. ब्रह्मदेव (पोभुर्लें).
आश्विन नवरात्रांत दीप, माळ नाहीं, सुवासिनी, ब्राह्मण नाहीं, व बोडण
नाहीं, गोंधळ नाहीं. देवघरांत घंटा वाजवावयाची नाहीं. घाग-या,
तोरड्या इत्यादि वाजते अलंकार घरीं करावयाचे नाहींत (आप्तेष्टांनीं
दिल्यास घालावयाचे ); स्त्रियांनीं काळें वस्त्र परिधान करावयाचें
नाहीं. महालक्ष्मीचें व्रत नाहीं.
घराणें 2 रें, वाडे - पडेल
हें घराणें कोंकणांतून वाडें-पडेल येथून तासगांवकडे आलें. वाडें
शाखा 1ली यांतील गोविंद (2) हे व या घराण्यांतील गोविंद (1) हे एकच
असण्याचा संभव आहे. तसें असल्यास हीं दोन घराणीं एकच मानतां येतील
परंतु वाडें घराणें तीन प्रवर सांगतात व हें घराणें पांच प्रवर सांगतात.
कुलदेवता ---श्रीकाळभैरव. हा मु. सोरटुर, ता.गदग, जिल्हा धारवाड
येथील असावा असें कृष्णाजी नारायण (8) म्हणत. मूर्ती-प्रचंड,
आजानुबाहु, आकार 10 x 5 फूट उभी आहे.
देवाचे नैवेद्य देवदिवाळीस असतात, नांवें माहीत नाहींंत. नवरात्रांत दीप,
माळ, उठती बसती सुवासिनी--ब्राह्मण भोजनास. बोडण नाहीं, गोंधळ
नाहीं. नूतन वधूवरांनीं कुलदेवतेच्या दर्शनास जाण्याची चाल आहे.
रामचंद्र दत्तात्रेय (9) नवरात्रांत नंदादीप, माळा (रोज एक
प्रमाणे 9 दिवस माळा) घालायच्या. उठती बसती सुवासिनी, ब्राह्मण
भोजन. बोडण नाहीं. गोंधळ नाहीं. नविन दांपत्यांनीं
देवास जाण्याची प्रथा आहे. महालक्ष्मीचा मुखवटा बसवणें वगैरे चाल
नाहीं. देव दिवाळीस नैवेद्य येणे प्रमाणें. 1. काळभैरव,
2. महाबळेश्वर, 3. शंकरेश्वर, 4. रवळनाथ, 5. ब्रह्मदेव
- दोन नैवेद्य, 6. महापुरुष - दोन नैवेद्य, 7. गांगो-भराडी,
8. वडची, 9. पावगी, 10. महाकाली, 11. महासरस्वती, 12. महालक्ष्मी,
13. गोग्रास, 14. स्थलाधिपती असे एकूण 16 नैवेद्य असतात
घराणे 3 रें, मुरुड - नांदिवडें
हे घराणे नांदिवडें येथून मुरूड, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथें आलें
असें म्हणतात. मुरुडास सहा पिढ्या झाल्या.
कुलस्वामी -- काळभैरव, सरस्वती. यांस व नांदिवडें येथील
चणकाय, भावकाय व रवळनाथ यांस नैवेद्य असतो. एका पानावर दोन देवतांस
म्हणजे चणकाय व भावकाय यांस नैवेद्य असतो. रवळनाथ व काळभैरव यांस
स्वतंत्र पानें असतात. याशिवाय मुरुड गांवांतील ग्रामदेवता
दुर्गादेवी व बहिरी यांसहीं नैवेद्य घालतात. शारदीय नवरात्रांत
देवावर माळ बांधितात. बोडण व गोंधळ नाहीं. महालक्ष्मीचें व्रत
असतें, परंतु घरीं पूजा करीत नाहींत. देवांत घंटा नसते. तसेंच
वाजते अलंकार घालीत नाहींत. कल्याण येथील कृष्णाजी पांडुरंग
(7) हे कालका, देवका, भावका, परशुराम या देवतांस नैवेद्य दाखवित.
हें घराणें पंचप्रवरी आहे.
घराणे 4 थे, वाडे - सांगली
हे घराणें पडेल येथून देशावर आलें. याचा मूळ पुरूष विश्वनाथ व उपळें
घराण्यांतील विश्वनाथ गणेश (5) ही एकच व्यक्ती असावी.
या घराण्यांतील मंडळींची मिळकत पडेल येथें आहे. त्याचप्रमाणें
विश्वनाथ गणेश यांच्या वंशजांचीही मिळकत पडेल येथें आहे. यावरून हा तर्क
केला आहे. तथापि निश्चित पुराव्याच्या अभावी हीं दोन्हीं घराणीं एकत्र
करून दाखविली नाहीत. हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता -- कालभैरव. देवाचा नैवेद्य (वडे घारगे) श्रावणांत तिसरे
सोमवारी घालतात. देवतांची नांवे - शंकरेश्वर, काळभैरव,
ब्रह्मन्देव, नंदी, नाट, वडची, आकारी व महापुरूष. मार्गशीर्ष शु.
प्रतिपदेस ब्रह्मन्देवाचे नांवानें एक ब्राह्मण सांगतात. आश्विन
नवरात्रांत पांच फुलांचा (झेंडूचा) घोस रोज एक बांधतात व उठती बसती
सुवासिनी व ब्राह्मण असतो. नवरात्राचें पारणें दसऱ्याला
असतें. बोडण, गोंधळ व महालक्ष्मीचें व्रत नाहीं. वाजणारे
अलंकार घालीत नाहींत. देवांत घंटा नाहीं. लग्न झाल्यावर अथवा
मूल झाल्यावर पडेल येथील शंकरेश्वरास जाण्याची चाल आहे.
घराणें 5 वें, कुरुंदवाड-वाडें-पडेल
मूळ गांव वाडें-पडेल. हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता -- श्रीसरस्वती, काळभैरव. शंकरेश्वर, अंबाबाई (कोल्हापूर),
ब्रह्मन्देव, मरगाई, वास्तुपुरुष (कुरुंदवाड). देवदिवाळीस 5
देवांना नैवेद्य दाखवितात -- 1. वास्तुपुरुष, 2. मरगाई, 3. ब्रह्मदेव, 4.
नरसोबा 5. (नांव माहीत नाहीं). नवरात्रांत अखंड दीप, माळ व उठती बसती
सुवासिनी ब्राह्मण. नूतन वधूवरांनीं कुलदेवतेच्या दर्शनास
जाणें. नवीन मूल झाल्यावर कागवाडच्या देवीच्या पायावर
घालण्याचा परिपाठ आहे. घरांतील देवांत घंटा आहे, परंतु ती
वाजवावयाची नाहीं. घरांतील मुलांना घाग-या, तोरडया, घुंगुर इत्यादि
वाजणारे अलंकार करावयाचे नाहींत. आप्तेष्टांनीं दिल्यास
घालावयाचे. महालक्ष्मींचें (आश्विन शु. 8) व्रत अलीकडे नाहीं.
अशी आख्यायिका आहे कीं, एकदां उकडीचा मुखवटा असलेली गौर बसविली असतां
वाघीण येऊन, देवीचा मुखवटा तोंडांत धरून ती रानांत (कोणालाही उपद्रव न
करतां ) निघून गेली. पुढें दृष्टांत झाला (स्वप्नांत येऊन देवीनें
सांगितलें) कीं, तुम्हीं या पुढें मला घरांत बसवूं नका, दुसरीकडे जाऊन
माझें दर्शन घ्या.
शंकर दिगंबर (7) कुरुंदवाड - हे देवाचे दिवाळीस पुढील नैवेद्य
दाखवित -- सरस्वती--कालभैरव, 5 वडे, 5 घारगे. शंकरेश्वर- 5वडे,
5घारगे. ब्रह्म- 2वडे, 2घारगे. वाढी -2वडे, 2घारगे.
मरगाई- 1वडा, 1घारगा.
याशिवाय कोंकणचे श्रीरामेश्वर, श्रीकामेश्वर, श्रीविश्वेश्वर,
श्रीवाडेश्वर (गुहागर) (हे बाहेर जाण्याचे 4). श्रीआई (गुहागर),
श्रीगणपति, श्रीप्रवळनाथ, श्रीपाथरदेव, श्रीमहालक्ष्मी, श्रीमारुति,
श्रीमहापुरुष हे 7 व (गणेशवाडी) श्रीगणपति, श्रीकृष्णाबाई (नदींत),
लक्ष्मेश्वर (नदींत), वाढी ग्रामदेव (परड्यांत) असे 4. एकूण 15.
घराणें 6 वें, पावस-गुहागर
हे पावसहून गुहागर येथें सुमारें 260 वर्षांपूर्वीं आले. हे
पंचप्रवरी होते. हें घराणें व पावस (वाडें) हें घराणें एक असावें.
कुलदेवता -- कुलस्वामी --कुर्चुक लक्ष्मीनारायण (गुहागर) व पावसची
देवी. देवाचे नैवेद्य देवदिवाळीस असत. आश्विन नवरात्रांत दीप,
माळ, शेवटचे दिवशी सुवासिनीस भोजन. नवरात्रांत बोडण होते.
देवांत घंटा नव्हती. लहान मुलांचे अंगावर वाजते अलंकार (वाळे
इत्यादि) घालावयाचे नव्हते.
घराणें 7 वें, उपळें
या घराण्याचें मूळ गांव जयगडजवळील नांदिवडें होय. तेथून यांतील
मंडळी रत्नागिरी तालुक्यांतील गोळप येथें, नंतर देवगड तालुक्यांतील पडेल
येथें गेली. पडेलहून सहा भाऊ उपळें (ता.राजापूर) येथें रहावयास
गेले. त्यांस कारीकर, पांगरीकर, सुभेदार, चिटणीस इत्यादि नांवें
त्यांच्या हुद्यांवरून पडलीं. काहीं मंडळी उंडील येथें गेली.
हळुहळू यांतील मंडळी देशावर येऊन कोल्हापूर, पुणें, ग्वाल्हेर, उमरावती,
औरंगाबाद, वसई, बेळगांव, मुंबई, विदर्भ इत्यादि ठिकाणीं वास्तव्य करूं
लागली. सदाशिव बाबाजी (8) यांचे पूर्वज पेशवाईंत चिटणीस होते.
त्याकरितां त्यांस सरकारांतून 600 रु. चें वर्षासन होतें असें
म्हणतात. हें घराणें पंचप्रवरी आहे.
उपळें हा गांव राजापुरापासून 24 कि.मी. आहे. पूर्वीं मुंबईहून
निघणा-या बोटींनें विजयदुर्गास उतरून खाडींतील बोटींनें गेलें असतां उपळें
बंदर लागे. सध्या बोटींचा प्रवास बंद असल्यामुळें बंदरे अस्तित्वात
नाहींत. या गांवाची लोकसंख्या 1200 आहे. देवस्थान
श्रीमहालक्ष्मी. शिवाय बापट यांचें गणेश्वर मंदिर व काळे यांचें
दत्तमंदिर आहे. येथें चित्तपावनांचीं 9 घरें (काळे 8 व
मराठे 1 ) होतीं सध्या 3 काळ्यांची व 1 मराठे यांचे घर अस्तित्वात
आहे. शाण्डिल्यगोत्री काळ्यांचेंही एक घर सध्यां येथें आहे.
क-हाडे पेंढारकर, आंबर्डेकर व अमृते यांचीं घरें होती पैकीं आंबर्डेकर
यांचे घर आहे.
उंडील हा गांव देवगड तालुक्यांत देवगडपासून 35 किलोमीटर आहे.
खारेपाटणपासून 8 किलोमीटर आहे. तसेच खारेपाटण पासून वारगाव
दस्तुरी मार्गे 10 कि.मी. अंतर आहे.
कुलदेवता -- महासरस्वती.
ग्रामदेवता -- उपळें येथील महालक्ष्मी, ब्रह्मदेव, कालका, पाहुणाई,
भावकाई, पडेल येथील शंकरेश्वर.
उपळें येथील ग्रामदेवतांस देवदिवाळीस अथवा कार्यप्रसंगीं नैवेद्य
घालतात. उपळें येथील मंडळी लग्नकार्यांत पडेलच्या शंकरेश्वरास नारळ
ठेवितात. आश्विन नवरात्रांत रोज देव्हाऱ्यावर पांच फुलांचा गोंडा,
देवास नैवेद्य दाखविल्यावर बांधितात. दस-याचे दिवशीं
रोजच्याप्रमाणें गोंडा बांधून सर्व गोंडे देव्हा-यावर उलटून
टाकतात. दस-यास एक ब्राह्मण व सुवासिनी यांस भोजन घालतात.
बोडण नाहीं. परंतु वर्षांतून एकदां पाच सुवासिनी व एक कुमारिका यांस
भोजन देऊन दक्षिणा देतात. केशव महादेव (10) बेळगांव- हे उपळ्याखेरीज
वाडे-पडेल येथील पुढील देवता सांगत -- शंकरेश्वर, आकारी, विठोबा, रवळनाथ,
भावकाई. नूतन वधूवरांनीं कुलदेवतेच्या दर्शनास जाण्याची चाल आहे
असें सांगत. यांचे बंधू वासुदेव महादेव (10) मुंबई - हे उंडील
गांवांतील देवी निनुबाई, महादेव, भराडीण या देवतांसही देवदिवाळीस नैवेद्य
घालीत. देवांत घंटा ठेवीत नाहींत.
बोडण नाहीं असें वर म्हटलें परंतु बोडणास लागणाऱ्या वस्तू साध्य असल्यास
तें पूर्वीं भरीत असत असें समजते. लागणाऱ्या वस्तूंमध्यें 12 कावडी
दही, दूध व विटाळ गेलेल्या व सर्व मुलें हयात असलेल्या अशा पांच सुवासिनी
चित्पावनांतील असाव्या लागत. त्या मिळेनांत म्हणून बोडण भरीत
नाहींत. महालक्ष्मी सुद्धां पूर्वीं करीत असत. परंतु एक वेळ
मुखवटा वाघानें नेला. तेव्हांपासून महालक्ष्मी करण्याची चाल मोडली
अशी दंतकथा सांगतात.
