काळे कुलवृत्तान्त

 

 

 




कुलस्वामी आणि कुलस्वामिनी

                    पूर्वींच्या कुल-वृत्तांतात भृगू पासून जामदग्न्यांपर्यंत माहिती लहिली आहे.  त्यानंतरच्या काळात परशुरामाने कोकणभूमी निःक्षत्रिय केली.  या बाबत पुष्कळ कथा पुराणांत सांगितलेल्या आहेत.  त्यानंतर कोकणभूमीत चित्पावनांची वस्ती वाढत गेली.  
                    शेती, वेदाध्ययन, पौरोहित्य आणि कारकुनी हे चित्पावनांचे कोकणातील मूळचे व्यवसाय, आणि गुहागर, चिपळूण, जंजिरामुरुड, दाभोळ (दाल्भ्य), राजापूर, श्रीवर्धन हा कोकणातील टापू त्यांचे मुख्य वसतिस्थान.  चिपळूण (परशुराम क्षेत्र) हे अर्थातच त्यांचे आद्यदैवतस्थान.  कालांतराने जसजशी उदरभरणासाठी अवती भोवती स्थलांतरे होऊ लागली तसतशी दैवतांतही भर पडू लागली.  चित्पावनांची आजमितीस तीस-चाळीस कुलदैवते आहेत.   त्यातील बहुसंख्य कोकणात आहेत.  चौदा गोत्रे कायम राहिली, पण दैवते आणि आडनावे (कुलें) कितीतरी वाढत गेली.  महाराष्ट्रांत ज्या तीन देवी आहेत (कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आणि अंबाजोगाईची अंबा) त्याही अनेक चित्पावन कुलांच्या कुलदेवता आहेत.  शिवोपासक चित्पावन या तिन्ही देवींना पार्वतीच्या रूपांत पहात असावेत.  तुळजापूर आणि अंबाजोगाईसारख्या पूर्वेकडील दूरच्या रखरखीत प्रदेशातील या देवता चित्पावनांच्या कुलदेवता कशा काय झाल्या याची नीट संगती लागत नाही.  पुण्यातील एका भावेकुलाचे उपास्य दैवत श्रीखंडोबासुद्धा आहे.  मूळ दैवते आणि स्थानिक दैवते या दोन्हींची सांगड घालण्याचा हा प्रकार दिसतो.  गणेशदैवताला चित्पावनांत असाच मान आहे.  चित्पावन समाज पेशवाईपासून देशावर भराभर स्थायिक होत गेला आणि त्याने स्थानिक परिस्थितीतील कित्येक देवदेवता, आचार वगैरे नव्याने आत्मसात केले.  चित्पावनी मूळ बोली आता प्रायः लोपली असून मराठी भाषेत ती जिरून गेली आहे.  सध्या चित्पावनांची काही लोकसंख्या देशावर आणि अल्प संख्या कोकणात आहे.  अर्थात महानगरपालका असणारी मोठी शहरे आणि जिल्ह्यांची ठिकाणे इथे त्यांच्यातील बहुसंख्य वस्ती आहे.
                    कोकण सोडून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आज जे चित्पावन स्थायिक झालेले दिसतात, त्यांच्या आठ /नऊ पिढ्या तरी देशावर जगलेल्या आहेत.  पण असे असले तरी निसर्ग सुंदर कोकणाविषयी त्यांच्या मनांत विलक्षण आकर्षण असते.  आपले मूळ गाव एकदा बघावे, कुलदैवताचे, ग्रामदैवताचे दर्शन घ्यावे असे प्रत्येक चित्पावनाला वाटत असते.  कोंकणची लालसर माती, सागरकिनारे, नारळी पोफळी-आंब्याच्या बागा एकदातरी पाहिल्याविना चैन पडत नाही.  
                    आपले पूर्वज कोण होते, कुठे होते, त्यांनी त्या काळात काय केले, आपल्यासाठी कोणता वारसा ठेवून ते गेले या बद्दल कोणत्याही समाजाला आकर्षण वाटतेच.  या सगळ्याचा पद्धतशीरपणे शोध घेणे आणि तो संगतवार सांगणे हेच इतिहासकाराचे काम असते.  प्रमाणभूत ठरणा‍र्‍या साधनांच्या आधारे केलेले जास्तीत जास्त अचूक संशोधन हेही इतिहास या संकल्पनेत समाविष्ट असते, तर स्थलकालपरिस्थिती यांच्या संदर्भात केलेले विश्लेषण आणि कार्यकारणमीमांसा ही इतिहासाचे आवश्यक अंग असते.  इतिहासाची साधने जितकी अस्सल आणि इतिहासकाराची सत्यनिष्ठा जितकी प्रबळ तितक्या प्रमाणात इतिहासग्रंथ प्रमाणभूत ठरतो.  टिकून राहणे (रूढी) आणि बदलणे (परिवर्तन) असे परस्परविरोधी वाटणारे घटक इतिहासात अंतर्भूत असतात.  संपूर्ण राष्ट्राचा इतिहास लहिला जातो, तसा विशिष्ट प्रांताचा किंवा राज्यांचाही इतिहास लहिता येतो.  त्या त्या ठिकाणचा आपला परिसर, तेथील समाज, चालीरीती, जीवन पध्दती या सगळ्यांबद्दल अभिमान व्यक्त करायचा असतो.  इतिहास काय किंवा परंपरा काय यांना दीर्घकालाचा आधार असतो.  भूत, वर्तमान आणि भविष्य अशा त्रिकालाची जाणीव हे मानवाचे मुख्य वैशिष्ठ्य असते.  इतर पशु-पक्षी फक्त वर्तमानापुरते पाहू शकतात.  काही थोडे नजीकच्या भविष्यकाळासाठी तरतूद करत असतात.  मानव हाच एक असा सजीव प्राणी आहे की, ज्याला आपल्या भूतकालाची पदोपदी जाणीव असते.  आपण एका दीर्घकालीन घटनाक्रमाचा परिपाक आहोत, असे मनात आल्याखेरीज इतिहास, संस्कृती, परंपरा हे शब्द वापरताच येणार नाहीत.  आपले वाडवडील, त्यांचे पूर्वज, आपल्या पूर्वजांचे पूर्वज या क्रमाने लावता येईल तितका भूतकालाचा छडा लावण्याचा आपला प्रयत्न असतो.  वर्तमानकाळात आपण स्वतः वावरत असल्यामुळे त्याचा अनेक अंगानी अनुभव घेऊ शकतो.  पण भूत-भविष्याचे तसे नसते. भविष्यकाळ तर अज्ञातच असतो.  त्यामुळे त्याच्या बद्दल कल्पना करणे, अपेक्षा बाळगणे आणि स्वप्ने रंगविणे एवढेच माणसाला शक्य असते.  त्या मानाने भूतकाळाबद्दल पुष्कळच ठामपणे आपल्याला विचार करता येतो.  अर्थात कालप्रवाह जसजसा पुढे जात राहील तसा भूतकाळ अस्पष्ट, धूसर आणि गूढ बनत जातो.  पण अशा गूढ गोष्टींचाही काही प्रमाणात उलगडा करता येतो.  कारण भूतकाळाचे अनेक अवशेष उरलेले असतात.  वाडे, किल्ले, मंदिरे, तीर्थक्षेत्रे अशा स्वरूपांत उरलेल्या इतिहासाचा आजही आपण अनुभव घेऊ शकतो आणि कागदपत्रे, सनदा, पोथ्या, वंशावळी अशा प्रकारच्या दस्तऐवजांच्या साहाय्याने इतिहासाचा शोध घेऊ शकतो, आणि म्हणूनच प्रस्तुत कुलवृत्तांताचे नूतनीकरण करण्याचा हेतू आहे.
पूर्वीं कोकणातील चित्पावन ब्राह्मणांत काळे कुलातील लोकही वावरत होते.  याला ऐतिहासिक पुरावा म्हणूंन सन 1470 चे सुमाराचा आहे.  गौतमाई नावाची चिपळूणची कुळकरणीण शिवाजी छत्रपती व संभाजी छत्रपती यांच्या वेळी होती.  तिची वंशावळ :-
मूळ संपादक नरसीपंत काळे 1470 चे सुमारास

विनाजी नरसी  1500

पर्शराम  1530

काळो पर्शराम 1555

अंतो काळो

स्त्री गौतमाई शके 1580 सुमारास
                    काळे कुळकर्ण्याच्या ह्या उल्लेखावरून दिसते की, शके 1470 च्या सुमारास नरसीपंत काळ्याने चिपळूणचे कुळकरण संपादिले.  हे कुळकरण 1470 च्या पूर्वींच संपादिलेले असावे.  पूर्वजांनीं अंगिकारलेल्या चाली-रीती आजतागायत पुढे चालू आहेत.  कारण अशा चाली-रीती मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे येत असतात.  त्यांचे स्थलांतर झाल्यास त्या परिसरातील चाली-रीतींची त्यात भर पडून जशी दहा कोसांनी भाषा बदलते तशा बदलत जातात. त्याला तेथील परिस्थिती कारणीभूत ठरते.