पुरुषोत्तम विश्वनाथ (9) (उंडील) - देवस्थान रामेश्वर, नेनुबाई देवी.
दत्तात्रेय गणेश (11) (उमरावती) - हे कुलदेवता महालक्ष्मी सांगत.
केशव रामचंद्र (10) -- यांच्याकडे मंगलकार्यानंतर बोडण असे. त्यास
तीन सुवासिनी व एक कुमारिका असे. परंतु बोडण कालवीत नसत.
नीळकंठ विष्णु (10) (कोल्हापूर) - हे पुढील कुलदेवता सांगत - सरस्वती
(कोंकण), अंबाबाई (कोल्हापूर), काळभैरव(कोंकण). पुढील देवतांस
देवाचे दिवाळीस नैवेद्य असत असें सांगत - पडेलचा शंकरेश्वर, करसिंग्याचा
ब्रह्मन्देव, वडचीदेवी, भावकाईदेवी, निरवंशीक, हेडेश्वर, गणेश्वर,
पावणाईदेवी, महादेव, कालकाई देवी व महालक्ष्मी.
गणेश गंगाधर (10) वसई - यांच्या कुलदेवता - महासरस्वती व काळभैरव.
नवरात्रांत नुसती माळ असे.
हरी चिमणाजी (9) कोल्हापूर - कुलदेवता श्रीकाळभैरव. घंटा, झांज,
पायांतील वाळे इत्यादि वाजणा-या वस्तू कुलांत वापरण्याचा व्यवहार नाहीं.
गोविंद रामचंद्र (10) (पुणें) - कुलदेवता - शंकरेश्वर, महालक्ष्मी,
काळकाई, पावणाई, ब्रह्मदेव.
गोपाळ विनायक (8) (पडेल) -- कुलदेवता श्री काळभैरवी देवी.
देवदिवाळीचे नैवेद्य नाहींत. महालक्ष्मींचें व्रत नाहीं.
देवपूजेंत घंटा नाहीं. श्रावणांत एका सोमवारीं पडेलचे
शंकरेश्वर, आकारी व लक्ष्मीनारायण यांस नैवेद्य असत. मार्गशीर्षांत
ब्रह्मदेव (पडेल) व महापुरुष यांस नैवेद्य असे.
श्रीधर गोविंद (9) (शिवपुरी) - कुलदेवता हेडेश्वर (उपळ्यास हेडोबाचे
बाटल्यात), बसवेश्वर (नेरलीचा), काळके पावणे, गांगो ब्रह्मदेव,
महालक्ष्मी, महापुरुष, शंकरेश्वर. आश्विनांतील महालक्ष्मीची घागर
फुंकत घुमण्याची पूजा घरीं करीत नसत. परंतु दर्शनास अवश्य
जात. पूजेच्या उपकरणांत घंटा नसे. कारण असें सांगतात कीं, एका
महालक्ष्मींचे वेळीं प्राचीनकाळीं देवी अंगांत आली. तिचें सत्त्व
पाहण्यांस तूं खरी कशी तें दाखीव, वाघ येथें आण पाहूं, तें तुझें वाहन
आहे; म्हणून एकीनें हडसून विचारलें. देवी खरी होती, वाघ आला व मुली
खाऊन गेला. तेव्हांपासून देवांच्या आवाहनार्थ घंटा वर्ज्य करण्यांत
आली आहे.
गणेश हरी (9) पणुंबरें -- कुलदेवता - काळभैरव व जोगेश्वरी.
देवदिवाळीस या देवतांसच नैवेद्य असत. आश्विन महिन्यांतील नवरात्रांत
9 दिवस अखंड दीप, माळ. नूतन वधूवरांनीं देवदर्शनास ज्योतिबाचे
डोंगरास नि कोल्हापुरास जाण्याची चाल होती. ही चाल देशावर आल्यावर
पडली असावी. यांचे भाऊबंद श्रीपाद वामन (9) पणुंबरें - कुलदेवता
महालक्ष्मी (उपळें) सांगत. काळभैरव, महालक्ष्मी, महाकाली, हेडेश्वर
व राखणदेव या देवतांस नैवेद्य दाखवीत.
प्रकाश पांडुरंग (12) उपळें-- कुलस्वामी काळभैरव व महासरस्वती असल्याचे
सांगतात. देवदिवाळीस कुलस्वामी व कुलस्वामिनीस तसेच ग्रामदेवता
-उपळें येथील महालक्ष्मी, ब्रह्मदेव, कालका, पाहुणाई, भावकाई व पडेल येथील
शंकरेश्वर यांस नैवेद्य असतात. बोडण भरीत नाहींत. काळें
अंगावर घालीत नाहींत. देवांत घंटा नाहीं. नवरात्र नाहीं, असे सांगतात.
घराणें 8 वें, नांदिवडें
या घराण्याचें मूळ गांव जयगडजवळील नांदिवडें होय. नंतर मिरज,
तासगांव, सातारा, पुणे, ठाणें, मुंबई आणि विदर्भ येथें यांची वस्ती झाली
आहे. हें घराणें त्रिप्रवरी आहे.
पूर्वीं या घराण्यांतील कोणी पूर्वजानें ज्योतिषाचा मुहूर्त
सांगितल्यामुळें या घराण्यांस तासगांव कचेरींतून प्रतिवर्षीं 100 रुपये
मिळत. या घराण्यास वसगडें, ता. तासगांव येथें जमीन इनाम आहे.
ती रघुनाथभट हरभट (2) यांस मिळाली होती.
कुलदेवता - काळभैरव(काशी) नि सरस्वती (नांदिवडें). देवदिवाळीस या
दोन देवतांबरोवर 1. चंडकाई, 2. भावकाई, 3. रवळनाथ, 4.
कह्राटेश्वर यांस नैवेद्य दाखवितात. शारदीय नवरात्रांत दीप व माळ
नाहीं. पहिल्या दिवशीं कुरडू, झेंडू, व आंब्याचा टहाळा
बांधितात. बोडण, गोंधळ नाहीं. महालक्ष्मीची पूजा करीत
नाहींत. देवांत घंटा नाहीं व वाजते दागिने अंगावर घालीत नाहींत.
रघुनाथ हरी (2) यांच्या वंशांतील कांहीं मंडळी कुलदेवता काळभैरवन सांगतां
कह्राटेश्वर सांगतात. ही मंडळी देशावर आल्यावर नांदिवडें येथील
कह्राटेश्वरास कुलदेवता मानूं लाागली असावीत. तसेंच नैवेद्याच्या
देवतांत देशावरील कांहीं देवता, उदाहरणार्थ 1. नरसोबा (मलकापूर), 2.
महालक्ष्मी (कोल्हापूर), 3. कपिलेश्वर (कोल्हापूर), 4. भवानी (तुळजापूर)
यांचा यांनीं समावेश केला आहे. नवरात्रांत दीप व माळ असून ब्राह्मण,
सुवासिनी, कुमारिका यांस भोजन असतें.
दत्तात्रेय(नरहर) आबाजी (6) ठाणें, हे पुढील माहिती देतात-देवदिवाळीस
नैवेद्य एका पानावर दोन व एका पानावर एक असे घालतात. प्रत्येक
नैवेद्यावर विडा, पान, सुपारी व दक्षिणा इत्यादी ठेवून हे सर्व नैवेद्य
गुरव अथवा त्या सारख्या कोणातरी इसमांस देण्याची वहिवाट आहे. आश्विन
महिन्यांत (नवरात्रांत) कोल्हापूर येथील श्रीअंबाबाईदेवीच्या नांवानें
केवळ पहिल्या व शेवटच्या दिवशीं फुलांची माळ वाहण्याची असते. घरांत
मंगलकार्य, मौंजीबंधन अथवा विवाह घडल्यानंतर श्रीसत्यनारायणाची पूजा
करण्याची असते. वधूवरांनीं श्रीकुलदेवतेच्या दर्शनास (नांदिवडें
येथील श्रीकह्राटेश्वराच्या) अवश्य जाण्याचें आहे. वर्षांतून दोन
वेळां - कार्तिक कृष्ण पक्षांत श्रीकाळभैरव-जयंतीनिमित्त व माघ वद्यांत
महाशिवरात्रीनिमित्त-कुलस्वामी श्रीकह्राटेश्वर यांच्या नांवानें
श्रीशंकारावर रुद्राभिषेक (एकादशणी) स्वतः अथवा ब्राह्मणाकडून करावयाची
असते.
या घराण्यांतील मूळ पुरुष हरी व नांदिवडें-पालशेत घराण्यांतील हरी गंगाधर
(2) या दोन्ही व्यक्ति एकच असाव्यात, कारण दोन्ही घराणीं मूळ नांदिवडे
येथील आहेत. निश्चित पुराव्याच्या अभावीं जोडलीं नाहींत.
कह्राटेश्वर देवस्थान नांदिवडें गांवापासून मैलाच्या आंत समुद्रकांठीं
उंचावर असून फार जागृत, निसर्ग रम्य नि प्रेक्षणीय आहे. शिवाय तेथें
नैसर्गिक गोडें पाणी गोमुखांतून एक इंच नळींतून येईल इतकें सतत वाहत
असतें. आसपास खारा समुद्र असून तेथेंच सतत गोडें पाणी असणें हें
याचें स्थानमाहात्म्यच आहे.
घराणें 9 वें, कोर्ले
हे घराणें मूळचें आडिव-याचें असून तेथून धाऊलवल्ली, ता. राजापूर आणि नंतर
कोर्ले, ता. देवगड येथें गेलें. कोर्ल्यास यांच्या दहांपेक्षां अधिक
पिढ्या झाल्या आहेत. या घराण्याची एक शाखा कोंकण सोडून कर्नाटकांत
करजगी, ता. अक्कूर येथें गेली. सध्या काहीं मंडळी मुंबई, पुणें,
सांगली वगैरे ठिकाणींे स्थाईक झाली आहे. हे घराणें पंचप्रवरी
आहे.
कुलस्वामी - काळभैरव. देवदिवाळीस पुढील देवांस नैवेद्य असतात -
धाउलवल्लीचे (1) नवलाई. (2) विश्वेश्वर. (3)
ब्रह्मदेव. (4) गणपति. कोर्ले येथील (1)
ब्रह्मदेव. (2) जुगाई. (3) गणपती. (4) रामेश्वर.
(5) सूर्यनारायण. (6) जैनदेव. ब्रह्मदेव हे स्वयंभू
प्रेक्षणीय स्थान आहे. नवरात्रांत काहीं आचार नाहींत. कार्तिक
वद्य 8 ला काळभैरवजयंती करितात. त्या दिवशीं उपोषण करून दुस-या
दिवशीं वड्यांचा नैवेद्य करतात. पांच ब्राह्मण व एक सुवासिनी भोजनास
सांगतात. देवांत घंटा नाहीं व वाजणारे अलंकार घालीत नाहींत.
अंगावर काळें घालत नाहींत.
विश्वनाथ महादेव (3) यांच्या वंशजांकडे देवदिवाळीस नैवेद्य नसतात.
ते काळाष्टमीस नैवेद्य घालतात. या घराण्यांतील पिढी 1 व 2 मधील
नारायण व अनंत हीं नांवें आडिवरें-गांवखडी या घराण्यांतील पिढी 1 व 2 या
नांवाशीं जुळतात. दोन्ही घराणीं मूळचीं आडिव-याचीं आहेत.
यावरून हीं एकच असावीं.
घराणें 10 वें, कोर्ले-सांगली
हे घराणें कोर्ल्याहून सांगली, पुणें, शिरहट्टी, तेरदाळ, शहापूर, पुणें,
मुंबई या भागांत आले. हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता - गणेश पांडुरंग (5) पुणें, श्री काळभैरव, काशीविश्वेश्वर.
नैवेद्य देवदिवाळीस व श्रीकाळभैरवजयंतीस (कार्तिक वद्य 8). आश्विन
महिन्यांत नवरात्रांत अखंड दीप व पूजेच्या वेळीं पांच फुलांचा गोंडा
बांधणें. श्रीकाळभैरवजयंतीस सर्व लहानथोरांस उपास. लघुरुद्र
अथवा एकादशणी. दुस-या दिवशीं ब्राह्मणभोजन शक्त्यनुसार.
नैवेद्यास नारळाचा रस व वडे आवश्यक. बोडण, गोधळ नाहीं.
स्त्रियांनीं काळें वस्त्र नेसावयाचें नाहीं. मुलांच्या अंगावर
वाजणारे अलंकार घालावयाचे नाहींत.
कृष्णाजी विनायक (5) यांच्याकडे नवरात्रांत अखंड दीप, माळ
नाहीं. ब्राह्मण-सुवासिनी नाहीं. देवांत घंटा नाहीं.
महालक्ष्मीचें व्रत नाहीं.
घराणे 11 वे, आडिवरे-गंावखडी
या घराण्याचे मूळ गांव आडिवरे. तेथुन ही मंडळी गांवखडी येथे गेली
असावी. गांवखडी हें गंाव राजापुरापासुन सुमारे 40 कि.मी. असुन
जैतापुरापासुन 20 कि.मी. व रत्नागिरी पासून सुमारे 35 कि.मी. आहे.
लोकसंख्या 2800. गंावाच्या 11 वाड्या आहेत. वाडीकोंड येथे
यांचे वास्तव्य आहे. गंावातील देवस्थाने -- रामेश्वर, जुगाई, जाखाई,
मानाई व सोमेश्वर. या गावात ब्राम्हणांची 15 घरे आहेत. काळे,
गोरे, शिधये, फडके, साठे, पराजंपे, रानडे, बर्वे, गोगटे, केळकर, जोग
इत्यादि.
हे घराणे पंचप्रवरी आहे. कोर्ले घराण्यात पिढी 1 व 2 मधील नारायण व
अनंत हीं नावंे या घराण्यातील पिढी 1 व 2 या नावांशी जुळतात. दोन्ही
घराणी मुळची आडिव-याची आहेत. यावरुन ही एकच असावीत.
कुलदेवता -- काळभैरव-सरस्वती. देवदिवाळीस पुढील देवतांस नैवेद्य
दाखवितात. 1. काळभैरव- सरस्वती, 2. जुगादेवी, 3. जाखादेवी, 4.
मानमोडी, 5. सोमेश्वर, 6. रामेश्वर, 7. घरचे देव, 8. गोग्रास, 9.
वास्तुपुरूष. यातील 2 ते 6 गांवखडी येथील आहेत. आश्विन
नवरात्रांत अखंड दीप नाही. केवळ घोसा बांधितात. एक दिवस
सुहासिनी ब्राह्मण सांगतात. बोडण व गोंधळ नाही. पुजेत घंटा
नाही. वाजते अलंकार मुलांना घालीत नाहींत.
घराणें 12 वें, आडिवरें - कल्याण
या घराण्याचें मूळचें गांव आडिवरें. हे पंचप्रवरी आहेत.
कुलस्वामी काळभैरव. देवदिवाळीस नैवेद्यास वडे व नारळाचा रस
असतो. पुढील देवतांस नैवेेद्य असतात. पहिला नैवेद्य कुलस्वामी
काळभैरव, नंतर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, रवळनाथ, सत्तेश्वर,
बाळेश्वर (हा नैवेेद्य एका पानावर दोन ठिकाणीं घालणें), नगरेश्वर, भगवती व
महापुरुष. ठिकाणांतील भुतासही नैवेद्य घालतात. या नैवेेद्यावर
पहिला तळलेला वडा घालतात व पश्चिम बाजूस नेऊन ठेवतात. वाघेरीस
आल्यानंतर तेथील देवतांसही नैवेद्य घालण्याची चाल पडली आहे. ते
नैवेद्य पुढीलप्रमाणें :- सिध्दनाथ, भवानीशंकर, मारुती, नरसिंह,
अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, तेल्याचे परसांतील नरसिंह व कदमाचे परसांतील
भूत. एकूण आठ.
शारदीय नवरात्रांत देवस्थापना, अखंड दीप. उठती बसती सुवासिनी व
ब्राह्मण असतो. प्रतिदिनीं देवावर फुलांचा घोसा बांधितात.
नवरात्रांतील रविवारीं सुवासिनींस बोलावून हळदीकुंकू देतात.
क्षेत्रोपाध्यायांकडून मिळालेल्या माहितीवरून यात्रेस गेलेल्या मंडळींची
वंशावळ खाली उजवे बाजूस दिली आहे. तींतील नांवें या घराण्यांतील
पिढी 1, 2 व 3 यांतील नांवांसारखीं आहेत. जास्त संशोधनाअंतीं या
वंशावळी एक होण्याचा संभव आहे.
घराणें 13 वें, इचलकरंजी
यांचें कोंकणांतील मूळ गांव कोर्ले - धालवल असावें. परंतु निश्चित
नाहीं. हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता -- काळभैरव. देवी चोरीला गेल्यामुळें देवीचें नवरात्र
नाहीं. स्त्रिया काळें वस्त्र नेसत नाहींत. मुलांच्या पायांत
वाळे अथवा बैलांच्या गळ्यांत घुंगरू इत्यादि वाजणा-या वस्तु घालीत
नाहींत. देवांत घंटा नाहीं. महालक्ष्मीची पूजा व बोडण नाहीं.
घराणें 14 वें, श्रीवर्धन
ह्या घराण्याचें मूळ गांव श्रीवर्धन असावें असें म्हणतात. तेथून हे
सावनूर येथें गेले असावे. नंतर मुंबई, पुणें व सांगली कडे गेले.
कोर्ले घराण्यांतील पिढी 3, 4 व 5 मधील नांवें या घराण्यांतील पिढी
अनुक्रमें 1, 2 व 3 शीं जमतात. त्यावरून हीं मूळची एक असावीं.
भुजंगराव दत्तोपंत (5) हुबळी, यांच्या कुलदेवता -- जोगेश्वरी
- काळभैरव. देवदिवाळीस सुमारें 10 नैवेद्य असल्याचे सांगत.
आश्विन नवरात्रांत दिवा, माळ होती. सुवासिनी भोजनास असल्याचे
सांगत. लग्नकार्य झाल्यावर बोडण असतें.
काशिनाथ लक्ष्मण (5) मिरज, हे कुलदेवता एकवीरा सांगत.
घराणें 15 वें, नरेगल
घराणें पंचप्रवरी आहे. यांचे मूळ गांव धालवल (धाऊलवल्ली) तेथून
पुणें व नंतर डंबळ, निरलगी, मुंबई, पुणें इत्यादी गांवीं ही मंडळी
गेली. निरलगी हा गांव धारवाड जिल्ह्यांतील गदगपासून नऊ मैलांवर आहे.
लोकसंख्या 700. देवस्थान कलमेश्वर. याचें देऊळ काळे
घराण्यांतील पुरुषानें बाधिलें आहे. येथें काळे यांचें एकच
ब्राह्मणाचें घर होते. नरेगल हा गांव ता. रोण, जि. धारवाड यांत
गदगपासून 16 मैलांवर आहे. लोकसंख्या 6000. ब्राह्मणांची घरें
40. कोंकणस्थांचीं घरें 3 व तीं काळ्यांचींच आहेत. डंबळच्या
देसायांकडून यांस इनाम जमीन मिळालेली आहे. सन 1864 मध्यें
मिळालेल्या सनदेवरुन 351 एकर 12 गुंठे एवढी जमीन या घराण्याकडे इनाम
आहे. दोन रेकार्ड कारकून यांच्या कामगिरीबद्दल शेतसारा न देतां ही
इनाम होती. इनाम कमिटीनें या दोन इसमांची नोकरी बंद करून त्याबद्दल
दरसाल 82 रु. 5 आणे द्यावे असा करार केला होता.
या घराण्याची कुलदेवता काळभैरवआहे.
नागेश व्यंकटेश (7) गदग -- यांजकडे देवदिवाळीचे नैवेद्य नसत.
आश्विन महिन्यांत देवीचें नवरात्र नव्हते. पण गिरीचा व्यंकोबा
(तिरुपतीचा व्यंकोबा) याचें नवरात्र पाळत. दीप, माळ, पाठ
(व्यंकटेशस्तोत्राचा), नऊ दिवस ब्राह्मण, सुवासिनी, कुमारिका, प्रत्येक
दिवशीं निराळा नैवेद्य असतो. बोडण, गोधळ नाहीं.
काशीनाथ आण्णाजी (7) कोप्पळ -- यांजकडे आश्विन महिन्यांत
काळभैरवाचें नवरात्र असे. दहा दिवस अखंड दिवा असायचा. माळ,
पाठ नहीं. ब्राह्मण, सुवासिनी, कुमारिका, यांस दहा दिवस भोजन.
नवमीच्या दिवशीं काळभैरवाचा पत्रा भरून पूजा करीत. नूतन वधूवरांनीं
कोल्हापूरच्या महालक्ष्मीस जाण्याची चाल होती (सवडीप्रमाणें जातात).
धोंडो रामचंद्र (7) बंगलोर -- यांजकडे विजयादशमीच्या दिवशीं
श्रीकाळभैरवास परडी भरून नैवेद्य आणि कार्तिक शु. प्रतिपदेच्या दिवशीं
नरेगलच्या कलमेश्वरास व काळभैरवास नैवेद्य असत.
श्रीदत्तात्रेय-गुरुप्रतिपदेस अभिषेक व नैवेद्य - दत्तजयंतीस व
गुरुद्वादशीस नैवेद्य. श्रावण मासांतील प्रत्येक सोमवारीं
श्रीदत्तास लघुरुद्राभिषेक व नैवेद्य. आश्विन नवरात्रांत तेलाचे व
तुपाचे अखंड दीप. पहिल्या व शेवटच्या दिवशीं ब्राह्मण-सुवासिनीस
भोजन (बोडण भरावयाचें नाहीं). विशिष्ट आचार -- कार्तिकमासामध्यें
नरेगल येथील श्रीदत्ताच्या देवळांत कार्तिक लावणें व नरेगल येथील
श्रीकलमेश्वराच्या देवळांत कार्तिक मासांतील एक दिवस कार्तिक
लावणें. श्रावण मासांत सुगडाची गौर पुजणे. प्रत्येक शुक्रवारी
नैवेद्य व सुवासिनीस भोजन.
आण्णाराव गोविंद (7) कदडी, यांजकडील आचार पुढीलप्रमाणें --
आश्विनांत शारदीय नवरात्र-प्रयुक्त काळभैरवदेवताप्रित्यर्थ प्रतिपदेपासून
नवमी पर्यंत अखंड दीप (एक तेलाचा व एक तुपाचा) प्रज्वलन, एककाळ पूजा,
विजया दशमीच्या दिवशीं काळभैरवासहीत पूर्ण पात्राची पूजा व नैवेद्य,
माळ. प्रतिपदा व दसरा या दिवशीं, ब्राह्मण-सुवासिनी यांस
भोजन. माळ विसर्जन करून नारळ फोडणें व नवरात्रांत यजमानिणीनें फराळ
करणें. श्रावणांत पहिल्या शुक्रवारीं एका गाडग्यावर गौर लहून त्यांत
तांदुळ, गहूं, जोंधळे, हळकुंड, पैसा, सुपारी घालून गाडगें भरून गौर
स्थापून पुढें दर शुक्रवारीं पूजा करून पहिल्या शुक्रवारी भोजनाला
बोलाविलेल्या सुवासिनीला भोजन घालणें. नि गौर भाद्रपदांत ज्येष्ठा
गौरीबरोबर विसर्जन करणें. भाद्रपदांत एका गाडग्यावर गौर लहून त्यांत
गहूं, तांदूळ, हळकुंड, पैसा, सुपारी व सुताचे दोरे गौरीचे नांवें एक सोळा
पदरी, यजमानाचे नांवें एक सोळापदरी, प्रत्येक मुलाचे 8 पदरी, प्रत्येक
कुमारिकेचे 5 पदरी व दासीचे 7 पदरी याप्रमाणें गाडग्यांत भरून गौर स्थापन
करणें. तिच्यापुढें पाण्याजवळचें शुध्द जागेंतील 5 खडे आणून ठेवून,
श्रावणांतील सुवासिनीस भोजन, खीर व दहींभाताचा नैवेद्य करून
विसर्जन. अनुराधा नक्षत्रावर स्थापना, ज्येष्ठावर पूजा व सुवासिनीस
भोजन, मूळ नक्षत्रावर विसर्जन करून गौरीची कथा ऐकून गाडग्यांतले
दोरक काढून दोरकांना जितके पदर असतील तितक्या गांठी घालून यजमानिणीनें
धारण करणें. प्रत्येक दोरकांतल्या एका गाठींत कांबळ्याची दशी व
थोडें रेशीम घालणें. सदरील दोरे दस-याच्या दिवशीं दुधातुपांत भिजवून
तुळशींत पुरणे.
दामोदर मोरेश्वर (8) गदग -- यांजकडे पुढें दिलेल्या कोंकणचे देवांस
नैवेद्य घालत. यावरून कोंकणांतील देवांची स्मृती यांजकडे मात्र कायम
दिसते. (1) जाखाई, (2) जोखाई, (3) नवलाई, (4)
ब्रह्मन्देव, (5) म्हसोबा. आश्विनांत काळभैरवाचें नवरात्र
असे. अखंड दीप, माळ, नित्य सुवासिनी-ब्राह्मण यांस भोजन.
गोंधळ व बोडण नाहीं. महालक्ष्मीचें व्रत करीत.
घराणें 16 वें, धाउलवल्ली
हे घराणें पंचप्रवरी आहे. धाउलवल्ली हा गांव रत्नागिरी पासून 26 मैल
व राजापूर पासून 13 मैल आहे. या गांवाची
लांबी 6 मैल असून याच्या 12 वाड्या आहेत.
देवस्थानें -- श्रीनवलाई, श्रीविश्वेश्वर, (हें देवालय रा. गोखले
यांनीं शके 1663 मध्ये जोग नि काळे या मानक-यांच्या सहाय्याने बांधिलें),
श्री नाटेश्वर. या गांवांत ब्राह्मणांची एकूण 20 घरें आहेत.
त्यांत जोगांची 3, परांजपे 2, गोखले 7, गोरे 1, बापट 2, वेलणकर 1, दाते 1,
काळे 2 आणि कुलकर्णी 1 (देशस्त). या गांवाची वस्ती सुमारे 4,000
आहे.
या घराण्यांतील मंडळी धाउलवल्लीहून सुसेरीकडे गेली, व पुढे मुंबई,
पुणें येथे स्थाईक झाली. या घराण्यांस धाउलवल्ली येथे महाजनकीचा
पहिला मान (चतुर्थवर्ग महाजनी) व देवकार्यांत 3रा मान आहे.
बाबाजी गोविंद (3) -- यांचे वंशज आज धाउलवल्लीस आहेत. ते सांगतात ती
अशी- कुलदेवता श्रीकाळभैरव, श्रीविश्वेश्वर, श्रीनवलाई देवी,
श्रीहसळादेवी, श्रीब्रह्मन्देव, श्रीपुरुख (महारकीचा देव.) या देवांस
देवदिवाळी, फाल्गुनी पौर्णिमा व चैत्र शुध्द प्रतिपदा या दिवशीं नैवेद्य
दाखवितात. आश्विन नवरात्रांत नऊ दिवस अखंड दीप, माळ, सुवासिनी व
ब्राह्मण यांस एक दिवस (तृतीया अथवा पंचमी) भोजन. लग्न, मुंज,
बारसें या वेळीं भगवती देवीचा गोंधळ घालावयाचा असतो. श्रावण
महिन्यांत श्रीकाळभैरवास नित्य रुद्रावर्तन व भोजनास ब्राह्मण सांगतात.