कुलस्वामी काळभैरव
                    वत्सगोत्री काळे कुलाचे, काळभैरव कुलदैवत असल्याचे बहुतेक घराण्यांना मान्य असल्याचे समजते.  कारण पुष्कळ घराण्यांनी आपला कुलदेव काळभैरव सांगितला आहे.  या काळभैरवा बद्दल प्रस्तुत आवृत्तीत अन्यत्र माहिती आली आहे.  याची मंदिरे पुष्कळ ठिकाणी आहेत.  परंतु जेथे पापक्षालन केल्यावर शिवाने त्याची कोतवाल म्हणून नेमणूक केली ते मंदिर काशी क्षेत्री आहे.  त्याचे दर्शन घेतल्या शिवाय काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतल्याची फलश्रुती होत नाही, असे पुराणकालापासून मानले आहे.  काळभैरव मंदिराशिवाय, अष्टभैरवांची काशी मध्ये शिवाने निर्मिती केली असून काशीच्या अष्टदिशांना त्यांची स्थाने आहेत. ती पुढील प्रमाणे  --  1)  श्री रुरुभैरव - हनुमान घाटावर.  2)  श्री चंडभैरव - दुर्गाकुंडाजवळ दुर्गादेवी मंदिरांत.  3)  श्री असितांग भैरव - वृध्द काल येथे अमृत कुपाजवळ.  4)  श्री कपाल भैरव - कपाल मोचन तीर्थावर, लाट भैरव या नावाने.  5)  श्री क्रोधन भैरव - बटुक भैरव या नावाने कामाक्ष्य क्षेत्रात.  6)  श्री उन्मत्त भैरव - देवरागावाजवळ.  7)  श्री संहार भैरव - पाटण दरवाजा, गायघाटावर.  8)  श्री भिषण भैरव - भूत भैरव महालांत भूत भैरव याच नावाने.
                    कालभैरवाच्या जन्मकथा सर्वांच्या परिचयाच्या असल्यामुळे येथे विस्तृत प्रमाणात दिली नसून काळभैरवाची स्तोत्रे या ग्रंथाच्या शेवटी दिली आहेत, त्यांत सविस्तर वर्णन आले आहेच.
कुलस्वामिनी महासरस्वती
                    भारतीय संस्कृतीत सरस्वती देवीला फार आदराचे स्थान आहे.  सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येला प्रारंभ करताना आधी तिचे पूजन केले जाते.  नवरात्रात देखील सरस्वतीपूजनाची प्रथा आहे.
                    प्राचीन काळी शेती करणे व वेदाध्ययन करणे हेच प्रमुख व्यवसाय असल्यामुळे ब्राह्मण वर्ण शेतकरी बनला होता व त्यांची वस्ती सरस्वती नदीच्या पात्रात होती.  
                    प्रत्येक देवतेला एक इतिहास असतो, एक परंपरा असते.  सरस्वतीचा इतिहास व परंपरा आपल्याला ऋग्वेद काळा पासून पाहायला मिळते.  ऋग्वेदापासून ते आधुनिक संस्कृत साहित्यापर्यंत सरस्वतीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात.  ऋग्वेद हा भारतीयांचा सर्वांत प्राचीन ग्रंथ.  प्रत्येक गोष्टीला आधार आपण ऋग्वेदातून देत असतो. ऋग्वेदकाळी सरस्वतीचे नदीच्या स्वरूपात वर्णन केले आहे.  प्रबल प्रवाहमयी या नदीच्या काठावर ऋषीलोक तपश्चर्या करीत असत, मंत्र म्हणत असत. या नदीचे स्वरूप पाहिल्यावर आपोआप त्यांच्या तोंडून मंत्र स्फुरू लागले, सूक्ते रचली जाऊ लागली.  ऋषी तिला वाणी ज्ञान, व वाग्मिता यांची देवी समजू लागले.  तिला विद्येची देवता मानून तिचे मानवीकरण केले गेले.  मानवाप्रमाणे तिच्या सौंदर्याचे, तिच्या अवयवांचे वर्णन केले गेले.  सुयामा, सुभरा, सुपेशा, सुविग्रहा इत्यादि विशेषणांनी तिचा गौरव केला आहे.  
वर्ध शुभ्रे स्तुवते रासि वाजान्यूयं पात स्वस्तिभि सदा नः । (ऋ.6/95/6)
                    या मंत्रात तिच्याजवळ कल्याणाची प्रार्थना केली आहे. वसिष्ठ ऋषी तिच्या काठावर तपस्या करीत असत त्यावेळी ते तिची प्रार्थना करीत असत की, हे सरस्वती तू आम्हाला भरपूर अन्नधान्य पुरव.  या ठिकाणी सरस्वतीला नदीच्या स्वरूपातच मानण्यात आले आहे.  भारती आणि इला ही दोन पर्यायी नावे आहेत.  पण या तिघीजणीं एकरूपच आहेत.  
पावकाः नः सरस्वती वाजें भिर्वाजिनीवती यज्ञं वष्टु धियावसुः
चोदयित्री सूनृतानां चेतन्ती सुमतीनाम् यज्ञं दधे सरस्वती ।।
                    वरील मंत्रावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सरस्वती जशी विद्येची देवता आहे, तशीच ती धन देणारी व प्रेरणा देणारी पण आहे.  ती ज्ञान देते, ज्ञानाच्या साह्याने धन मिळते.  ज्ञानामुळेच जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.  धन देणारी म्हणून आणखी एका मंत्रात सरस्वतीचा उल्लेख आला आहे.
यो रत्नधा वसुविद्यः सुदत्रः सरस्वति तमिह धातवे कः ।
                    सरस्वतीचे अनेक नात्यांमध्ये वर्णन केले आहे.  काठावरच्या लोकांना भरपूर अन्नधान्य देऊन त्यांचे पोषण करते म्हणून तिला माता म्हटले आहे (अम्बितात्मा, सिंधुमाता).  सिंधुमाता याचे स्पष्टीकरण सुद्धा अनेक विद्वानांनी भिन्न प्रकारे केले आहे.  कुणी मातृभृता, महापूराची माता तर सिन्धुमाता म्हणजे सागराची माता.  प्रत्येक गतिशील जीवनाची माता.
                    सरस्वतीला इंद्रपत्नी मानतात.  इंद्र ही पर्जन्याची देवता आहे.  आपल्या वज्राने तो वृत्रासुराचा नाश करतो व पाऊस पाडतो.  नद्या-नाले पाण्याने भरून वाहू लागतात.  नद्यांना इंद्राची पत्नी मानतात.  सरस्वती ही त्यांतील एक.  दोघांचा संबंध जलाशी आहे.  
                    ऋग्वेदांत सरस्वतीचे वर्णन पुरुष देवतांबरोबर तसेच स्त्रीदेवतांबरोबर आले आहे.  मित्र, दक्ष, वरुण, सोम, अश्विन, मरुत्, अग्नी, इंद्र, विष्णू, रुद्र, पूषन्, बृहस्पती, वायू इत्यादी पुरुष देवतांबरोबर सस्वतीचे वर्णन आढळते.  तसेच अदिती, राका, इंद्राणी, पृथ्वी, पूर्णधी, इला, भारती या स्त्रीदेवतांशींही तिचा संबंध आला आहे.
                    सरस्वतीच्या उत्पत्ती बाबत श्री दुर्गासप्तशती, (देवी माहात्म्य) या ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे.  सत्त्व-रज-तम अशी त्रिगुणात्मक परमेश्वरी महालक्ष्मी सर्व सृष्टीचे आदिकरण आहे. तिची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे आहेत.  मायोपाधीने लक्ष्य व ब्रह्मरूपाने अलक्ष्य रूप असलेली ती अखिल विश्वास व्यापून राहिलेली असून ती हाती मातुलींग, गदा, खेट व पानपात्र धारण करते तर मस्तकावर नाग, लग आणि योनी ही चिन्हे धारण करते.  तप्त सुवर्णांच्या वर्णाप्रमाणे कांती असलेली व तप्त होऊन शुध्द झालेल्या सुवर्णांच्या अलंकारांनी नटलेल्या अशा तिने हे सर्व शून्य (अवकाश) आपल्या तेजाने भारून टाकले आहे.  अशी ही रजोगुणी महालक्ष्मी आपली विविध रूपे धारण करणारी आहे.  पुढे तिने स्वतः ब्रह्मदेव व लक्ष्मी यांना जन्म दिला तसेच तिच्या सांगण्यावरून महाकालीने शंकर व त्रयी विद्या यांना आणि महासरस्वतीने विष्णु व गौरी यांना जन्म दिला अशा प्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ       झाला आणि महालक्ष्मी ही विश्वाचे आदिकरण ठरली.
या शून्य विश्वामध्ये त्रिगुणात्मक परमेश्वरी महालक्ष्मीने केवळ तमोगुणाने दुसरे रूप धारण केले.  ते रूप म्हणजे काळ्याशार काजळा सारखी, दाढांमुळे वदन सुशोभित दिसणारी विशाल डोळ्यांची, शरीराचा मध्यभाग अत्यंत अरुंद असलेली ती नारी झाली.  तिचे चार हात खड्ग, पानपात्र, नरमुंड व ढाल यांनीं सुशोभित झाले होते तर तिने छातीवर नरदेहमाला व मस्तकावर नरमुंडमाला धारण केलेली होती.  त्या श्रेष्ठ तमोगुणी देवीस महालक्ष्मीने महामाया, महाकाली, महामारी, क्षुधा, तृषा, निद्रा, तृष्णा, एकवीरा, कालरात्री व दुरत्यया त्या त्या कर्मांस अनुसरून अशी नावें दिलीं.  त्यामुळे तांत्रिक-मांत्रिक लोकांनी तिला कुलस्वामिनी मानले.
                    महालक्ष्मीने अत्यंत शुध्द सत्वगुणाने चंद्राच्या प्रभेप्रमाणें तेजस्वी असे दुसरे रूप धारण केले.  अक्षमाला, अंकुश, वीणा व पुस्तक धारण करणारी अशी ती श्रेष्ठ नारी झाली आणि महाविद्या, महावाणी, भारती, वाणी, सरस्वती आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा व सुरेश्वरी अशी नावे धारण केली.
                    नंतर त्या तिघींनी बहिणभावंडांची स्वतःला अनुरूप अशी मिथुने निर्माण केली.  महालक्ष्मीने स्वतःला अनुरूप सुवर्णाच्या अंतर्भागाप्रमाणें सुंदर कमलासनावर असलेली स्त्री पुरुषांची जोडी निर्माण केली व त्या नरास ब्रह्मन, विधे, विरिंची, धात या नावानी संबोधिले व त्या नारीस पद्मे, श्री, कमले व लक्ष्मी या नावाने संबोधिले. त्याच प्रमाणे महाकाली व सरस्वती यांनींही आपापली मिथुने निवडली.  त्यांत महाकालीने निळ्या कंठाचा आरक्त बाहू व गोरेपान अंग असलेला आणि मस्तकावर चंद्र धारण केलेला पुरुष तसेच गोरीपान स्त्री ही जोडी निर्माण केली.  तो पुरुष रुद्र, शंकर, स्थाणूं, कपर्दी व त्रिलोचन या नावांनीं तसेच ती स्त्री वेदत्रयी, विद्या, कामधेनू, भाषा व स्वराक्षरा ह्या नावांनी ओळखली गेली.
                    महासरस्वतीने गौरवर्णी स्त्री व कृष्णवर्ण पुरुष निर्माण केला.  त्या कृष्णवर्ण पुरुषास विष्णु, कृष्ण, हृषिकेश, वासुदेव, जनार्दन व स्त्रीस उमा, गौरी, सती, सुंदरी, सुभगा व शिवा ही नावे दिली.  अशा प्रकारे त्या तिन्ही मुलप्रकृतिक स्त्रिया तात्काळ पुरुष भावास प्राप्त झाल्या.  नंतर महालक्ष्मीने ब्रह्मदेवास त्रयी, रुद्रास गौरी व वासुदेवास श्री पत्नी म्हणून दिली.
                    ब्रह्मदेवाने सरस्वतीचे साह्य घेऊन अंड ब्रह्मांड निर्माण केले, पराक्रमी भगवान रुद्राने गौरीचे सहाय्य घेऊन त्या अंडाचा भेद केला.  त्या ब्रह्मांडामध्ये महतत्त्वादी प्रकृतिभूत प्रधानादि कार्ये व पंच महाभूतात्मक सर्व स्थावर जंगम जग उत्पन्न झाले.  लक्ष्मीचे सहाय्य घेऊन विष्णूने त्या जगाचे पालन पोषण केले.  
                    जी देवी त्रिगुणा (महालक्ष्मी), तामसी (महाकाली) व सात्त्विकी (महासरस्वती) अशी तीन प्रकारची सांगितली तीच शर्वा, चंडिका, दुर्गा, भद्रा व भगवती या पाच नावांनी संबोधिली जाते.  ब्रह्मदेवाने मधुकैटकाच्या संहारासाठी जिचे स्तवन केले ती विष्णूची योगनिद्रा म्हणजेच तमोगुणी महाकाली होय.  तिला दहा मुखे, दहा हात व दहा पाय असून तिची कांती काळ्याशार काजळाप्रमाणे आहे.  चकाकणारे दात व दाढा या मुळें ती अक्राळ विक्राळ रूपाची असूनही रूप, सौभाग्य, कांती व महासंपती यांचे ती अधिष्ठान आहे.  ती देवी तलवार, बाण, गदा, शूल, शंख, चक्र, भुशुंडी, परिघ, धनुष्य व रक्त ठिपकणारे मस्तक या वस्तू आपल्या दहाही हातांत धारण करते.  तीच महाकाली म्हणजे विष्णूची दुस्तर माया होय.
                    महिषासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात त्रिगुणात्मिका महालक्ष्मीच आहे.  तिचे वदन धवल, हात निळे, स्तन मंडल अत्यंत शुभ्र, कटिप्रदेश, पाय व जघन हे अवयव आरक्त असून ती मद्यपानामुळेउन्मत्त अवस्थेत असते.  तिचा जघन भाग चित्रविचित्र असून तिने चित्र विचित्र रंगाच्या माळा, वस्त्र व अलंकार परिधान केलेले आहेत.  विविध प्रकारच्या सुगंधी उट्या अंगाला लावल्या आहेत व तिच्या ठायी कांती, सौंदर्य व सौभाग्य यांचा प्रकर्ष झालेला आहे.  हजार हात असूनही ती अठरा हातांचीच मूर्ती पूजनीय आहे.  उजव्या बाजूच्या खालच्या हाता पासून डाव्या बाजूच्या खालच्या हाता पर्यंत क्रमाने धारण केलेली अक्षमाला, कमल, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, शंख, घंटा व पाश अशी आयुधे आहेत.  शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, आणि कमंडलू ह्या आयुधांनी तिचे हात अलंकृत झालेले असून कमळावर बसलेली, सर्व देव स्वरूपी व जगत्स्वामिनी अशी ही महालक्ष्मी आहे.
                    गौरीच्या देहापासून प्रकट झालेली ती शुंभासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात केवळ सत्त्वगुणाश्रया महासरस्वती होय.  ती अष्टभुजा देवी बाण, मुसळ, शूल, चक्र, शंख, घंटा, नांगर आणि धनुष्य ही आयुधे धारण करते.
                    या महासरस्वती देवीला निरनिराळ्या प्रकारांनी ओळखले जाते ते तिच्या विविध रूपांवरून.  ऋग्वेदकाळीं माता, वाणीची देवता (वाग्देवता), शत्रुसंहारक देवता, यज्ञदेवता आणि नदी (सलीलरूप) तर यजुर्वेदामध्ये ऋणमोचन देवता म्हणून हिचा उल्लेख आढळतो.
                    सरस्वती अथवा शारदा ही देवता विद्या अथवा कला यांची देवता मानली जाते.  वाक्, वाग्देवी, वागिश्वरी, वाणी, भारती, वीणापाणि अशी अन्य नावे सुध्दा आहेत.  सरस्वती शब्दाचा अर्थ गतिमती असा आहे.  आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रीय रूप आहे.  म्हणूनच तिला ब्रह्मा-विष्णु-महेश या सर्वांना गती देणारी शक्ती असे म्हणतात.  सरस्वतीचा वर्ण उज्ज्वल असल्यामुळे ती ज्योतिर्मय ब्रह्माचे प्रतीक आहे.  याच अर्थाने ती ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिमूर्तींना पूज्य आहे.  त्यामुळे तिचे नाव तिन्ही देवतांसोबत जोडले जाते.
                    ऋग्वेदात तिला देवता न म्हणता नदीचे मानवी स्वरूप मानले आहे.  दुसऱ्या एका ठिकाणी तिला देवतांची राणी म्हटले आहे (ऋ.8.89,10-11), उपनिषदांत सरस्वतीची वाणीशी एकरूपता मानलेली आहे. प्रज्ञावृद्धीसाठी आणि गोडवा येण्यासाठी उपनिषदांत तिची प्रार्थना केलेली आढळते.
                    पुराणांत सरस्वतीला कुठे ब्रह्मदेवाची पत्नी, तर कुठे त्याची कन्या असे म्हटले आहे. विष्णु धर्मोत्तर पुराण, अशुमद्, भेदागम्, पूर्णकारणागम्, रूप मंडन इत्यादी ग्रंथाने तिचे स्वतंत्रपणे वर्णन केले आहे ते असे - सरस्वती शुभ्रवर्ण, शुभ्र वस्त्र धारिणी, अलंकार विभूषित, चतुर्भुज, पुंडरीक (शुभ्रकमल), माला, वीणा व कमंडलू धारण करणारी आहे.  पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख चिन्हे आहेत.
                    बृहदारण्यकात तिला धेनू म्हटले असून तिची उपासना करण्यास सांगितले आहे.
                    वाचं धेनुमुपासीत ।  तस्याश्चत्वारस्तनाः । स्वाहाकारो वषट्कारो हन्तकारः स्वधाकारः। तस्या द्वौ स्तनौ देवा उपजीवन्ति स्वाहाकारं वषट्कारं च । हन्तकारं मनुष्याः स्वधाकारं पितरः। तस्याः प्राण ऋषभो मनोवत्सः ।।
                    (वाचारूपी धेनूची उपासना करावी. स्वाहाकार, वषट्कार, हन्तकार व स्वधाकार असे तिला चार स्तन आहेत.  पहिल्या दोन्हीकडून देव आपले उपजीवन मिळवतात.  तिसरा व चौथा हे अनुक्रमे मनुष्य व पितर यांना उपजीवन देतात.  प्राण हा या धेनूचा वृषभ असून मन हे तिचे वासरू आहे.)
 श्वेत हंस हे सरस्वतीचे वाहन कल्पिलेले आहे.  सरस्वती ही कधी हंसावर बसलेली आहे अशा स्वरूपात पाहण्यात येते.  तर कधीं कधीं हंस तिच्या मागे असतो. कोठे कोठे तिच्या मागे मोरसुद्धा दाखवितात.
                    हिंदू, बौध्द व जैन या सर्व धर्मामध्ये सरस्वती ही पूज्य मानली गेली आहे.  स्कंद पुराणात शिवाची शक्ती अशा कल्पनेने तिचे रूप ध्यान वर्णिलेले आहे.  ते असे - जटामुकुट, त्यावर चंद्रकोर, गळा निळा, त्रिनेत्र. या वर्णनावरून ही सरस्वती शिवाचे स्त्रीरूप वाटते.  सरस्वतीची द्विभुज व चतुर्भुज ही पौराणिक रूपे आहेत.