या घराण्यांतील इतर मंडळी कुलदेवता सरस्वती - विश्वेश्वर (धाउलवल्ली)
सांगतात. देवाचे नैवेद्य थोरली दिवाळी (मार्गशीर्ष शु. 1), व
फाल्गुन शु. 15 स असतात. देवतांचीं नांवें -- श्रीसरस्वती -
विश्वेश्वर. शिवाय काळेश्री, सांवरोबा, खेमखेडजाई, नवलादेव,
पावलादेव, ब्रह्मन्देव, अचळदेव इत्यादी सात देव. आश्विन
महिन्यांतील नवरात्रांत अखंड दीप, माळ व सुवासिनीस भोजन. मंगल
कार्यानंतर किंवा प्रतिवार्षिक बोडण, गोंधळ, नूतन वधुवरांनीं
कुलदेवतेच्या दर्शनास जाणें हे आचार आहेत. गणेशचतुर्थीच्या दिवशीं
पूजा करावयाची गणपतीची मूर्ति हत्तीच्या वाहनावरच तयार करावयाची असे असा
प्रघात होता.
घराणें 17 वें, नांदिवडें - पालशेत.
हें घराणे त्रिप्रवरी आहे. हे घराणे मुळचे जयगडजवळील नांदिवडे या
गांवचे. नांदिवड्यास काळे ग्रामोपाध्याय असून गावातील मानक-यांपैकीं
पहिले आहेत. या घराण्यातील हरी गंगाधर (2) व नांदिवडे घराण्यातील हरी (1)
ह्या व्यक्ति एकच असाव्यात. दोन्ही घराणी नांदिवड्याचीच आहेत.
नांदिवडे गावातील मानक-यांपैकी काळे हे पहिले मानकरी आहेत. तसेच हे
ग्रामोपाध्याय व धर्माधिकारी आहेत. यावरुन दोन्ही घराणी एकच असावीत
असे वाटते. निश्चित पुराव्याच्या अभावी ही घराणी जोडून दाखवता आली
नाहीत.
कुलदेवता - श्रीकाळभैरवमहासरस्वती. देवदिवाळीस या देवास व नांदिवडे
येथील ग्रामदेवता चंडकाई, भावकाई, रवळनाथ या तीन देवांस मिळून एक नैवेद्य
घालतात. शारदीय नवरात्रांत दीप, माळ, ब्राह्मण नाही. बोडण
नाही. महालक्ष्मी घरी करीत नाहीत. देवांत घंटा नाही.
वाजते दागिने घालत नाहीत.
बाळंभट बाबदेव (5) यांचे वंशज नांदिवडे येथील कह्राटेश्वर
कुलस्वामी सांगतात.
नागेश महादेव (9) मुंबई - कुलदेवता
श्रीकाळभैरव-महासरस्वती. ठिकाण नांदिवडे.
झोलाय, महालक्ष्मी. ठिकाण पालशेत. देवदिवाळीच्या दिवशी चार
नैवेद्य पुढीलप्रमाणे असत.
झोलाय, महालक्ष्मी, काळभैरव-महासरस्वती, मानाय.
पुरुषोत्तम रघुनाथ (10) आरोस. देवाचे नैवेद्य श्रावणी सोमवारी
असतात. याच दिवशी ब्राह्मण, सुवासिनी घालण्याची वहिवाट.
देवतांची नांवे -- श्रीगिरोबा-माऊली, रवळनाथ. आश्विन नवरात्रांत नऊ दिवस
नंदादीप घरातील देवाजवळ असे. हा नंदादीप हरी विठ्ठल (8) यांनी काही
कारणांमुळे सुरू केला, तो चालू आहे. पहिली पाच वर्षे स्त्रियांनी
महालक्ष्मी पूजण्याची वहिवाट. नूतन वधूवरांनी ग्रामदेवतेच्या
दर्शनासाठी जाण्याची पद्धत.
महादेव गणेश (10) नांदिवडे. कुलस्वामी --
काळभैरव-महासरस्वती. देवदिवाळीला कह्राटेश्वरास नैवेद्य
घालतात. काळ्यांचा पहिलामान असल्यामुळें गांवची चंडिकेची पालखी
फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशीं वस्तीला येते. एक दिवस वास्तव्य
करून दुस-या दिवशीं नैवेद्य झाल्यावर जाते. अंगावर काळें घालत
नाहींत. देवपूजेत घंटा वाजवित नाहींत. वाजते अलंकार घालत
नाहींत. घरीं नवरात्र नसतें. गांवचे देवळांतील नवरात्र करतात.
घराणें 18 वें, धालवल - दाभोळें
हे घराणें पंचप्रवरी आहे. या घराण्याची धालवल, ता. देवगड, येथें
पुर्वीं खोती होती. कुलस्वामी काळभैरव(काशी) यास व दाभोळें येथील
सत्पुरुष व धालवलचे ब्रह्मन्देव यांस देवदिवाळीस तीन वडे व दोन घारगे
यांचा नैवेद्य दाखवितात. शारदीय नवरात्रांत अखंड दीप, माळ व भोजनास
ब्राह्मण असतो.
घराणें 19 वें, धालवली - पुणें
हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता --- विनायक विष्णु (5) पुणें-जोगेश्वरी व वाडेश्वर
(गुहागर). देवांचे नैवेद्य नवरात्रांत दुर्गादेवीस (गुहागर),
वाडेश्वरास निराळा नाहीं. नरक चतुर्दशीस व होळीच्या दिवशीं असलाय व
नवलाय या दोन देवतांस एका पानावर आणि विश्वन्देव व ब्रम्हन्देव यांस
दुस-यावर (या धालवलीच्या ग्रामदेवता असाव्या). नैवेद्य घालतात.
आश्विन नवरात्रांत फक्त माळ. बोडण नाहीं.
घराणें 20 वें, पावस - वाडें
या घराण्याचें मूळ गांव वाडें-पडेल किंवा पावस. हे पंचप्रवरी आहेत.
कुलदेवता -- श्री नवलाई (तारळें-सातारा ). देवाचे नैवेद्य
मार्गशीर्ष महिन्यांत असतात. आश्विन महिन्यांतील नवरात्रांत अखंड
दीप, माळ, उठती बसती सुवासिनी, ब्राह्मण. लग्नकार्य झाल्यास
बोडण भरावयाचें असतें. देवापुढें घंटा वाजवायची नाहीं व
अंगावर वाजते अलंकार कोणीही घालावयाचे नाहींत. पावस-गुहागर व
पावस-वाडें हीं घराणीं एक असावींत असें वाटतें.
घराणें 21 वें, गोळप
या घराण्याचें कुलदैवत -- काळभैरवसरस्वती. आचार निरनिराळ्या
शाखांतून थोडे निरनिराळे आहेत ते पुढें दिले आहेत.
बाळाजी गंगाधर (13) गोळप (नवेदर) सर्व मोठ्या सणांनां गोळप
गांवांतील श्रीरवळनाथ, जाखादेवी, श्रीसत्येश्वर, व गणपती यांस नैवेद्य
घालत व कार्तिक शु. 13 ला गांवचे कुलकर्णी म्हणून त्रिपुराची पूजा करीत.
(एक वर्ष आड). गांवांतील सर्व देवांना नैवेद्य घालत. बोडण
घालण्याचा प्रघात नाहीं. देवांत घंटा नाहीं व मुलांच्या बारशाचा
संस्कार नाहीं नवरात्रांत दस-यापर्यंत घरच्या देवांवर फुलांचा घोंस बांधित
व दस-याच्या दिवशीं सुवासिनी व ब्राह्मण सांगत. चैत्र शु. 15 ला
कुलस्वामिनीच्या नांवांनें सुवासिनी-ब्राह्मण सांगत.
शिवराम विठ्ठल (13) भुसावळ -- दर रविवारीं नैवेद्य - रवळनाथ
आणिं जाखादेवी, ठिकाणा रनपार (गोळपेंनजीक). श्रावणांत दर सोमवारीं
चार नैवेद्य. 1. रवळनाथ, 2. जाखादेवी, 3. सत्येश्वर, 4.
गणपति. दसरा-दिवाळीस वरील चार नैवेद्य व पांचवा नैवेद्य धावगी,
ठिकाण गोळप.
दत्तात्रेय दामोदर (14) मुंबई -- प्रतिवर्षी श्रावणमासांत
कोणत्या तरी एका सोमवारीं सर्व ग्रामदेवतांना नैवेद्य असत. त्या
देवतांचीं नांवें - देऊळ 1. श्रीहरीहरेश्वर (ब्रह्मा, विष्णु, महेश
या त्रिमुर्ति). अनंत, गणपति, महालक्ष्मी, विठ्ठल-रखमाई,
क्षेत्रपाळ, गरूड. देऊळ 2. रवळनाथ, जाखादेवी, नवलादेवी,
पावणादेवी, वाघजाई, मानादेवी, धावगी. देऊळ 3. सत्येश्वर, भवानी,
ईश्वर-पार्वती, गणपति. यांच्या घरांत सतत कुलदेवतेपुढें नंदादीप,
नवरात्रांत दीप व माळ. आश्विन शु. 8 स पाठ, सुवासिनी-ब्राह्मणांस
भोजन. बोडण वर्ज्य. गोंधळ, मारग इत्यादि नाही. घरी
कुलदेवतेची जुनी मूर्ति होती व शेजारचे लोक (काळे) कार्यारंभीं व
बाहेरगांवीं जातांना तेथें दर्शन घेत.
अच्युत गणेश (13) नागपूर -- देवदिवाळीस नैवेद्य
नसत. श्रावणांत एका सोमवारीं 21 देवांना नैवेद्य - हरिहर, रवळनाथ,
जाखादेवी, सत्येश्वर इत्यादि गोळपचे देव. आश्विन नवरात्रांत अखंड
दीप, माळ, उठती बसती सुवासिनी व ब्राह्मण. एक दिवस सप्तशतीचा पाठ.
लक्ष्मण गोविंद (12) गोळप- देवाचे नैवेद्य - पाडवा, थोरली
दिवाळी (मार्गशीर्ष शु. 1), फाल्गुन पोर्णिमा, दसरा इत्यादि.
देवतांचीं नांवे. गोळप ग्रामदेवता सत्येश्वर, गणपति, रवळनाथ,
जाखादेवी, श्रीहरीहर, धावगादेवी. वडील घरीं नूतन वधूवरांनीं
कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचा प्रघात होता. (गोळपेंलाच). वडील
घराण्यांत नवरात्रांत दीप, माळ, पाठ, कुमारिकांना व सुवासिनीस भोजन हे
प्रकार थोड्या प्रमाणांत चालू होते.
चिंतामणि रामचंद्र (13) देवाचे नैवेद्य - वडे घारगे यांचा
नैवेद्य देवदिवाळीस घालत. आषाढ महिन्यांत जाखादेवी व रवळनाथ यांस
नारळाचा नैवेद्य असे. शारदीय नवरात्रांत अखंड दीप, रोज पांच फुलांचा
झेंडा व उठतां बसता ब्राह्मण व दस-यास कुमारिका असे. महालक्ष्मीचा
खेळ करीत.
रघुनाथ नारायण (12) पुणें-देवाचे नैवेद्य - सत्येश्वरास रोज
नैवेद्य व बाकीच्या देवतांस ठराविक सणावारीं.
देवतांचीं नावें -- सत्येश्वर, गणपति, रवळनाथ, जाखाई, शिवाय
ग्रामदेवता. पूर्वींपासून श्रीराम उत्सव चैत्रांत 15 दिवस
(प्रतिपदा-पोर्णिमा) असे. मूर्ति पेशवाईपासून असून पहिले कांहीं
दिवस लोकांच्या उदार आश्रयावर उत्सव होत असे. नंतर हे व यांचे चुलते
एक वर्ष याप्रमाणें स्वतः करीत असत. दशमीच्या दिवशीं रामप्रसाद असून
ग्रामस्थांना समाराधना असे. रामनवमी व एकादशी या दिवशीं कथा-पुराण,
भजन, मंत्रजागर इत्यादि कार्यक्रम असत. हनुमान-जयंतीच्या दिवशीं
उत्सव समाप्त होई. पंधरा दिवस पूजा, आरती, अभिषेक इत्यादि कार्यक्रम
असत.
जगन्नाथ वामन (12) गोळप - देवाचे नैवेद्य - दसरा, दिवाळी,
शिमगा, श्रावणी सोमवार इत्यादि दिवशीं गोळपेंतील देवांना नैेवेद्य
घालण्याची चाल होती. साधारण सर्व मोठ्या सणांना रवळनाथ व सत्येश्वर
या गोळप गांवांतील देवांना नैवेद्य घालत. तसेंच कार्तिक शु. 13 स व
ज्येष्ठमासीं गोळप येथील श्रीहरिहरेश्वर या देवाला नैवेद्य घालत.
बोडण नाहीं. देवांत घंटा नसते.
विनायक दिनकर (12) नागपूर - पुढील देवतांस देवदिवाळीस नैवेद्य
असत - काळभैरव- सरस्वती, रवळनाथ, जाखादेवी, सत्येश्वर, गणपति, धावगाई व
मारुती. शारदीय नवरात्रांत देवीवर फुलांचा घोंस बांधत.
गोपाळ नागेश (12) माधवपूर (बेळगांव) -- देवदिवाळीस जाखादेवी व
रवळनाथ यांस नैवेद्य असत. आश्विन नवरात्रांत माळ बांधत.
सुवासिनी, ब्राह्मण व कुमारिका यांस भोजन असे.
या घराण्यांतील रघुनाथ नारायण (9) यांच्या शाखेस अजून
रामदरबार म्हणत. कारण यांच्या कडे श्रीरामनवमीचा उत्सव चैत्र शु. 1
ते चैेत्र शु. 15 पर्यंत होत असतो.
या घराण्यांत गोळपचें कुळकर्ण वतन आहे व तें सुमारें 260 वर्षांचें जुनें
आहे. त्याबद्दल दरसाल सुमारें रु. 49 मिळत. गोळप-गोवळ या
घराण्यांतील लोकांसही कुलकर्णी काळे म्हणतात. त्यावरुन हीं दोन्हीं
घराणीं एक असावींत. गोळप येथें लग्नकार्यांत काळे यांस मानाचा तिसरा
नारळ मिळतो. पहिला खोतास व दुसरा महाजन यास. याबद्दल यांस
गांवकीचें लहिणें लहावें लागें. गोळप-कर्वी घराण्यांपैकीं जें एक घर
गोळपेस (दत्तात्रेय रंगनाथ (11)) आहे त्यास पुराणिक काळे म्हणत.