संत काळात संत ज्ञानेश्वरांनी गुरुस्तवनांत शारदेचा उल्लेख वागेश्वरी असा केला आहे.  त्यानी एका श्लोकात -
जी आपुलया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगीकारी
तो वाचस्पतीशी करी । प्रबंधुहोडा ।।  (अ.10 ओ.8)
वागेश्वरी आणि वाचेचा अनोन्य संबंध असल्याचे दर्शवितात. तसेच
आता अभिनव विग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ।।  (अ.1 ओ.21)
                    यात सरस्वतीचे सर्व कर्तृत्व, स्वरूप सामावलेले आहे.  वाङमय सृष्टी, साहित्य सृष्टी यांचे अधिष्ठान व वाचेचा नित्यनूतन विलास अशा स्वरूपातील शारदा ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावी.
                    ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायांत संत ज्ञानेश्वरांनी शिवाची शक्ती अशा अर्थाने उल्लेख केला आहे -
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रुप आभासु ।
तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ।।
                    ब्रह्मदेवाची मुलगी म्हणून सरस्वती ही नामदेवांना पूज्य आहे.  तसेच त्यांनी तिला सारजा असे संबोधिले आहे.
संत एकनाथांनी नाथ - भागवताच्या पहिल्या अध्यायात वंदन करताना सारासार विवेक मूर्ती असे म्हटले आहे.  त्यानीही तील शिवशक्ती रूपात पाहिले आहे -
आतां नमूं सरस्वती । जे सारासार विवेकमूर्ती ।
चेतनारूपे इंद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ।।
जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक ।
जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभा ।।
ते शिवांगीं शक्ति उठी । जैसी डोळ्यांमाजी दिठी ।
कीं रस रसत्वें दावी पुष्टी । फळपणें पोटीं फळाचा ।।
सारखे अंगी स्वादू । कीं सुमनामाजीं मकरंदु ।
तैसा शिवशक्ति संबंधूं । अनादिसिद्धु अतर्क्य ।।
ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूंवाचांमाजी वाढी ।
म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थीं चोखडी चवी दावी ।।
                    संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात -
आम्हीं मानवानीं वर्णावे तें काय ।
सुरवर पाय वंदिताती ।।1।।
गणेश शारदा करिती गायन ।
आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ।।2।।
                    संत रामदासांनी सरस्वतीचे नमन व्यापक प्रमाणात केले आहे.  शारदा वेदमाता, ब्रह्मसुता, महामाया व वाग्वदेवता आहे.  ही महापुरुषाची पत्नी असून ती तूर्या या अवस्थेशी संलग्न आहे.  हिच्या मुळेच मोठे मोठे साधू महत्कार्यांस प्रवृत्त झाले.  शांती विरक्ती या हिच्या शोभा आहेत.
                    अनंत ब्रह्मांडाच्या घडामोडी ही लीलेने करते व स्वतः आदिपुरुषी दडून रहाते.  ब्रह्मादिकांना हिचा पार कळत नाही.  ज्ञानशक्ती व जाणीवस्फूर्ती हिलाच म्हणतात. स्वरूपाला शोभा हिच्यामुळे आली आहे व शब्दाद्वारेच ही संसाराचा नाश करते.  योगी पुरुषांची लावण्यखाणी अशी सत्रावी कळा ती ही शारदाच होय.   ही सरस्वती म्हणजेच वेदमाता होय.
                    वेद हे ज्ञानाचे भांडार आहेत.  वेदांची संख्या चार आहे.  तेव्हा सरस्वतीला चार तोंडे असतात.  काही ठिकाणी मात्र पाच तोंडे असल्याचा उल्लेखही आहे. सरस्वती पित्याला-ब्रह्मदेवाला-चार तोंडे असल्यामुळे सरस्वतीला चार तोंडे दाखविली आहेत.  मत्स्य व वायुपुराणात सरस्वतीला चार तोंडे असल्याचा उल्लेख आहे.
या सरस्वतीची नाना रूपे वर्णिलेली आहेत.  ज्याला ज्याप्रमाणे भावली त्याने त्या प्रमाणे वर्णन केलेले आहे.  सरस्वती ही एक अतिप्राचीन नदी असून ती पवित्र मानण्यात येते.  ऋग्वेदकाळातही तिचे पावित्र्य दृग्गोचर झाले होते. ` हे श्रेष्ठ नदीदेवी सरस्वती, आम्ही अज्ञान आहोत, तेव्हा आम्हाला तू प्रकाशित कर.  तुझ्यावरच आमचे जीवन अवलंबून आहे ` अशी एक तिची प्रार्थना त्याकाळीं केली होती.
                    सरस्वती पूर्ववाहिनी होऊन पुढे गुप्त झाली आणि प्रयाग क्षेत्री गंगा-यमुनेला मिळाली.  जेथे ती मिळाली तोच त्रिवेणी संगम.  त्यालाच `तीर्थराज ` असेही म्हणतात.
                    सरस्वतीच्या उत्पत्ती बाबत निरनिराळ्या पुराणांतून निरनिराळ्या कथा आल्या आहेत.  त्या अशा  : एकदा वडवानल अग्नी सर्व देवांना कष्टवू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाने आपली कन्या सरस्वती हिला त्या वडवानल अग्नीचे विसर्जन सागरात करण्यास सांगितले.  सरस्वतीने नदीरूप धारण केले व वडवानल अग्नीला एका कलशात घालून ती हिमालयावर अवतरली.  मार्गामधील पापी जनांचा आपल्याला स्पर्श होऊ नये म्हणून ती विनसन येथे भूगर्भात शिरली; त्यामुळे वडवानलाला ताप असह्य झाला की तो भूतलावर प्रकटू लागे.  शेवटी पश्चिमेकडील समुद्रात प्रभासक्षेत्री सरस्वतीने वडवानल अग्नीचे विसर्जन केले.  अशी कथा पद्मपुराणात आली आहे.  तर वामन पुराणानुसार शिवाने ब्रह्महत्येच्या पातकक्षालनार्थ सरस्वतीत बुडी मारली, तोच ती गुप्त झाली, असे आहे. उतथ्य ऋषींच्या शापामुळे सरस्वती मध्य प्रदेशात जाऊन ती मूषक बनली अशीही एक कथा प्रसृत आहे.
                    ब्रह्मवैवर्त पुराण व देवी भागवत पुराण यांतील कथांचा आशय एकच आहे, तो असा की, श्रीविष्णूंच्या पत्नी तीन - लक्ष्मी, गंगा व सरस्वती.  एकदा गंगा व सरस्वती यांचे भांडण होऊन दोघींनी परस्परांना शापित केले;  त्यामुळेच त्या नदीरूपात पृथ्वीतलावर अवतीर्ण झाल्या.  वामन व पद्‌म या पुराणांत सरस्वतीबावत तीन भिन्न उल्लेख आढळतात.  पैकी एक कुरुक्षेत्रातील सरस्वती, दुसरा पुष्करक्षेत्रीची सरस्वती व तिसरी प्रभासक्षेत्रीची समुद्रसंगमीची सरस्वती, परंतु या तिन्ही नद्या म्हणजे ती एकच सरस्वती आहे असे पुराणकार सांगतात.
                    सरस्वती ही विद्या, ज्ञान, शास्त्र व कला यांची अधिष्ठात्री देवता असल्यामुळेच तिच्या एका हातात शास्त्राचे प्रतीक म्हणून पुस्तक, तर दुसऱ्या हातात कला-संगीताचे प्रतीक म्हणून वीणा चित्रित केलेली असते.  मत्स्यपुराणांतील खालील श्लोक या दृष्टीने लक्षणीय ठरतो.  
वेदःशास्त्राणि सर्वाणि नृत्यगीतादिकं च व्ययत् ।
न विहीनं त्वया देवि तथा मे सन्तु सिद्धयः ।।
                    तिच्या हातांतील अक्षमाला आणि कमंडलू ही देखील असेच सूचित करतात की, विद्याधिगमन, शास्त्रज्ञान तसेच कलाविज्ञान यांशिवाय साधना किंवा तपश्चर्या अथवा चिंतन हे असंभवनीय ठरतात.
                    विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार सरस्वती पद्मस्थानका म्हणजे पद्‌मासनस्थ असून तिच्या डाव्या हातात कमंडलू व उजव्या हातात वीणा दिलेली आहे.  उत्तर भारतातील सरस्वतीच्या स्थापत्य शिल्पांत वरील लक्षणे दिसून येतात.  
                    अंशुमद्भेदागमनाप्रमाणे मात्र सरस्वतीचे प्रतिमा लक्षण वैशिष्ट्यपूर्ण ठरते.  ते असे की, सरस्वती ही चतुर्हस्ता, श्वेतपद्मासना, शुक्लवर्णा, सीताम्बरा, जटामुकुटसंयुक्ता, यज्ञोपवीतयुक्ता आणि रत्नकुण्डलमण्डिता असून तिच्या उजव्या दोन हातांपैकी एकाने व्याख्यानमुद्रा दर्शविणारी व दुसऱ्यात अक्षमाला घेतलेली आणि दोन डाव्या हातांपैकी एकात पुस्तक, तर दुसऱ्यात तिने पुण्डरिक धारण केलेले असावे.  त्याच प्रमाणे ती मुनिगणसेविता, ऋज्वागता(अभिमुख) अशी वाग्देवता असावी असा संकेत आहे.  दक्षिणेत हळेबीड व बागली येथील सरस्वतीच्या मूर्ती या दृष्टीने प्रेक्षणीय ठरतात, तर भोजराजाच्या धारनगरीतील संस्कृत पाठशाळेमधील सरस्वतीची मूर्ती आणि काशीक्षेत्रीचे वागीश्वरीकुण्ड तसेच देवीभागवतातील एकशेआठ शक्तिपीठांपैकी एकशेएकवे शक्तिपीठ, ब्रह्ममुख येथील सरस्वती पीठही उल्लेखनीय वाटतात.