त्या घराण्याचा व या घराण्याचा सोयेर-सुतक संबंध आहे. या घरण्यांचे
प्रवर तीन आहेत. परंतु बळवंत महादेव (11) यांचे वंशज आपले प्रवर
पांच आहेत असें म्हणत.
गंगाधर रघुनाथ (9) भार्या राधा.
दिनकर गंगाधर (10) भार्या गोपिका.
घराणें 22 वें, गोळप - गोवळ
हे घराणें गोळप येथून प्रथम आडिवरें येथें व तेथून गोवळ येथें गेलें असें
म्हणतात.
या घराण्याला सुमारें 360 वर्षांपूर्वीं गांवचे खोत ठाकूर देसाई यांजकडून
वतन मिळालें आहे. तें अद्यापि चालू आहे. डोळे नि गोखले
यांजकडूनही वतन मिळालें आहे. पूर्वीं या घराण्यांत गोवळचे
शूद्रादिकांच्या उपाध्यायपणाचें वतन होतें. गोळप येथें काळ्यांच्या
दोन शाखा आहेत. एक पुराणिक व दुसरे कुलकर्णी. हें घराणें
कुलकर्णी शाखेपैकीं असून त्रिप्रवरी आहे.
कुलस्वामी काळभैरव(काशी), कुलदेवता महाकाली - महासरस्वती आडिवरें.
देवदिवाळीस व श्रावणांतील एका सोमवारीं पुढील देवतांस नैवेद्य
दाखवितात. महेश्वर, गांगो, ब्रह्मन्देव, नवलादेवी, रामेश्वर,
लोभ्या (निराकार), श्रीमारुती, महापुरुष व विठोबारखुमाई, महाकाळी,
महासरस्वती, महालक्ष्मी, काशीविश्वेश्वर, काळभैरव. शारदीय
नवरात्रांत माळ व शेवटच्या दिवशीं ब्राह्मण व सुवासिनी यांस भोजन
असतें. देवांत घंटा नाहीं. वाजते अलंकार करीत नाहींत.
महालक्ष्मीचें व्रत, बोडण व गोंधळ नाहीं. गोवळ येथील
ब्रह्मन्देवाजवळ प्रतिवर्षी ज्येष्ठमास संपण्यापूर्वी सर्व भाऊबंदांनीं
मिळून एकत्र पूजन व जेवण करावयाचें असतें.
घराणें 23 वें, गोळप - करवी
या घराण्यापैकीं जें एक घर सध्यां गोळप येथें आहे (दत्तात्रेय रंगनाथ (11)
) त्यांतील मंडळीस पुराणिक काळे असें म्हणतात. यांचा व गोळप
घराण्याचा सोयेर-सुतक संबंध आहे.
या घराण्यास ज्याप्रमाणें पुराणिक काळे म्हणतात त्याप्रमाणें
पालशेत-गुहागर या भागांतील राहणारे काळे हे हि पुराणिक होत असें
म्हणतात. या घराण्याचे प्रवर तीन आहेत.
कुलदेवता काळभैरव, सरस्वती. देवदिवाळीस गोळप येथील रवळनाथ,
जाखादेवी, सत्येश्वर, गणपती, कोल्ही या देवांस नैवेद्य असतात.
फाल्गुन वद्य 1 स कोल्ही शिवाय चार देवांना नैवेद्य दाखवितात.
गुढीपाडवा, श्रावणी सोमवार नि दसरा या दिवशीं कोल्ही देवीस नैवेद्य
असतो. पावस येथें राहणारी मंडळी सोमेश्वर, विश्वेश्वर, गणपति, नवलाई
व महापुरुष यांसही देवदिवाळीस नैवेद्य दाखवितात. शारदीय नवरात्रांत
माळ असते. बोडण, गोंधळ महालक्ष्मी नाहीं. देवांत घंटा नाहीं व
वाजते अलंकार घालीत नाहींत. ग्वाल्हेरकडे गेलेल्या मंडळी (बाळकृष्ण
चिंतामणि (11) कडे अखंड दीप, जोडमाळ, उठती बसती सुवासिनी असे.
पुरुषोत्तम विश्वनाथ (11) येवलें, हे तुगाळ, भैरव, सरस्वती,
जाखमाता व योगेश्वरी यांस देवदिवाळीस नैवेद्य दाखवित.
उज्जयिनीकडील मंडळी (विष्णु नरसिंह (10)) आश्विन शु. 15 स व देवदिवाळीस
जाखादेवी, रवळनाथ, सत्येश्वर, महाकाली व महालक्ष्मी यांस नैवेद्य
दाखवित. नैवेद्याच्या पत्रावळी चारच मांडत. त्यांत तीन
पत्रावळीवर एकेक मूद व चौथीवर दोन मुदा असत. नवरात्रांत पांच
फुलांचा झेंडा देवावर बांधित.
जनार्दन दामोदर (11) कुलदेवता - काळभैरव, जाखादेवी, रवळनाथ,
योगेश्वरी. देवदिवाळीला चार नैवेद्य असतात. नवरात्रांत सतत 9
दिवस दिवा, आरती व माळ असते. जन्माष्टमी दिवशीं दिवसभर उपवास.
दीड दिवसाचा गणपति बसवतात.
या घराण्याच्या धुंडिराजशास्त्री, जयकृष्णशास्त्री यांनीं लहिलेल्या सर्व
पोथ्या उज्जैनी विश्वविद्यालयांत (विक्रम विश्वविद्यालया मध्ये) काळे कक्ष
म्हणूंन स्थापन करूंन विद्यार्थ्यांसाठीं राखुन ठेवल्या आहेत.
धुंडिराजशास्त्रीनीं लहिलेल्या भागवत व्यंजनचा गोविंद जयकृष्ण व काशीनाथ
भालचंद्र यांनीं मिळून संस्कृत मध्ये अनुवाद केला असून त्या पुस्तकाच्या
प्रकाशनाकरींता विश्वविद्यालय अनुदान आयोगानें अनुदान म्हणूंन रु. 1600/-
दिले. दामोदर जयकृष्ण यानीं खजुराहोच्या शिलालेखांचा हिंदीत अनुवाद
केला व त्याला त्यावेळचे गृहमंत्री गोविंद वल्लभपंत यांनीं रु.250/- देऊन
पुरस्कृत केले. ते छापल्यानंतर मध्य प्रदेशच्या पुस्तकालयांनी घेतले.
घराणे 24 वें, गोळप - अलबाग
या घराण्याचें मुळ गांव गोळप, तालुका रत्नागिरी. तेथून हरी
रघुनाथ (3) हे अलबागेस गेले. तेव्हांपासून यांचे वंशज तेथेंच
रहात. सध्यां या घराण्यांतील व्यक्ति कराची व भुसावळ येथेंही आहेत
असे वाटते. सध्याचे पत्ते न सापडल्या मुळे संपर्क साधतां आला
नाही. सबब माहिती मिळाली नाहीं.
कुलस्वामी ---काळभैरवव सरस्वती ही काशी येथील असावित असें म्हणत.
वर्षप्रतिपदा, विजयादशमी व देवदिवाळीस पुढील देवांस नैवेद्य दाखवीत.
गोळप येथील नवलादेवी, पावनादेवी, सोमेश्वर, काळेश्वर, जाखादेवी व रवळनाथ.
नवरात्र, बोडण इत्यादि कोणतेही आचार नव्हते. महालक्ष्मीची पूजा
मात्र होती. या घराण्याचे तीन प्रवर आहेत. या घराण्यांत सरदार
बिवलकर यांजकडून अलबाग येथें घराची जागा व नेऊळी येथें दोन एकर जमीन
मिळाली होती.
घराणे 25 वें गोळप - पुणें
हें गोळपहून पुणें येथें गेलें. गोळप-कर्वी घराण्यांतील पिढी 8 मधील
आबाजी व या घराण्यांतील मूळपुरुष आबाजी एक असावा. परंतु निश्चित
पुराव्याच्या अभावीं हीं घराणीं जोडतां आलीं नाहींत. हें घराणे
त्रिप्रवरी आहे. पाडळी, जि. नगर येथें या घराण्यास वतन होतें.
पुण्यास किलर्ोस्कर थिएटर ज्या जागेवर आहे ती जागा या काळ्यांची होती असें
म्हणतात. बुधवार पेठेंत नगरवाचनालयाजवळ यांचें घर होतें.
कुलदेवता --- हरिहरेश्वर, ब्रह्मा, विष्णु, रवळनाथ, सांबदेव, सत्येश्वर,
गणपति, धावगादेवी, क्षेत्रपाळ. देवदिवाळीस वरील देवतांस नैवेद्य
असतात. त्यांत हरिहरेश्वर, ब्रह्मा, विष्णु मिळून एक नैवेद्य नि
रवळनाथ, सांबदेव मिळून एक नैवेद्य असतो. आश्विन नवरात्रांत अखंड
दीप, जोडमाळ, उठती बसती सुवासिनी. मंगल कार्यानंतर बोडण असतें.
घराणें 26 वें, गोळप - नांदिवडें
हें घराणें त्रिप्रवरी आहे. हें घराणें नांदिवडें येथें सहा पिढ्या
होते. नांदिवडें येथें असणा-या इतर काळे मंडळींशीं यांचा संबंध दिसत
नाहीं. पावस-गोळप येथील काळे संबंधी आहेत असें म्हणतात.
कुलस्वामी काळभैरव. कुलदेवता सरस्वती. या देवतांस देवदिवाळीस
नैवेद्य असतो. नवरात्र नाहीं. महालक्ष्मी घरीं करीत
नाहींत. बोडण नाहीं. वाजणारे अलंकार (वाळे इत्यादि) घालीत
नाहींत.
घराणें 27 वें, गोवळ
गोवळ हा गांव जैतापूर खाडीच्या कांठीं राजापुरापासून सहा मैलांवर
आहे. पायीं व जलमार्गाचा रस्ता आहे. सुमारे 60 वर्षां पूर्वीं
कोंकणस्थ ब्राह्मणांचीं घरें 25 होतीं त्यांत काळे, गोखले, परांजपे, बापट,
बेडेकर, लेले, जोशी-गोसावी इत्यादि होतीं. आतां कोंकणस्थ
ब्राह्मणांची 12 घरें आहेत. त्यांत बेडेकर, शेवडे, गोखले, काळे,
बापट, परांजपे आणि जोशी-गोसावी आहेत. देवस्थानें महेश्वर, नवलाई,
रामेश्वर व गांगो. लोकसंख्या सुमारें 1700. हें घराणें
त्रिप्रवरी आहे.
हें घराणें गोवळहून लब, सातारा या भागांत गेलें. मूळ गांव आडिवरें
असावें असें म्हणतात.
कुलदेवता -- जोगेश्वरी. देवदिवाळीस जोगेश्वरी, नवलादेवी,
ब्रह्मन्देव, विश्वेश्वर, महेश्वर इत्यादि सहा देवतांस नैवेद्य
असतात. नवरात्रांत अखंड दीप, माळ व उठती बसती सुवासिनी असते.
बोडण व गोंधळ नाहीं. महालक्ष्मीची पूजा करीत नाहींत.
मंगलकार्यानंतर मारग मळण्याची चाल आहे. देवांत घंटा ठेवीत नाहींत व
वाजते अलंकार घालीत नाहींत. मारग मळणे म्हणजे या घराण्यांतील
कुणाचेही घरांत लग्नकार्य झाल्या नंतर मारग मळणे करतात. याचा अर्थ
स्वतःचे गावाचे बाहेर स्वयंपाकाचे सर्व सामान घेवून गांवा बाहेर स्वयंपाक
करणे, अथवा श्री कुलस्वामी व कुलस्वामिनी व इतर देवतांना मिळून 11 नैवेद्य
दाखवून नंतर अन्नग्रहण करणें.
पुरुषोत्तम गणेश (5) सोलापूर, हे कालभैरव, अंबा, अंबिका व अंबालका या
कुलदेवता सांगतात. यांस नवरात्रांत नैवेद्य घालतात.
देवदिवाळीस कोंकणच्या देवांस बारा नैवेद्य घालतात. यांजकडे बोडण
भरणें व ओहर जाणें आहे.
घराणें 28 वें, गोवळ - मर्ढें
या घराण्याचें मूळ गांव गोवळ, ता. राजापूर. तेथून हे मर्ढें
(सातारा) येथें स्थाईक राहिले व तेथून पुढें सातारा, मुंबई, पुणें येथें
गेले आहेत.
कुलस्वामी -- महेश्वर (गोवळ), देवी गोवळची. देवदिवाळीस सात
नैवेद्य असतात. नवरात्रांत दिवा व माळ नवीन चालू आहे; पूर्वींची
नाहीं. महालक्ष्मीची पूजा व बोडण नाहीं. हें घराणें
त्रिप्रवरी आहे. हें घराणें व गोवळ घराणें हीं दोन्हीं गोवळहून
साता-याकडे गेलीं. यावरून हीं मूळचीं एक असावीं. परंतु
माहितीच्या अभावीं जोडतां आलीं नाहींत. पुणें येथें गोसावीपुऱ्या
(सोमवार) मध्यें पूर्वीं स्थाईक असणारे धोंडो गंगाधर हे यांचे संबंधी
होते. परंतु धोंडो गंगाधरांची माहिती उपलब्ध न झाल्यामुळें ते यांचे
कसे संबंधी आहेत हें दाखवितां आलें नाहीं.
घराणें 29 वें, पावस - पालशेत
या घराण्यांतील चिमणभट हे गोवळहून पालशेत येथें गेले असें म्हणतात.
परंतु चिमणभटांपासून पुढची वंशावळ उपलब्ध नाहीं. उपलब्ध वंशावळींत
दाजी मूळ पुरूष दाखविला आहे. काशीनाथ आबाजी (11) गोळप-करवी, यांच्या
सांगण्याप्रमाणें हें घराणें गोळप येथील पुराणिक काळ्यांपैकीं आहे.
परंतु माहितीच्या अभावीं निश्चित कांहीं ठरवितां येत नाहीं.
गोळप-गोवळ घराण्यांतील दाजी (7) व या घराण्यांतील मूळ पुरुष दाजी हे एक
असण्याचा संभव आहे. कुलदेवतांमध्यें पावस येथील हरिहरेश्वर सांगितला
आहे, यावरून हें घराणें गोळप-पावस येथील असावें. यामुळें
काशीनाथ आबाजी (11) गोळप-करवी, यांच्या म्हणण्यास पुष्टि येते.
पावस-गुहागर हें घराणेंहीं यापैकींच असावें. या घराण्याचा पूर्वज
चिमणभट यांना पेशवाई पासून 25 रुपये मिळूं लागले व ही नक्त नेमणूक चालू
होती.
कुलदेवता --- हरिहरेश्वर (पावस), व जोगेश्वरी (आंबे-मोंगलाई).
देवदिवाळीस या देवतांस व ग्रामदेवता महालक्ष्मी, झोळंबरी या देवतांस
नैवेद्य दाखवितात. आश्विनांतील नवरात्रांत अखंड दीप, माळ, असून
आद्यंतीं सुवासिनी व ब्राह्मण भोजनास असतो. बोडण व महालक्ष्मी
नाहीं. देवांत घंटा नाहीं.
घराणें 30 वें, तिलर्ोट
हें घराणें मूळचें तिलर्ोटचें. तेथून नारायण चिमणाजी (2) हे पडेल
येथें राहावयास गेले. महादेव काळे या नांवाचा एक पुरुष पडेल येथें
185 वर्षांपूर्वीं होऊन गेला तो यांचा संबंधी होता असें म्हणतात.
त्याच्या नांवानें आषाढ महिन्यांत दोन ब्राह्मणांस भोजन घालतात.
तिलर्ोट येथें इनामी जमीन होती.
श्रावण महिन्यांत एका सोमवारीं तिलर्ोटचा रामेश्वर व पडेलचा शंकरेश्वर
यांना नैवेद्य दाखवितात. मार्गशीर्ष महिन्यांत ब्रह्मन्देव व
महापुरुष यांना नैवेद्य घालतात. नवरात्रांत माळ बांधितात.
बोडण, गोंधळ व महालक्ष्मी नाहीं. देवपूजेंत घंटा नाहीं.
घराणें 31 वें, वाडें
या घराण्याला वाडें, देवगड व दाभोळें या गांवांची भिक्षुकीवृत्ति
आहे. त्यांतील वांटे पुढीलप्रमाणें आहेत --- शाखा 1. आठ आणे.
शाखा 2. चार आणे व वाडें-चिपळुण शाखा 3. चार आणे.
या वरून हीं तीनहीं घराणीं मूळचीं एक आहेत. परंतु वंशावळीच्या पूर्ण
माहितीच्या अभावीं हीं जोडून दाखवितां आलीं नाहींत.
पडेल-पुणें हें घराणें वाडें शाखा 1 पैकीं आहे अशी समजूत आहे.
दोन्ही घराण्यांचा मूळ पुरुष हरी ही एकच व्यक्ति असावी. परंतु
निश्चित माहितीच्या अभावीं घराणीं जोडलीं नाहींत. हें घराणें
त्रिप्रवरी आहे.
कुलदेवता --- काळभैरव, सरस्वती. देवदिवाळीस व श्रावणांतील एका
सोमवारीं पुढील देवांस नैवेद्य असतात. 1. विमलेश्वर, 2.
नंदी, 3. काळभैरव, 4. गणपति, 5. रवळनाथ.
शुभकार्यानंतरही वरील 5 नैवेद्य घालतात. शारदीय नवरात्रांत माळ व एक
दिवस ब्राह्मण-सुवासिनी यांस भोजन. देवांत घंटा नाहीं. तसेंच
वाजते अलंकार घालीत नाहींत. स्त्रियांनीं काळें वस्त्र वापरावयाचें
नाहीं. महालक्ष्मीचें व्रत करीत नाहींत.
रामचंद्र विठ्ठल (6) चिपळूण शाखा - यांजकडे लग्नमुंजीनंतर बारा नैवेद्य
घालीत. हे सर्व देव वाडें येथील आहेत अशी समजूत आहे. हे देव -
1. काळभैरव, 2. रवळनाथ, 3. पावणादेवी, 4. महालक्ष्मी, 5. विमलेश्वर, 6.
निरंकार, 7. वेगळी. बाकीच्या देवांची नांवे माहीत नाहींत.
गोपाळ हरभट (5) लब (शाखा 3 री) यांच्याकडे देवदिवाळीस नैवेद्य असत.
शारदीय नवरात्रांत घोंस बांधित.
घराणें 32 वें, पडेल - पुणें
हें घराणें वाडें शाखा 1 पैकीं आहे अशी समजूत आहे. दोन्ही
घराण्यांचा मूळ पुरुष हरी ही एकच व्यक्ति असावी. परंतु निश्चित
माहितीच्या अभावी घराणीं जोडलीं नाहींत.
पडेल हा गांव देवगडपासून नऊ मैल आहे. लोकसंख्या 2000. मुख्य
देवस्थान शंकरेश्वर. सन 1944 सालीं चित्पावन ब्राह्मणांचीं घरें 25
होतीं - काळे, मराठे, देवधर, दामले, बोडस इत्यादि. क-हाडे
ब्राह्मणांचीं चार घरें होती. हें घराणें त्रिप्रवरी आहे.
कुलदेवता काळभैरव. देवाचे नैवेद्य नाहींत. नवरात्र, बोडण,
गोंधळ नाहीं. देवांत घंटा नाहीं. वाजणारे अलंकार घालावयाचे
नाहींत.
घराणें 33 वें, पालशेत-कल्याण
हें घराणें मूळचें पालशेत, पेटा गुहागर येथील. तेथून
जुन्नर-बारामतीवरून कल्याण येथें गेलें. कल्याणास यांचें वास्तव्य
सुमारें 235 वर्षें आहे. हें घराणें पंचप्रवरी आहे. कुलदेवता
दुर्गा देवी सांगतात. शारदीय नवरात्रांत अखंड दीप, माळ, उठती बसती
सुवासिनी असते. मंगलकार्यानंतर बोडण असते. ती चाल अद्यापही
चालू आहे. देवदिवाळीस देवांस नैवेद्य घालण्याची चाल नाहीं.
प्रतिवार्षिक ज्येष्ठ महिन्यांत ब्राह्मण घालण्याची पध्दत चालू आहे.
काळ्या रंगाचे वस्त्र अंगावर घालत नाहींत.
घराणें 34 वें, पालशेत-करंजगांव
हें घराणें पालशेत येथून करंजगांवीं गेलें. सध्यां वास्तव्य कवाड,
भिवंडीकडे आहे. हे पंचप्रवरी आहेत. कुलदेवता रवळनाथ.
वार्षिक नैवेद्य नाहींत. नवरात्रांत प्रतिपदा व दसरा या दिवशीं
दुधाचा पवमानाभिषेक. आदि-अंती ब्राह्मण-सुवासिनीस भोजन.
कुलधर्म --- मार्गशीर्ष शु.15स पुरणाची आरती, पुरणाचा नैवेद्य, ब्राह्मण
सुवासिनी यांस भोजन व धान्यफराळ. वरीलप्रमाणेंच माघ शु. 15, चै. शु.
15 व श्रावण शु. 15 या दिवशीं कुलधर्म असतो. पौर्णिमा अंतरल्यास
अन्य रविवारीं फक्त वरीलप्रमाणें कुलधर्म करणें. आश्विनांतील
रविवारीं 5घरीं जोगवा मागणें.
भालचंद्र वासुदेव (8) कल्याण यांजकडे नवरात्रांत दिवा, माळ व पाठ
असे. मंगलकार्यानंतर बोडण असे.
घराणें 35 वें, रोहें
हे घराणें पंचप्रवरी आहे. या घराण्याचें मूळ गांव रत्नागिरी
जिल्ह्यांतील गोळप हें आहे. गेल्या चार पिढ्या यांचें वास्तव्य
रोहें येथें आहे. कुलदेवता दुर्गादेवी (ठिकाण माहीत नाहीं).
आश्विन नवरात्रांत अखंड दीप, माळ व ब्राह्मण-सुवासिनी भोजन, वैयक्तिक आचार
म्हणूंन अनंत विश्वनाथ घालतात. मार्गशीर्षमासीं श्रीदत्तगुरु महाराज
यांचा 5 दिवस उत्सव, कथा, कीर्तन, सर्व गांवास भोजन पूर्वीं घालत
असत. काल परत्वे आतां एक दिवस उत्सव साजरा करतात. मोरेश्वर
गोपाळ व नीलकंठ गोपाळ - पौषांत व चैत्रांत दोन मुंजे. रामचंद्र
जनार्दन - देवदिवाळीस तीन नैवेद्य घालीत.
घराणें 36 वें, पालशेत - कोतवडें
हें घराणें पालशेताहून कोतवडें येथें गेले. तेथून कुलाबा जिल्ह्यांत
अलबाग व सोलापूर जिल्ह्यांत परितें येथें गेलें. हे त्रिप्रवरी आहेत.
कुलदेवता -- दुर्गादेवी. देवदिवाळीस सात नैवेद्य
घालण्याची चाल आहे. आश्विन नवरात्रांत अखंड दीप, झेंडा, सुवासिनी,
ब्राह्मण आणि कुमारिका भोजनास असतात. मंगलकार्यानंतर व वार्षिक बोडण
असतें. नूतन वधुवर कुलदेवतेच्या दर्शनास जातात.
घराणें 37 वें, मिठबांव
हें घराणें पंचप्रवरी आहे. ह्या घराण्याची वस्ती मिठबांव ,
ता. देवगड येथें सुमारें दहा पिढ्या आहे. या घराण्यांतून
मिठगव्हाणें-तेरदळ या घराण्यांत दत्तक गेला आहे. तसेंच,
मिठबांव-हैदराबाद घराण्यांतही एक दत्तक गेला आहे. या घराण्याचा
सोयेर-सुतक-संबंध पूर्वीं या मिठबांंव-हैदराबाद घराण्याशीं होता, यावरून
हीं एक असावित. या घराण्याकडे पूर्वी महाजनकीचा मान होता.
मिठबांव हा गांव देवगडापासून 18 किलोमिटरवर आहे. येथें ब्राह्मणांची
सुमारे 19 घरें आहेत. त्यांत काळे, खाडिलकर, गोगटे, लेले, सोमण,
इत्यादि आहेत. देवस्थानें-रामेश्वर, गजबादेवी आणि रवळनाथ.
लोकसंख्या सुमारें 6000. समुद्रावर टेहळणी करण्याच्या कामगिरीबद्दल
काळे सदर या नांवाची जमीन मिठबांव येथें या घराण्यास इनाम आहे.
सध्या या घराण्यातील मंडळी विदर्भ, मुंबई व पुणें येथे स्थाईक झाली आहे.
कुलदेवता -- काळभैरव. देवदिवाळीस नैवेद्य नसतात.
श्रावणांत एका सोमवारीं काळभैरव, रामेश्वर, रवळनाथ, गजबाई, सातेरी,
ब्राह्मणदेव व काळभैरी (ही देवी पूर्वजांनीं कवठी (सावंतवाडी) येथून
आणिली) यांस नैवेद्य असतो. आश्विन नवरात्रांत अखंड दीप, उठती बसती
सुवासिनी व ब्राह्मण यांस भोजन असतें. मंगलकार्यानंतर व एक वर्षाआड
डवरी गोंधळ असतो. बोडण व घरीं महालक्ष्मी पूजा नाहीं. देवांत
घंटा नाहीं. वाजते अलंकार घालीत नाहींत.
घराणें 38 वें, मिठबांव - हैदराबाद
या घराण्याचें मूळ गांव मिठबांव. तेथून सोलापूर, हैदराबाद या भागांत
गेले. हे पंचप्रवरी आहेत. कुलदेवता काळभैरव. देवदिवाळीस
कोंकणच्या पांच देवांस नैवेद्य असतो. शारदीय नवरात्रांत अखंड दीप
असतो. माळ बांधीत नाहींत. बोडण व गोंधळ नाहीं.
महालक्ष्मीचें व्रत असतें, परंतु घरीं पूजा करीत नाहींत.
गणेश महादेव (5) हैदराबाद, यांजकडे नवरात्रांत माळ, उठती बसती सुवासिनी व
ब्राह्मण असे. गोंधळही घालीत.
घराणें 39 वें, मिठबाव - तेरदळ
हें घराणें पंचप्रवरी आहे. हें घराणें नि मिठबांव व
मिठबांव-हैदराबाद हीं घराणीं एक असावींत. कारण यांच्यांत दत्तक
देण्याघेण्याचा व्यवहार झालेला आहे. या घराण्यास सांगली व कागवाड
संस्थानांतून वतन मिळालेलें चालू होते. तसेंत कागवाड व म्हैसाळ
(सांगली) येथें इनाम जमीन आहे.
कुलदेवता -- काळभैरव. देवदिवाळीस कोंकणच्या पांच
देवांना नैवेद्य असत. कार्तिक वद्य 8 स काळभैरवास नैवेद्य
असे. आश्विन नवरात्रांत एक दिवा व एक माळ दहा दिवस कायम असे.
मंगलकार्यानंतर डवरी गोंधळ होता.
या घराण्यांतील सन 1944 सालीं हयात असलेल्या व्यक्तींचे अथवा त्यांचे
कुटुंबियांचे पत्ते सापडले नसल्यामुळें माहिती अद्ययावत करतां आली
नाही. त्यामुळें प्रथमावृत्तीत दिलेली माहिती तशीच ठेवून घराणे तसेच
सोडावे लागले आहे.
घराणें 40 वें, कुचि - तेरदळ
तेरदळ येथील काळे हे या घराण्याचे संबंधी आहेत असे म्हणतात. परंतु
त्या घराण्याशी यांचा संबंध जोडून दाखविता येत नाही. यांचे संबंधी
करकंब येथेही पुर्वी होते असे म्हणतात. हे घराणे पंचप्रवरी आहे.
कुलदेवता --- काळभैरव. देवाचे नैवेद्य देवदिवाळीस घालतात.