                    या देवी सरस्वतीचे उपासक लक्ष्मी उपासकांच्या मानाने कमी असतात.  लक्ष्मी उपासकांचे वैभव चर्म चक्षूंना दिसणारे आहे.  तर सरस्वतीचे वैभव गुप्त आहे.  हे गुप्त वैभव ज्यांच्या जवळ आहे त्यांना खऱ्या अर्थाने महात्मा असे संबोधले जाते.  अगदी प्राचीन काला पासून आजच्या काळात आणि पुढेही या विद्या वैभवाला कधीही कलंक लागणार नाही.  प्राचीन काळी धनश्री असलेले लोक कमी नव्हते आणि आजही नाहीत.  परंतु त्यांची नावे त्यांच्या मृत्यूबरोबर जी नष्ट झाली ती पुन्हा कधी ऐकू आली नाहीत. त्यांची स्मारके कुणी केली नाहीत.  अर्थात आजच्या विज्ञान युगात पैसा हेच सर्वस्व मानून, त्याच्या प्राप्तीसाठी जीवाची बाजी लावून प्रयत्न करणाऱ्यांची स्मारके केली जाणार नाहीत असे नाही परंतु त्यांच्याच हयातीत त्यांची स्मारके नष्ट झाल्याचे पाहण्याचा प्रसंग येणार नाही, कारण हे सर्व लक्ष्मीचे वैभव चिरंतन नव्हे.
                    देवी सरस्वतीची मंदिरे खालील ठिकाणी असून त्यांची त्रोटक माहिती देत आहे.
1)  गदग    -  धारवड, कर्नाटक राज्य.  श्री कुटेश्वर महादेवाचे सर्वांत महत्त्वाचे मोठे मंदिर आहे.  या मंदिराच्या आवारात महादेव मंदिरा समोर सरस्वती मंदिर आहे.  हे सर्वांत प्राचीन मंदिर आहे.
2)  पिलानी  - राजस्थानच्या उत्तरेकडील कोपऱ्यात दिल्ली पासून दोनशे मैलावर वाळवंटी प्रदेशात पिलानी हे गाव आहे.  या गावी उद्योगपती बिलर्ा यांनी एक ग्रामीण शिक्षण संस्था उभारली आहे.  या संस्थेच्या आवारांत शारदापीठ नावाचे मंदिर बांधले आहे.  हे विसाव्या शतकातील मंदिर आहे.
3)  पेहवा (पृथवक)  -  पृथवक हरियाणात अंबाला जिल्ह्यात सरस्वती (सरसुती) काठी आहे.  हल्ली या गावाला पेहवा असे नाव आहे.  कुरुक्षेत्राच्या अंतरंगात हे गाव येते.  सरस्वती नदीला येथे घाट बांधला आहे.  त्यावर सरस्वतीचे छोटे मंदिर आहे.  या मंदिराचे बांधकाम मराठ्यांनी केले आहे असे म्हणतात.
4)  बासर  -  आंध्रप्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील बासर हे गाव महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.  बासर हे मनमाड-काची-कुडा रेल्वे मार्गावरील स्टेशन आहे.  या  गावी 'श्री ज्ञान सरस्वती` या नावाने सरस्वतीचे मंदिर आहे.  चतुर्भुज, शुभ्रवस्त्र नेसलेली, वीणाधारिणी बसलेली मूर्ती आहे.  या मंदिराचे उत्सव नवरात्र व शिवरात्र अशा दोन्ही वेळा होतात.  ही मूर्ती वेदव्यासांनी स्थापिली असून 16/17 व्या शतकातील वाटते.
5)  चाणोद  -  गुजरात राज्यातील चाणोद पासून दोन मैलांवर टेकडीवर गंगनाथ हे शिवमंदिर आहे.   या मंदिराजवळ गुहा आहे.  ही गुहा म्हणजे सरस्वती मंदिर.  वैष्णवी देवी प्रमाणे हे सरस्वती मंदिरही गुहेत आहे.  
6)  अचलेश्वर  - तंजावर.  तामीळनाडूतील त्रिचनापल्ली-नागपट्टम या रेल्वे मार्गावर तंजावर जवळ हे गाव आहे.  येथे सरस्वतीने तप केल्याची आख्यायिका सांगितली जाते.  येथे सरस्वती मंदिर आहे.
7)  वैद्यनाथ धाम  -  बंगाल मधील संताळ प्रांतातील श्री वैद्यनाथ हे महादेवाचे प्रसिध्द ज्योतिर्लग आहे.  मुख्य मंदिर जसीडी स्टेशन पासून एक मैल आहे.  येथे मंदिर समूहात 21 मंदिरे आहेत.  त्यामध्ये सरस्वतीचे एक मंदिर आहे.
8)  गया  -  येथेही सरस्वती मंदिर आहे.
9)  मथुरा  -  उत्तर प्रदेशांत मथुरा शहराच्या पश्चिमेस काही अंतरावर एक टेकडी आहे.  या टेकडीवर महाविद्या देवीचे मंदिर आहे. या टेकडीच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नाल्याला सरस्वती नाला असे नाव असून त्याच्या काठावर सरस्वती कुंड आहे.  या काठाला सरस्वती मंदिर आहे.
महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी यांची संयुक्त मंदिरे --
1)  उज्जैन  -  या शहराला अवंतिकानगरी मानले आहे.  कार्तिक चौकात एक मंदिर आहे.  या मंदिराच्या एकाच गर्भगृहात संयुक्त देवतांच्या तीनही मूर्ती आहेत.
2)  पटना  -  या शहरांत दोन प्राचीन मंदिरे आहेत.  पैकी चौकातील हरी मंदिर सुप्रसिध्द आहे.  त्याच्या पलीकडे एका गल्लीत पटनी देवीचे मंदिर आहे.  या मंदिरात मुख्य देवते बरोबर या तीनही देवींच्या मूर्ती आहेत.
3)  कोल्लूर  -  कर्नाटकातील साऊथ कॅनरा जिल्ह्यातील कोल्लूर हे ठिकाण आहे.  मुकाम्बिका या देवतेचे हे मूळ स्थान आहे.  भगवान परशुरामाने स्थापित केलेल्या सात मुक्ती क्षेत्रांपैकीं एक मानले जाते.  शिवाय हे दक्षिणेतील एक शक्तिपीठ आहे. अशा मुख्य देवते बरोबर गर्भगृहात या तीनही देवींच्या मूर्ती आहेत.
4)  वैष्णव देवी  -  काश्मीर मधील वैष्णव देवी ही अनेकांची कुलदैवत आहे.  हे स्थान जम्मू पासून 46 मैल आहे.  हे मंदिर म्हणजे एक अंधकारमय गुहा आहे.  आदिशक्तीने त्रिशुळाच्या प्रहाराने तयार केलेल्या या गुहेत 150 फूट आत गेल्यावर या तीनही मूर्ती आहेत.  हे स्थान वैष्णवी देवीचे सिध्दपीठ मानतात.  या तीनही मूर्तींच्या पायापासून पाणी वाहत असते.  त्यास बाणगंगा म्हणतात.  या देवी बरोबरच या तिनही देवतांना या ठिकाणी महत्त्व आहे.
5)  कालमठ  -  हरिद्वार.  उषी मठाजवळ बर्फमय डोंगरांत कालमठ आहे.  या कालमठालाच या तिन्ही देवतांचे संयुक्त मंदिर आहे.  हे शक्तिपीठ आहे.
6)  आडिवरे  -  रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे येथील देवीच्या मंदिरात शक्ती पंचायतन आहे ते असे --  योगेश्वरी, महाकाळी, महालक्ष्मी, महासरस्वती व रवळनाथ.
सरस्वती ही उपदेवता मानून असलेली मंदिरे --
1)  दारासुरम्   --  तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम्‌च्या जवळ दोन मैलांवर महादेवाचे मंदिर आहे.  तेथील देवतांमध्ये सरस्वतीची एक मूर्ती आहे.
2)  सालेम  -  केरळ मधील या गावात अरुण मिगू सगवनेश्वर स्वामी नावाचे मंदिर आहे.  या मंदिरात उप गाभाऱ्यात तिरुकोईल नावाची सरस्वतीची मूर्ती आहे.
3)  कोल्हापूर  -  येथील महालक्ष्मीचे मंदिराच्या उजव्या हाताला उपगर्भगृह आहे.  त्या मध्ये सरस्वतीची मूर्ती स्थापन केली आहे.

                    काळभैरवाला श्री शिवाने सर्व वेदांची पुनर्स्थापना करून जगाची परिक्रमा चालू ठेवण्याचा आदेश दिला.  तेव्हा त्याने देवी सरस्वती बरोबर ती पुनर्रचना केली.  काळभैरवाचे आणि सरस्वतीचे कार्य एकच असल्यामुळे पूर्वजांनी त्यांना आपले कुलदैवत मानले.  म्हणून काळभैरव कुलस्वामी व महासरस्वती कुलस्वामिनी आहे यांत शंकाच नाही.