आश्विन नवरात्रांत दीप, माळ. शेवटचे तीन दिवस सुवासिनी व शेवटच्या
दिवशीं ब्राह्मण आणि कुमारिका यांस भोजन. महालक्ष्मीचें व्रत आहे पण
घरीं पूजा नाहीं. देवघरांत घंटा नाहीं. घागऱ्या, तोरड्या,
घुंगुर हे अलंकार घरीं करावयाचे नाहींत. आप्तेष्टांनीं दिल्यास
घालावयाचे.
या घराण्यांतील सन 1944 सालीं हयात असलेल्या व्यक्तींचे अथवा त्यांचे
कुटुंबियांचे पत्ते सापडले नसल्यामुळें माहिती अद्ययावत करतां आली
नाही. त्यामुळें प्रथमावृत्तीत दिलेली माहिती तशीच ठेवून घराणे तसेच
सोडावे लागले आहे.
घराणें 41 वें, मिठगव्हाणें - गणेशवाडी
या घराण्याचें मूळ गांव मिठगव्हाणें, ता. राजापूर. तेथून गणेशवाडी,
कुरुंदवाड, सांगली, पंढरपूर इत्यादि ठिकाणीं वास्तव्य झालें.
कुलदेवता अंजनेश्वर, भैरव, मुहुर्तादेवी (मिठगव्हाणे येथील).
देवदिवाळीस वरील देवताना व गणेशवाडीच्या गणपतीस नैवेद्य घालतात.
आश्विन नवरात्रात अखंड दीप, माळ, उठती बसती सुवासिनी व ब्राह्मण यांस भोजन
असते. बोडण, गोधंळ नाही. महालक्ष्मीचे व्रत नाही.
घराणें 42 वें, बार्शी
यांचे कोंकणांतील मूळ ठिकाण मिठगवाणें असावें असें म्हणतात. हें
घराणें पंचप्रवरी आहे. देवाचे नैवेद्य देवदिवाळीस असतात.
आश्विन नवरात्रांत अखंड दीप असतो व नऊ दिवस फराळ करितात. नूतन
वधूवरांनीं तुळजापूरच्या देवीच्या दर्शनास जाण्याची चाल आहे.
घराणें 43 वें, खेरशेत
हे घराणें मूळ खेरशेत, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील होय. तेथून
यांतील मंडळी ठाणें जिल्ह्यांत, बडोदा (गुजरात), नागपूर तसेच मध्य
प्रदेशांत जाऊन चार पिढ्या झाल्या. हे पंचप्रवरी आहेत.
मोरेश्वर बाळाजी (5) यांचे वंशज काळे आडनांव लावतात. जनार्दन बाळाजी
(5) यांचे वंशज नागपूर, मध्यप्रदेश कडील मंडळी आपले आडनांव दाभोळकर लावतात.
कुलदेवता -- सरस्वती, दालभेश्वर. वर्षप्रतिपदा, दसरा व
देवदिवाळी या दिवशीं देवास चार नैवेद्य असतात. एका पानावर दोन व
दुसरे दोन स्वतंत्र पानावर घालतात. मंगलकार्य व प्रसूती यानंतर बोडण
भरतात. शारदीय नवरात्रांत अखंडदीप व भोजनास सुवासिनी असते.
घराणें 44 वें, अक्षी - नागांव
हे घराणें अक्षी, नागांव चौल या भागांतून सिंदेशाईंत ग्वाल्हेरकडे
गेलें. यांना दाभोळकर काळे असें म्हणतात. या घराण्यांतील
मंडळीं आपले आडनांव गुरुजी असे लावतात. खेरशेत घराण्यांतील मंडळीसही
दाभोळकर काळे म्हणतात. परंतु त्यांचा व यांचा संबंध जोडून दाखवितां
येत नाहीं. हे घराणें पंचप्रवरी आहे. दाभोळकर आडनांव
कागदोपत्री लावणारें घराणें पेशवाईंत प्रसिध्दीस आलेले रामाजी अनंत यांचें
आहे. त्यांच्याशीं यांचा संबंधदाखवितां येत नाहीं. मोरो कृष्ण
(4) यानीं क्षेत्राच्या ठिकाणीं आपलें मूळ गांव चौल म्हणून
सांगितलें आहे. या घराण्यांतील कृष्णाजी बापुराव (3) यांस
अलजाबहादुर शिंदे यांजकडून इनाम मिळालें आहे. कुलदेवता श्री
योगेश्वरी. देवदिवाळीस नैवेद्य घालीत नाहींत. आश्विन
नवरात्रांत श्रीयोगेश्वरीची स्थापना करितात. अखंड दीप, फुलांची माळ,
सप्तशतीचा पाठ व रोज सुवासिनी, ब्राह्मण यांस भोजन असतें. नवमीच्या
दिवशीं पुरण घालून कुलधर्म करतात. भोजनोत्तर स्थापित देवतेचें
विसर्जन करतात. मंगलकार्य व जनन यानंतर बोडण भरतात. मोरेश्वर
विनायक (7) हे योगेश्वरीच्या जोडीस चंद्रशेखर ही कुलदेवता सांगत.
घराणें 45 वें, मणचें
हें घराणें पंचप्रवरी आहे. कुलस्वामी काळभैरव. देवदिवाळीस
काळभैरव(कुलस्वामी), व्याघ्रेश्वर, कृष्णनाथ, ब्रह्मदेव, गांगो, केळूबाई,
गणपती, दत्तात्रेय, विठोबा यांस नैवेद्य दाखवितात. काळभैरवाचे 8
ब्राह्मण सांगतात. आश्विन नवरात्रांत अखंड दीप नाहीं. माळ
असते. सुवासिनी, ब्राह्मण नाहीं. मंगलकार्य व प्रसूती यानंतर
बोडण भरतात. गोंधळ नाहीं. वाजते अलंकार घालीत नाहींत.
घराणें 46 वें, मणचें - संगळ
हें घराणें मणचें येथून देशावर नरगुंदकरांच्या आश्रयास गेलें, मणचें येथें
पूर्वी असलेले काशीनाथपंत ऊर्फ धुरो काळे हे यांचे भाऊबंद होत असें
समजतें. परंतु मणचें येथील गजानन महादेव काळे (5) यांजकडून आलेल्या
वंशावळींत काशीनाथ असें नांव आढळत नाहीं. त्यामुळें त्या घराण्याशीं
हें घराणें जोडून दाखवितां आलें नाहीं. हे घराणें पंचप्रवरी
आहे. कुलदेवता -- काळभैरव(काशी). देवाचे नैवेद्य कार्तिक वद्य
8 स काळभैरवजयंतीस काळभैरवास व देवदिवाळीस गांगो, केळो, भराडी (या 3 देवी
आहेत), व्याघ्रेश्वर व ब्रह्मन्देव यांस नैवेद्य असतात.
मंगलकार्यानंतर बोडण भरतात. ओहर जाण्याची चाल आहे.
घराणें 47 वें, कण्हेरी
कण्हेरी हा गांव राजापूरापासून 5 मैलांवर आहे. पोस्ट डोंगर.
लोकसंख्या 1,000. देवस्थान निरंकारी (शंकराचें स्वयंभु
स्थान). ब्राह्मणांचीं पूर्वी 9 घरें होतीं आता 6 आहेत.
त्यांत चित्तपावनांचीं 2 आहेत. या घराण्याचे प्रवर तीन आहेत.
हें घराणें गोळपहून कण्हेरी येथें गेलें असें म्हणतात. निरंकारी,
ब्राह्मणदेव, गंगोबा, जैनोबा, निनादेवी या देवता कण्हेरी या गांवीं
आहेत. त्यांस चैत्र महिन्यांत त्या ठिकाणीं जाऊन एकदां नैवेद्य
करतात. नूतन वधूवरांनीं कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचा प्रघात आहे.
कुलदेवता -- निरंकारी (कण्हेरी). निरंकारी, ब्राह्मणदेव, गांगो,
जैन, आसन या पांच देवतांस दर वर्षीं देवदिवाळीस नैवेद्य घालतात.
हणमंत नारायण (7) विलेंपालर्लें, हे वरील आसनच्या बदली निनादेवी ही देवता
सांगत. वरील सर्व देवतांस चैत्र महिन्यांत त्या ठिकाणीं जाऊन
नैवेद्य केला जातो. तसेंच नूतन वधूवरांनीं कुलदेवतेच्या दर्शनास
जाण्याचा प्रघात आहे असें सांगत. परशुराम विनायक (7) लोणावळा,
यांजकडे नवरात्रांत माळेऐवजीं देवावर फुलांचा घोंस बांधत.
देवांमध्यें घंटा, महालक्ष्मी व्रत व बोडण नाहीं.
घराणें 48 वें, आजगांव
आजगांव हा गांव वेंगुर्ल्याजवळ 17 किलोमीटरवर व सावंतवाडी पासून 21
किलोमीटरवर आहे. हे लोक आजगांवाहून सावंतवाडी, मिरज, पुणें, मुंबई व
नरसोबाची वाडी इकडे गेले. हें घराणें त्रिप्रवरी आहे.
कुलदेवता -- वेतोबा (आजगांव). प्रतिवर्षीं देवदिवाळीस
(मार्गशीर्ष शु. 1) वेतोबा, रवळनाथ, भुकादेवी, रामेश्वर, सोमेश्वर या
देवतांस नैवेद्य दाखवितात. नैवेद्याचा प्रकार -- वडे, रसभात,
भाजी. वेतोबास वडे 25 व बाकीच्या प्रत्येकास 15 वडे. कोंकणी
लोकांस हे नैवेद्य देतात. आश्विनी नवरात्रांत अखंड दीप व माळ.
रा. गोपाळ महादेव (4) यांच्याकडे नवरात्रांत उठती बसती
सुवासिनी असते. मूल झाल्यावर कागवाड येथील देवीच्या दर्शनास
जाण्याची चाल आहे. कागवाड मिरजेपासून 15-20 मैलांवर आहे. डॉ.
वासुदेव बाळकृष्ण (5) यांच्याकडे मंगलकार्यानंतर 100
ब्राह्मणांस भोजन घालावयाचें असतें.
घराणें 49 वें, कडतरी
या घराण्याचें कोंकणांतील मूळ ठिकाण कोणतें हें माहीत नाहीं.
काशीहून शहापूर-बेळगांव या भागांत यांचे पूर्वज आले व तेथून कडतरी (गोवा)
येथें गेले. हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता -- काळभैरव. ग्रामदेवता सातेरी. ग्रामदेवतेस नैवेद्य
वर्षांतून एकदां केव्हां तरी दाखवितात. आश्विन नवरात्रांत
घटस्थापना, दररोज 1 माळ. शेवटच्या दिवशीं ब्राह्मण, सुवासिनी भोजनास
सांगतात. श्रावणांत कुलदेवतेच्या नांवें लघुरुद्र. गोसावी
येतील त्यावेळीं आश्विन महिन्यांत पतीर भरणें.
दत्तात्रय विष्णु (7) पुणें. हे म्हणतात कि, मुळ घराणे
राजापूर, जि. रत्नागिरी या तालुक्यातील असावे. यांच्या पूर्विच्या
पांच पिढ्या कडतरी येथे झाल्या. वतनदार राणें यांचेकडून यांचे
पूर्वजांनी जमीन घेतली. स्वातंत्र्यापूर्वीं राणें यांचे कडे
शेतसारा भरावा लागत असे. पौष महिन्यांत संपूर्ण गांवचा काला हा
उत्सव होतो. गोसावी भांडे घेऊन येतात. तेव्हां देवाला वडे व
गुळणीचा नैवेद्य दाखवितात. तो नैवेद्य गोसावींच्या भांड्यात वाढल्यावर
गोसावी नैवेद्य नेऊन वाहात्या पाण्यांत सोडतात. चुकुन एखादे वर्षीं
नैवेद्य राहिल्यास दुसऱ्या वर्षीं दुप्पट दाखविण्याची प्रथा आहे.
यांच्या घराण्यांत देवांत घंटा नसते. बोडण नाहीं. काळ्या रंगाचे
काहीं अंगावर घालीत नाहींत. वाजते अलंकार वापरीत नाहींत.
घराणें 50 वें, चंद्रगुत्ती
रत्नागिरी जिल्ह्यांत यांचें मूळ ठिकाण कोणतें हें माहीत नाहीं.
यांचे पूर्वज सुमारें 160 वर्षांपासून श्रीशृंगेरी-जगद्गुरु-संस्थानापैकीं
अंदवळ्ळी ग्रामाचे कुळकर्ण्याचे हक्कदारीचें काम करीत असून सध्यांहि
त्यांचे वंशज तें काम करीत आहेत. हें घराणें पंचप्रवरी आहे.
कुलदेवता -- काळभैरव (चंद्रगुत्ती येथें या नांवाचें देवस्थान आहे तेंच
कुलदैवत असावें). नवरात्र नाहीं. सरस्वतीउत्सव असतो.
भाद्रपद शु. 8 स महालक्ष्मीव्रत व केदारेश्वरव्रत असतें.
महालक्ष्मीचा दोरा हातांत बाधितात.
घराणें 51 वें, सातर्डें
या घराण्याचें मूळ ठिकाण आरोस होय. नांदिवडें - पालशेत घराण्यातील
कांहीं मंडळी मूळ आरोसची. परंतु त्यांचा व यांचा संबंध
दाखविण्यासारखी माहिती उपलब्ध नाहीं. हें घराणें पंचप्रवरी
आहे. कुलस्वांमी काळभैरव. आश्विनी नवरात्र नसतें. बोडण,
गोंधळ नाहीं. देवपूजेंत घंटा नाहीं. मुलांनां वाजणारे अलंकार
(घाग-या, तोरड्या इ.) घालीत नाहींत. भाद्रपदांत पार्थिव गणपति आणित
नाहींत.
घराणें 52 वें, मुळगूंद
हें घराणें पंचप्रवरी आहे. कोंकणांतील यांचें मूळचें गांव कोठलें
हें माहीत नाहीं. तासगांव संस्थानांत यांचे पूर्वज होते.
मुळगूंद येथें हरकामे या नांवानें हे ओळखले जातात.