                    येत्या काळात सुखी व्हावयाचे असेल तर प्रत्येकाने आपला धर्म सोडू नये.  धर्माचे आचरण करताना पुरातन गोष्टींना पुरातन म्हणू नये.  त्याचेच अवलोकन करावे.  कुलस्वामी आणि कुलस्वामिनी याच देवता आपल्या त्रात्या आहेत असे समजून भक्तीभावे त्यांची सेवा करावी.
विद्या नाम नरस्य रूपमाधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम् ।
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः ।।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम् ।
विद्या राजसु पूज्यते नहि धनं विद्याविहीनः पशु ।।

श्री. गोविंद महादेव काळे,
रत्नागिरी.
संदर्भ :-
1)  श्रीदुर्गा सप्तशती.  2)  स्कंद पुराण खंड प्रथम व द्वितीय.  3)  ज्ञानेश्वरी.  4)  प्रसाद अंक, ऑगस्ट 1988.


कुलदैवत श्री काळभैरव सरस्वती
काळभैरव.
                    वत्सगोत्री काळे यांचे कुलदैवत कालभैरव सरस्वती असे बहुतांश काळे घराण्यांमध्ये मान्य आहे. काळभैरव शब्दाचा व्युत्पत्यार्थ कलयति आयुः (जो आयुष्य ग्रासतो) किंवा कलयाति सर्वापि भूतानि (जो सर्वभूतांचा संहार करतो) तो काळ.  भैरव हा शब्द भिरु या संस्कृत शब्दापासून बनलेला असावा असे कोशाकार मानतात.  तथापि भिरु म्हणजे भित्रा आणि भैरव म्हणजे भीषण असा भिरु आणि भैरव या दोहोंमध्ये अर्थपूर्ण विरोध आहे.
                    भैरवाची उत्पत्ती शिवाच्या रक्तातून झाली असून त्याची 64 रूपे मानली जातात.  प्रत्येकी 8 असे त्याचे अष्टवर्ग होतात.  भैरव हा नग्न, सर्प भूषित, रुंड माळाधारी असून त्याच्या हाती केस पकडून धरलेले ब्रह्मदेवाचे मुंडके आणि सोबत कुत्रा असतो.
                    कालभैरवाच्या उत्पत्तीसंबंधी काशिखंड अध्याय क्रमांक 34 / 35 मध्ये कार्तिकवीर्याने अगस्त्तीला सांगितलेली कथा आहे ती पुढील प्रमाणे --  एकदा ब्रह्मा - विष्णु  यांना मायामोह पडून कल्पांत झाला.  त्यांच्या मध्ये श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला असता नारदमुनींनी त्यांना बद्रिनारायणास जाऊन महामुनींकडे (वसिष्ठ, कामदेव, अत्रि, मार्कंडेय आदि) पृच्छा करण्याचा सल्ला दिल.  मार्कंडेयांनी शिवस्व्रुप अचल असल्याचे सांगून ब्रह्मा-विष्णूंना वेदांकडे पृच्छा करण्यास सांगितले.  त्यावरून दोघेही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचेकडे क्रमशः गेले असता त्या सर्वांनीं शिव स्वरूप श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले.  तरीही त्यांची भ्रांती दूर होईना.  यामुळे शंकराला ब्रह्मा-विष्णूंचा खूप राग येऊन त्याने आपला उजवा हात झटकला.  तेव्हा शिवाच्या भुजदंडापासून महाकाळ उत्पन्न झाला तोच काळभैरव.  त्याला वेदांची पुनः स्थापना करून सृष्टिक्रम पूर्ववत् सुरू करण्याची आज्ञा शिवाने केली.
                    शिवाज्ञेनुसार काळभैरव वेदपुरित वादविवाद करणाऱ्या ब्रह्मा-विष्णूंच्या मध्ये अवतीर्ण झाला.  दोघांनीही श्रेष्ठत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यावर काळभैरव म्हणाला माझा स्वतःचा मुकुट 21व्या स्वर्गांत आहे. आणि पादुका सप्त पाताळात आहेत.  ब्रह्मदेवाने स्वर्गांत जाऊन माझा मुकुट पहावा आणि विष्णूनीं पाताळात जाऊन माझ्या पादुका पहाव्यात.  जो हे कार्य प्रथम करील तो श्रेष्ठ ठरेल.  काळभैरवाने असे कथन केल्यावर विष्णू पाताळाकडे आणि ब्रह्मा स्वर्गलोकीं रवाना झाले.  सप्त पाताळे धुंडून विष्णूचा गर्वपरिहार झाला. पाताळ कंदाकडून गुरौपदेश प्राप्त झाल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला आणि शिवाचे श्रेष्ठत्व मान्य करून ते काळभैरवाकडे आले.
                    ब्रह्मदेव एक स्वर्ग पार करूनच थकून गेले.  तेथे त्यांची कामधेनू व केतकी यांच्याशी भेट झाली.  कामधेनू ब्रह्मदेवाची माताच.  ब्रह्मदेवानी तिची स्तुती करून आपण मुकुट पाहिल्याची खोटी साक्ष तिने द्यावी अशी गळ घातली.  कामधेनू आणि केतकी या दोघींनीही ब्रह्मदेवासाठी खोटी साक्ष देण्याचे मान्य केले.  ब्रह्मदेव काळभैरवाकडे परत आले तेव्हा विष्णू डाव्या बाजूस बसलेला त्याने पाहिला. ब्रह्मदेव रागाने काळभैरवाला म्हणाले मी मुकुट पाहून आलो आहे. त्यांच्या कथनाच्या पृष्ट्यर्थ कामधेनू आणि केतकी दोघीनींही त्याचे कथन सत्य असल्याचे सांगितले.  त्यावेळी काळभैरव प्रलयासमान क्रोधायमान झाले.  असत्य भाषण करणाऱ्या ब्रह्मदेवाचे पाचवे मुख त्यांनी डाव्या हाताच्या करांगुळीने छेदून टाकले आणि गायत्रीला शाप दिला की, तू असत्य बोललीस म्हणून तुझे मुख अपवित्र राहील.  केतकीला शाप दिला की तुझा सर्वांगी काटे उत्पन्न होतील आणि शिवपूजे मध्ये तू वर्ज्य असशील.
                    मात्र ब्रह्माचे शिरच्छेदन केल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक कालभैरवाना लागले आणि छेदिलेले ब्रह्ममुख त्यांच्या हाताला चिकटले. काळभैरवाला शापमुक्त होण्यासाठी तीर्थाटन करण्यास शिवांनी सांगितले.  त्या नुसार काशीला गंगास्नान केल्यावर काळभैरव शापमुक्त होऊन ब्रह्माचे मुख गळून पडले.  ते स्थान कपालमोचन तीर्थ म्हणून प्रसिध्द आहे.  काळभैरव पापमुक्त झाले त्यावेळी शिव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी काळभैरवाला वर दिला की, तू माझ्या चौसष्ट कोटी गणांचा अधिकारी हो.  तू काशीचा रक्षक म्हणून अधिवास करावा.  तुला काशी क्षेत्री अग्रपूजेचा मान मिळेल.
                    कालका पुराणात कालभैरवाच्या उत्पत्ती संबंधी एक वेगळी कथा आहे. पार्वतीच्या शापाने  महाकाल हा गण भैरव रूपाने जन्मला.  त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानतात.  कार्तिक वद्य 8 हा दिवस भैरव जयंती म्हणून मान्य असून ते काम्यव्रत आहे.   त्या दिवशी 3 अर्ध्ये कालभैरवाला द्यावी, उपवास व जागर करावा असा उल्लेख धर्मसिंधूमध्ये द्वितीय परिच्छेदात पृष्ठ क्रमांक 172 वर सापडतो.  काळभैरव शैवमंदिराचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक असून भैरव वग़ळून शक्तिपूजा निरर्थक ठरते. त्याचे सोबत कुत्रा असतो.  काळभैरव अश्वाप्रमाणे कुत्र्यावरही स्वार होतो म्हणून त्याला श्‍वाश्‍व (श्वान हा ज्याचा अश्व आहे असा) अशीही उपाधी आहे.  तंत्र ग्रंथानुसार 64 भैरव हे 64 योगिनींचे स्वामीही मानले जातात.
                    काळभैरवाच्या नावाविषयी बरेच मतभेद आहेत.  संहारभैरव, क्रोधभैरव, चंडभैरव, महासंहार, ताम्रचूड, उन्मत्तभैरव, असितांग भैरव, कपालभैरव, भीषणभैरव, रुरुभैरव, चंद्रचूड, काळ, रुद्रभैरव  या नावांपैकीं वेगवेगळ्या आठ नावांचा अष्ट भैरवात समावेश आहे.
                    विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लम्बित, देव, उग्र आणि विघ्न या प्रत्येकाला राज हे पद जोडूनही अष्टभैरवांची यादी केली जाते. (जसे विद्याराज, कामराज, नागराज इत्यादी).   श्री शंकराचार्य विरचित भैरवाष्टकांत आरंभी देवराज ही उपाधी वापरली आहे.  शांती कर्मात व शैवव्रत उद्यापनांत अष्टभैरवांना आहुती दिली जाते.  पापभक्षण, आमर्दक, काळराज अशी त्याची नावेही प्रचलत असल्याचे आढळते.  काशीला जाताना प्रथम कालभैरवाचे दर्शन घ्यावयाचे व येताना पुनःश्च त्याचे दर्शन घेऊन काळागंडा बांधण्याचा प्रघात आहे.  मार्गशिर्ष वद्य 8 हा दिवस कालभैरवाष्टमी म्हणून मानण्याचा प्रघात असून आश्विन, कार्तिक व भाद्रपद वद्य 8 हे दिवसही काळाष्टमी व्रत दिन म्हणून पाळले जातात. 
                    काळभैरव ही दुय्यम दर्जाची देवता असल्याचा उल्लेख धार्मिक वाड्.मयात पहावयास मिळतो.  त्याची तामस / राजस रूपे उग्रभयानक आहेत. तो साक्षात काळ असून भीषण रूप धारण केलेला आहे.  त्याच्या हाती खट्वांग, शूल, कपाल इ. आयुधे असून पायी खडावा असतात. त्याच्या सोबत सदैव श्वान असतो.  हा प्रणव असून चतुर्वेद त्याच्या पुढे विनम्र होतात. तो सर्वव्यापी अनंत व तार (तारणारा) आहे.  त्याच्या नावाचा उच्चार करताच तो सूक्ष्म रूपे प्राण्याच्या शरीरात प्रवेश करतो. तो परात्पर, सर्वातीत आहे.  तोच योगीराज महेश आहे.  तो औषधी वनस्पती व जल यात प्रवेश करून जगताचे रक्षण करतो. तो बटुक म्हणजे परमात्मा आहे.  असे उल्लेखही धार्मिक वाड्.मयांत सापडतात, जे काळभैरवाचे श्रेष्ठत्व वर्णितात.
वन्दे बालं स्फटिक सदृशं कमलोद्भासि वक्त्रं
विद्याकल्पैर्नव मणिमयैः किs:किणीनुराद्यैः
दीप्ताकारं विशदवदनं सुप्रसन्नं महेशं
हस्ताब्जाभ्यां बटुक भनिषं शूलदण्डौ दधानम्‌।।
                    (स्फटिक वर्णाचा, केसांनी ज्याचे मुख उद्भासित होत आहे असा, नाना प्रकारच्या विद्या हे ज्याचे मणिनिर्मित, किङकिणि, नुपूर इ. अलंकार आहेत असा दीप्तावृती, विकसित मुख, सुप्रसन्न, हाती दंड, शूल धारण करणारा अशा बालरूप बटुक महेशाला मी सतत वंदन करतो.)
कालभैरव प्रार्थना मंत्र  --
कपाल मालकाकान्तं ज्वाला पावक लोचनम् ।
कपालधरमत्युग्रं कलये कालभैरवम् ।।
                    (रुंड मालांनी शोभित, ज्याच्या नेत्रांतून अग्निज्वाळा येत आहेत, ज्याच्या हाती कपाल आहे, जो अत्युग्र आहे अशा कालभैरवाला मी वंदन करतो.)
कपाल -- यज्ञीक वस्तु. दोन अंगुळे लांब तेवढीच रुंदी व उंची असलेला खापराचा तुकडा.
                    वरील संदर्भावरून काळभैरवाचे महात्म्य ध्यानी यावे.  श्री. शंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक आणि कालभैरव स्तोत्र या लेखाचे शेवटी दिले आहे.  त्या वरूनही काळभैरवाचे महात्म्य ध्यानी यावे.  काळे कुलोत्पन्नांचे काळभैरव सरस्वती असे संयुक्त कुलदैवत मानले जाते.  त्या संदर्भात कालभैरव स्तोत्रात विद्यानांगुरवे तुभ्यं असा उल्लेख जिज्ञासूंनी लक्षात घेण्यासारखा आहे.  काळभैरव हा शिवाचा अंशावतार आहे.  तो विद्येचा म्हणजे सरस्वतीचा गुरू आहे. त्याच्या विविध रूपांमधले गुरुपदीचे हे रूप काळे कुलपुरुषाने कुलदैवत म्हणून स्वीकारले आहे. जे पूर्ण सात्त्विकताच प्रतीत करते.
               सरस्वती
                    सरस्वती ही विद्या, कला यांची देवता.  वाक्, वाग्देवी, वागीश्‍वरी, वाणी, शारदा, भारती, वीणापाणी अशी तिची नावेही रूढ आहेत. उपनिषदांत सरस्वतीची वाणीशी एकरूपता मानलेली आहे. प्रज्ञा वृद्धीसाठी, वाणी सामर्थ्यवान होण्यासाठी, मधुर होण्यासाठी उपनिषदात तिची प्रार्थना केली आहे.  साक्षात ज्योतिर्मय ब्रह्माचे प्रतीक याच अर्थाने ती ब्रह्मा-विष्णु-महेश यांना पूज्य आहे.  पुराणांत सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी-कन्या असा तर काही ठिकाणीं विष्णूची पत्नी असाही उल्लेख आहे.
शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माद्यां जगद् व्यापिनीं
वीणा पुस्तक धारिणीमभयदां जाड्यान्हकारापशम्
हस्ते स्फाटिकमालकां विदधतिं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुध्दिप्रदां शारदाम्  ।।
                    (शुभ्र वर्णाची सत्वगुणी, ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ असे सार, विश्वातली आद्य शक्ती, जगताला व्यापून उरलेली, वीणा-पुस्तक धारिणी, अभयदात्री, अज्ञानांधकाराचा नाश करणारी, हातात स्फटिकमण्यांची माळ धारण करणारी, पद्मासनावर बसलेली बुद्धिदात्री अशा भगवती परमेश्वरी शारदेला मी वंदन करतो.)
                    हिंदुस्थानांतील प्रमुख नद्यांपैकीं (गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, चर्मण्वती, क्षिप्रा, गंडकी इत्यादी) एका नदीचे नाव सरस्वती आहे.  शिवाने ब्रह्महत्या केल्यामुळें जे पातक लागले त्याच्या क्षालनार्थ त्याने सरस्वती नदीत स्नान केले असता ती गुप्त झाली असाही वामन पुराणात (3.8) उल्लेख आहे.
                    सरस्वतीच्या चार भुजा हे चार दिशांचे प्रतीक मानले असून हे तिच्या सर्वव्यापित्वाचे लक्षण आहे.  पुस्तक हे स्थूलमानाने ज्ञानप्राप्तीचे साधन. आध्यात्मिक अर्थाने सर्व ज्ञानमय वेदांचे जणू प्रतीक!  स्फटिक माला स्थूल अर्थाने एकाग्रतेचे प्रतीक तर आध्यात्मिक अर्थाने मातृकावर्णशक्तीचे प्रतीक.  वीणा स्थूल अर्थाने साधकाना निर्वाण व सिध्दी देणारी आहे.  कमल हे सृष्टीचे प्रतीक होय.  द्विभुज, चतुर्भुज, षड्भुज, अष्टभुज, दशभुज अशीही सरस्वतीची रूपे वर्णिली आहेत.  स्कंद पुराणात शिवाची शक्ती या कल्पनेने सरस्वतीचे रूप-ध्यान वर्णिले आहे. जटा-मुकुट त्यावर चंद्रकोर, गळा निळा, त्रिनेत्र असे तिचे वर्णन असून ही सरस्वती म्हणजे साक्षात शिवाचेच स्त्रीरूप होय.
                    महासरस्वती महालक्ष्मी पासून निर्माण झाली असाही पुराणांत उल्लेख आहे.  शाक्त पंथातली श्वेतवर्ण, चतुर्भुज, माला, अंकुश, पुस्तक वीणा धारण करणारी असाही उल्लेख आहे.  महाविद्या, वाणी, भारती, आर्या, ब्राह्मी, वेदगर्भा अशी सरस्वतीची नावे उल्लेखिलेली आढळतात.  विद्यार्णव तंत्रातील वर्णनानुसार सरस्वतीची उत्पत्ती गौरीपासून झाली असून तिला अष्टभुजा मानले आहे.  बाम, मुसळ, चक्र, त्रिशूल, शंख, घंटा, नांगरू, धनुष्य ही तिची आयुधे असल्याचे वर्णिले आहे.
                    महालक्ष्मी आदिशक्तीचे एक रूप.  दुर्गा सप्तशती (देवी महात्म्य) या ग्रंथानुसार त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापक अशी महालक्ष्मी ही जगाचे आदिकारण आहे. तिची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे आहेत.  सगुण रूपातील तिच्या हातात महाळुंगाचे फळ, गदा, चर्म व पानपात्र असते, तर मस्तकावर नाग, लग व योनी यांची प्रतिके आसतात.   चतुर्भुज आणि अष्ठादशभुज अशी तिची दोन रूपे आढळतात.  महालक्ष्मी तमोगुणयुक्तरूप धारण करून महा सरस्वती बनली अशी कथा आहे.  पुढे तिने स्वतः ब्रह्मदेव व लक्ष्मी यांना जन्म दिला तसेच तिच्या सांगण्यावरून महाकालीने शंकर (शिवदेवता) व त्रयी विद्या यांना आणि महासरस्वतीने विष्णू व गौरी यांना जन्म दिला.  अशा प्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला आणि महालक्ष्मी ही विश्वाचे आदिकरण बनली, असेही विश्वकोशांत आढळते (देवी).
(भारतीय संस्कृती कोश, मराठी विश्वकोश, स्कंदपुराण यांचे आधारे संकलित.)
    संकलक
    श्री. श्रीराम काळे,
    एम.ए., बीएड., एम.फिल.
    पडेल, सिंधुदुर्ग.