या घराण्याची कुलदेवता भैरी योगेश्वरी आहे. पुढील देवांस वर्षांतून
पांच वेळ नैवेद्य घालतात. ते पांच दिवस - चैत्र शु. 1., विजयादशमी,
कार्तिक शु. 1, देवदिवाळी व रंगपंचमी. देवता -- परशुराम, काळभैरव व
भैरी योगेश्वरी. आश्विन नवरात्रांत अखंड दीप, माळ, उठती बसती
सुवासिनी, ब्राह्मण व कुमारिका असते. मंगलकार्य व प्रसूति यानंतर
बोडण भरतात. गोंधळ नाहीं. महालक्ष्मीचें व्रत करितात, परंतु
घरीं पूजा करीत नाहींत. दत्तात्रेय कृष्ण (6) हे
श्रीकाळभैरवेश्वर यास कुलदेवता मानितात. हा देव सोरटूर (ता. गदग,
जि. धारवाड) येथील असावा असें म्हणतात. तेथें या देवाची अजानुबाहु
मूर्ति 10x5 फूट आकाराची उभी आहे. यांच्या कडे देवदिवाळीस पंचवीस
देवतांना नैवेद्य असतात. नूतन वधूवरांनीं कुलदेवतेच्या दर्शनास
जाण्याची चाल आहे. लक्ष्मण बल्लाळ (2) यांची शाखा जोशी
आडनांव लावते.
घराणें 53 वें, बेळगांव
हें घराणें पंचप्रवरी आहे. कुलदेवता तुळजापूरची देवी. आश्विन नवरात्रांत
अखंड दीप, माळ आणि सुवासिनी, ब्राह्मण यांस भोजन असतें.
घराणें 54 वें, साखळी
कुलदेवता काळभैरव(क्षेत्र काशी). नवरात्रामध्यें काळभैरवव
अंंंंंंबाबाई यांस नैवेद्य असतात. गोंधळ नाहीं.
घराणें 55 वें, हिंदळें
हे घराणें पंचप्रवरी आहे. या घराण्यास जोशीपणाची वृत्ति
मिळाल्यामुळें बहुतेक मंडळी जोशी आडनांव लावितात. परंतु दामोदर
गोपाळ (7) यांचे वंशज काळे आडनांव लावितात. हें घराणें मूळचें
आचरें येथील असून तेथून हिंदळें, वायंगणी व इळयें येथें गेलें.
हिंदळें हें गांव देवगड तालुक्यांत आहे. नारिंग्रें हें गांव
देवगडापासून 8 मैल आहे. मुख्य देवस्थान गांगेश्वर
(नारिंग्रें). ब्राह्मणांचीं घरें 30 असून त्यांत जोशी, अभ्यंकर,
केळकर, खाडिलकर, गद्रे, बर्वे, बापट इत्यादि आहेत. गांवाची
लोकसंख्या 1500 आहे.
रामकृष्ण जनार्दन (8) मालवण.
कुलदेवता-काळभैरव(हिंदळें). देवाचे नैवेद्य देवदिवाळीस 1.
काळभैरव(हिंदळें), 2. रामेश्वर (आचरें), 3. ब्रह्मपुरूष (आचरें).
आश्विन नवरात्रांत दीप, माळ नाहीं. बोडण, गोंधळ नाहीं.
गोविंद विठ्ठल (9) मुणगें-कुलदेवता काळभैरव(हिंदळें), रामेश्वर (आचरे),
श्रीलगेश्वर (इळयें). देवाचे नैवेद्य श्रावणमासीं कोणत्याहि एका
सोमवारीं. आश्विन नवरात्रांत फक्त माळ बांधण्याची पध्दत आहे. नूतन
वधूवरांनीं लग्न झाल्यावर एक वर्षाचेआंत सवडीप्रमाणें गांवचे देवाचे
दर्शनास जाण्याची चाल आहे. महालक्ष्मीचे व्रत आहे. 4-2
वर्षांनीं बोडण भरतात. नियमित नाहीं.
शंकर लक्ष्मण (9) बेळगांव - कुलदेवता- बहिरी व जगदंबा मूळ साळशी, नंतर
हिंदळें - (रामेश्वर, रवळनाथ, गांगो, भावई, पोवइ-वायंगणी येथें).
देवाचे नैवेद्य श्रावणमासांत. नवरात्र हिंदळें येथें गोरे कुलाकडे
सोंपविलें आहे. विशेष कार्य झाल्यास बोडण असतें.
रामचंद्र कृष्ण (9) मिरज. कुलदेवता-श्रीरवळनाथ (वायंगणी).
महादेव सखाराम (9) फणसें. कुलस्वामी - श्रीसिध्दिविनायक.
कुलस्वामिनी जोगेश्वरी-जोगाईचें आंबें (ऐकीव माहिती, नक्की माहिती
नाहीं). देवाचे नैवेद्य - श्रावण महिन्यांत सोमवारी
श्रीरामेश्वरास नैवेद्य घालतात. नवरात्र इत्यादि कोणतेंही वर्षिक
विधान नाहीं. बोडण दर वर्षीं नाहीं, केव्हां केव्हां असतें.
गणेश सखाराम (9) वायंगणी. देवाचे नैवेद्य प्रत्येक सोमवारीं व इतर
सणावारीं पुढील देवतांस असतात. श्रीठाणेश्वर (मुख्य ग्रामदेवता वायंगणी),
रामेश्वर, रवळनाथ, गांगेश्वर. बोडण भरण्याची चाल आहे.
केरो नारायण (8) आंजलर्लें. कुलदेवता - आचरें येथील रामेश्वर व
बहिरी, रवळनाथ-बहिरी. देवाचे नैवेद्य मर्गशीर्ष शु. 1 स वरील देवतांस
घालतात.
घराणें 56 वें, दाभोळकर
हे घराणें मूळ बसणी (ता. रत्नागिरी) येथील होय. तेथून दाभोळ व नंतर
पुणें, विदर्भ, ग्वाल्हेर इत्यादि भागांत गेलें. पुढें इनाम गांव
मिळाल्यामुळें एक शाखा अकोळनेर येथें व दुसरी नवगांव ता. पैठण येथें
स्थाईक झाली. यांचें आडनांव कागदोपत्रीं दाभोळकर असें लागतें.
याचें कारण यांचे पूर्वज दाभोळ किल्ल्याचे किल्लेदार होते असें
म्हणतात. हें घराणें पंचप्रवरी आहे.
अक्षी-नागांव या घराण्यांतील मंडळी दाभोळकर आडनांव लावितात व ग्वाल्हेर
कडील भागांत राहतात. परंंतु या घराण्याचा व त्यांचा काहीं संबंध आहे
असें दिसत नाहीं.
कुलदेवता -- श्रीमहालक्ष्मी (कोल्हापूर), लक्ष्मीकेशव,
रामेश्वर, रवळनाथ, गांवराख्या (बसणीं) या पांच देवतांस देवदिवाळीस नैवेद्य
दाखवितात. शारदीय नवरात्रांत दिवा, माळ व उठती बसती सुवासिनी
असते. एक वर्षाआड गोंधळ असतो. लग्नानंतर नूतन वधूवरांनीं
कोल्हापुरास श्रीमहालक्ष्मीच्या दर्शनास जाण्याची चाल आहे.
महादेव नारायण (3) यांचे वंशज लक्ष्मीकेशव यास कुलस्वामी
मानित. देवदिवाळीस रामेश्वर, सोमेश्वर, कामेश्वर, जोगेश्वरी व
लक्ष्मीकेशव यांस नैवेद्य दाखवित. आश्विन नवरात्रांत अखंड दीप, माळ,
आणि सुवासिनी व ब्राह्मण यांस भोजन असे. मंगलकार्यानंतर गोंधळ असे.
अनंत नारायण (3) यांचे वंशज नैवेद्याच्या पांच देवांत
लक्ष्मीकेशव सांगत. यावरून या घराण्याचा कुलस्वामी लक्ष्मीकेशव आहे
असें मानत. बसणीस लक्ष्मीकेशवाचें देऊळ आहे.
घराणें 57 वें, जोशी
या घराण्यांतील मंडळी जोशी हें आडनांव लावितात. मूळचें यांंचें
उपनांव काळे असल्याचें, विश्वनाथ हरी (2) यांस श. 1672 मध्यें
पेशव्यांकडून इनाम मिळालें. त्या वेळच्या सनदेंत काळे असा उल्लेख
असल्यावरून निश्चित आहे. या सनदेची नक्कल उशीरां मिळाल्यामुळें या
घराण्याचा क्रमांक शेवटीं लावावा लागला. तसेंच व्यक्तींची माहितीहि
सविस्तर आली नाहीं. हें घराणें पंचप्रवरी आहे.
हें घराणें मूळचें चिपळूण-परशरांम येथील. तेथून चिपळें, कोप्रोली व
पळस्पें इत्यादि भागांंत आलें.
कुलदेवता -- विंध्यवासिनी योगेश्वरी देवी. काळकराम, परशुराम,
भार्गवराम नि भैरीनाथ. या देवांस दिवाळीस, देवदिवाळीस व धुळवडीस
घारग्यांचा नैवेद्य असतो. शारदीय नवरात्रांत अखंड दीप, माळ,
सप्तशतीचा पाठ. प्रतिदिवशीं ब्राह्मण, सुवासिनी व कुमारिका यांस
भोजन असतें. लग्नकार्यानंतर बोडण भरतात. महालक्ष्मीची पूजा करीत
नाहींत.
आबाजी विश्वनाथ (3) यांचे वंशज नवरात्रांत वेरगांव येथील वेहराई देवीस खण,
नारळ व पातळ ओटीकरितां पाठवितात. या घराण्यांतील विश्वनाथ हरी (2)
यांस काळूंद्रें गांव नि भैरवहरी (2) यांस चिपळें गांव हे पेशव्यांकडून
इनाम मिळाले आहेत. ऐतिहासिक प्रकरणांत यांच्या सनदा छापिल्या
आहेत. ठाणें जिल्ह्यांत व जव्हार संस्थानांतहि कांहीं जमिनी इनाम
आहेत. पोसरी, तालुका पनवेल हा गांव इनाम होता, तो कन्येच्या
संततीकडे म्हणजे कानिटकरांकडे गेला आहे.
घराणें 58 वें, कारवें-चंदगड
हे घराणें कोल्हापूर, बेळगांवकडे होते. परंतु पूर्वींची माहिती
नसल्यामुंळे आणि पूर्वींच्या पिढीविषयीं माहिती न मिळाल्या मुळे इतर
घराण्यांशी जोडून दाखवितां आले नाही.
या घराण्याचा संबंध वाडा-पडेल घराण्यांशीं आहे असे म्हणतात.
कुलस्वामी -- काळभैरव. देवदिवाळीस नैवेद्य घालीत. कुलस्वामिनी
म्हणूंन कोल्हापूरच्या अंबाबाईस जाण्याची चाल आहे. स्त्रियांच्या
अंगावर काळें घालीत नाहींत. वाजते अलंकार वापरीत नाहींत.
देवांत घंटा नाहीं. बोडण भरण्याची रीत नाहीं.
घराणें 59 वें, कवठेपिरान
हे घराणें मुळचे कोंकणांतील असल्याचे सांगतात. कोलर्ले घराण्याशी
यांचा संबंध असल्याचे सांगतात.
कुलस्वामी -- काळभैरव.
कार्तिक महिन्यांतील वद्य अष्टमीला 8 ब्राह्मण सांगतात. खीर व
वड्यांचा नैवेद्य दाखवितात. महालक्ष्मीचे व्रत नाहीं. बोडण
नाहीं. नवरात्र नाहीं. देवांत घंटा नाहीं. वाजते अलंकार
घालीत नाहींत
घराणें 60 वंे, तासगांव
हें घराणें पडेलशीं आपला संबंध असल्याचें सांगतात. घराणें क्रमांक 1
व या घराण्याचा जवळचा संबंध असावा. त्या काळीं येसंभट, बाळंभट,
कृष्णंभट असे लहिण्याची पध्दत होती. घराणें 1 मधील येसंभट बचाजी व
या घराण्यांतील यशवंत बचाजी हे एकच असावेत असे वाटते. परंतु येसंभट
व यशवंत हे एकच असल्याचा पुरावा नसल्यामुळें ते एकच आहेत हे मानले जात
नाहीं परंतु वाडा-पडेल येथील देवतांचा हे उल्लेख करतात.
कुलधर्म कुलाचार -- मूळ पडेल घराण्यातील रुढी-परंपरांप्रमाणे
कुलदैवत काळभैरवसरस्वती. ग्रामदैवत श्री हंकरेश्वर, जैन
आकारी. कार्तिक पौर्णिमेला श्री हंकारेश्वर मंदिरात गांवातील
मानकरी ब्राह्मण घराणीं त्रिपुर प्रज्वलन करतात. त्या दिवशीं
त्रिपुर पूजनासाठीं तासगांव घराण्यातील मंडळींने पडेलला जाण्याचा
प्रघात आहे. तसेच कुटुंबात लग्न मुंज इत्यादि मंगल कार्य झाल्यास
ग्रामदैवतेला पोषाख व श्रीफळ देण्याची प्रथा आहे. बोडण नाहीं.
वाजणारे अलंकार स्त्रियांनी वापरावयाचे नाहींत. देवांतील घंटेला
लोलक नाहीं.
घराणें 61 वें, डोंबिवली
हे घराणें बेळगांव येथून डोंबिवली कडे आले. बेळगांव येथे कोठून आले
ते माहीत नाहीं. गणपति कुलदेवता मानतात. गौरी-गणपतीचा सण
करतात. बोडण नाहीं. महालक्ष्मीचे व्रत नाहीं. वाजते
अलंकार घालीत नाहींत. काळें वापरत नाहींत. देवांत घंटा
नाहीं. नैवेद्य घालण्याची प्रथा नाहीं.
घराणें 62 वें कल्याण - मुंबई
हे घराणें व 33 वें पालशेत-कल्याण हीं दोन्हीं एकच असल्याचें
समजतें. परंतु ठोस पुराव्या अभावीं एकत्र दाखवितां येत नसल्यामुळें
वेग वेगळीं दाखविण्यांत येत आहेत. घराणें क्र. 33 मधील वासुदेव गणेश
(7) हे यांचे संबंधी असल्याचे यांना माहित आहे.
कुलधर्म कुलाचार - घराणें पालशेत-कल्याण प्रमाणेंच असल्याचे सांगतात.