श्री महासरस्वती
घण्टा शूल हलानि शंङ्ख मुसले चक्रं घनुः सायकं
हस्ताब्जैर्दधतीं घनान्तविलच्छीतांशु तुल्यप्रभाम् ।
गौरी देह समुद्भवां त्रिजगतामाधार भूतां महा
पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीम् ।।
                    श्रीदुर्गासप्तशतीमधील प्रथम, मध्यम व उत्तम चरित्र अशा तीन विभागांत श्री महाकाली प्रथम चरित्र नायिका, श्री महालक्ष्मी मध्यम चरित्र नायिका, व श्रीमहासरस्वती उत्तम चरित्र नायिका यांचे वर्णन केले आहे व त्यांच्या ध्यान श्लोकांत त्यांचे चरित्र सामावले आहे.
                    ही महासरस्वती अष्टभुजा आहे.  आदिमातेने म्हणजेच आदिशक्तीने घेतलेल्या महाकालीच्या अवतारात तिने दहा हात धारण केले होते.   परंतु नंतरच्या पुढील काळात या आदिशक्तीने घेतलेल्या महालक्ष्मीच्या अवतारात अठरा हात धारण केले.  कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली होती.  सगळीकडे भोगवाद बोकाळला होता.  अनाचार, भ्रष्टाचार व भोगवाद यांचेच साम्राज्य माजले होते. अशा समाजात जोपासलेल्या दुष्टप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी देवीला जास्त बाहू (हात) धारण करावे लागले.  परंतु त्यानंतरच्या काळात बूद्धिवादाचा अधिकाधिक विकास होत गेला.  त्या वेळी देखिल भोगवादाचे प्राबल्य नव्हते असे नाही.  परंतु बुध्दिवाद विकसित होत गेला. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्तीने कार्य साधणे प्राप्त होऊ लागले. त्या मुळे देवीला शक्तीचा उपयोग बराच कमी करावा लगला.  त्यामुळे साहजिकच अस्त्रे-शस्त्रे आदी आयुधे बरीच कमी वापरावी लागली.  या कारणामुळे श्री महासरस्वतीला आठ बाहूच धारण करावे लागले.  त्यामुळे ती अष्टभुजा आहे. आणि या आठ भुजांपैकी फक्त चार हातांत तिने शूल, चक्र, धनुष्य आणि बाण अशी चार आयुधेच धारण केली.  उरलेल्या चार हातात या देवीने घंटा, हल (नांगर), शंख आणि मुसळ या वस्तू (आयुधे-शस्त्रे नव्हेत) धारण केल्या.
                    महासरस्वती हा आदिमायेचा पुष्कळच प्रगत असा अवतार होता.  हातांची व शस्त्रे-आयुधे यांची संख्या बरीच कमी होती.  गदा, परशु, तलवार अशी हातात घेऊन लढण्याची शस्त्रे तिने धारण केली नव्हती.  तर बाण, त्रिशूल, सुदर्शनचक्र अशी लांब पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे तिने धारण केली होती.  त्याचप्रमाणे इतर चार हातात घंटा, शंख, मुसळ व नांगर ही चिन्हे धारण केली होती.
                    सामान्यतः घंटा पूजेच्या वेळी वापरतात.  रणांगणावर युध्दास प्रारंभ होताना शंख वाजविण्याची प्रथा होती.  कित्येक वेळा तो शंखनाद ऐकूनच शत्रूपक्षांतील सैन्य गर्भगळीत होत असे.  मुसळ हे पोषणासाठी वापरले जात होते.   धान्य कांडण्यासाठी मुसळाचा वापर करीत.  आणि नांगर शेतीकामासाठी वापरला जातो. या वरून वर्णव्यवस्था त्याकाळी कशी, समाजधारणेच्या व राष्ट्रउभारणीच्या दृष्टीने आकार घेत असावी याची कल्पना येऊ शकेल.  ज्या शुंभनिशुंभ दैत्यांच्या वधासाठी श्री महासरस्वतीचा अवतार झाला होता त्या असुरांच्या शासनाच्या वेळी समाज, देश खूपच प्रगत झाला होता.  अशी प्रगती होते तेव्हा समाजात, राज्यकर्त्यांत अहंकार प्रचंड प्रमाणात वाढतो (सध्या याचा अनुभव आपण घेतोच आहेत). या पूर्वीचे दोन्ही अवतार त्या त्या वेळच्या सामाजिक व तत्कालन परिस्थितीनुरूप झाले होते. या वेळच्या श्री महासरस्वतीच्या ध्यान श्लोकांत गौरीदेहस्मुद्भूता असा उल्लेख आहे.  कारण त्या त्या वेळी देवी अविर्भूत, आविष्कृत म्हणजे ती गौरीदेहसमउद्भवा म्हणजेच गौरीच्या (पार्वतीच्या) देहापासून उद्भवली.  पूर्वीच्या सर्व अवतारांत देवांचे शरीर वेगवेगळ्या असंख्य देवांच्या तेजापासून निर्माण झाले होते. त्याचे वर्णन श्रीदुर्गासप्तशतीत अत्यंत बहारदार असे आले आहे.  त्या अवतारात महिषासुराच्या वधाचे कार्य पूर्ण होताच तो प्रचंड शक्ती तेजोगोल अंतर्धान पावला व अदृष्य झाला होता.  पण अंतर्धान पावण्याच्या वेळीं पुन्हां प्रसंग पडताच पुन्हा आपण उत्पन्न होऊ असे तिने आश्वासन दिले होते त्या प्रमाणे ती पुन्हां गौरीदेहातून उद्भवली व साकार झाली.
                    या ध्यान श्लोकांतील विजयाम्, आधारभूता हे जे विशेषण आहे त्याचा अर्थ अत्यंत गूढ आहे.  तिच्या कार्याचा विस्तार किती प्रचंड आहे, अनाकलनीय आहे. या कल्पना नुसत्या त्रिजताम् या शब्दाच्या वर वर लक्षात येणाऱ्या अर्थावरून येणे अशक्य आहे. तीन जगते म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे खरे.  या तीनही जगतांना देवीचा आधार होता. म्हणजे या भूमीपुरताच तो केवळ मर्यादित नव्हता.  हे जग, हे विश्व, हे ब्रह्मांड अनंत कोटी प्रमाणात विस्तारलेले आहे.  अमर्याद आहे.
एकदा ब्रह्मदेव व विष्णू यांच्या मध्ये असा वाद निर्माण झाला की, आपणा दोघांत श्रेष्ठ कोण ? वाद चालू असता त्या दोघांच्या मध्ये एक प्रचंड तेजस्वी स्तंभ निर्माण झाला.  तो तेजःस्तंभ वर सप्तलोक भेदून अवकाशात अत्यंत उंच असा व खाली पाताळात सप्तपाताळ भेदून अत्यंत खोल असा गेला होता.  आपत्या दोघांत हे तिसरेच काय निर्माण झाले याचा विस्मय वाटून हा तेजःस्तंभ अवकाशात कुठेपर्यंत गेला आहे हे पहाण्यासाठी विष्णू वर आकाशांत गेले. परंतु युगानुयुगे वर शोध घेऊनही त्यांना त्या तेजःस्तंभाचा थांग लागला नाही.  ब्रह्मदेव देखिल सप्तपाताळ भेदून खाली गेले.  पण त्यानाही त्याचा थांग लागला नाही.  शेवटी दोघेही थकून परत आले आणि त्यांच्या लक्षात आले की, या आदिशक्तीचा पार लागणे कठीण आहे, नव्हे अशक्य आहे. आणि त्या चित्‌शक्तीने निर्माण केलेल्या अनंत कोटी ब्रह्मांडाचाही पार लागणे अशक्य आहे.
                    अशा या अनंत कोटी ब्रह्मांडाला या देवीचा आधार होता, आहे. तो अमर्याद आहे.  या दृष्टीने ही श्री महासरस्वती त्रिजगताम् आधारभूता आहे.
                    या देवीच्या ध्यान श्लोकांत आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे विशेषण आहे.  ते म्हणजे घनान्ताविलच्छीतांशुतुल्यप्रभाम् । या विशेषणापासून तिच्या अद्वितीय, अतुलनीय अशा महत्कार्याची जाणीव होते.  तिचे हे महत्कार्य किती प्रचंड महत्त्वाचे आहे हे ध्यानात येते.  घन म्हणजे ढग. ढगाच्या आडून (मागून) डोकावणाऱ्या (शीतांशुतुल्य प्रभा) चंद्राप्रमाणे प्रभा-तेज, रया, सौंदर्य असणारी ही महासरस्वती अतिशय लक्षणीय आहे. अभ्ररहित, ढग नसलेल्या स्वच्छ आकाशामध्ये विहरणाऱ्या चंद्राचे तेज काही वेगळेच चमकदार असते.  पण तोच चंद्र ढगांच्या आड लपून खेळत खेळत, मधूनच दर्शन देतो, मधूनच अदृष्य होतो.  हृदयाकाशात जे अज्ञानरूपी मेघ जमलेले असतात त्या ढगांआड लपलेला ज्ञानानचंद्र असाच लपंडाव खेळतो. या ज्ञानचंद्राप्रमाणे ही महासरस्वतीरूपी माया क्षणात व्यक्त तर क्षणात अव्यक्त होऊन असाच लपंडाव खेळते.  या चंद्राप्रमाणेच ही महामाया देखील व्यक्ताव्यक्त आहे. असाच मायेचा लपंडाव या  महामायेने मांडलेला असतो.  महासरस्वती हे महामायेचे तिसरे रूप आहे.  ही त्रिगुणात्मिका जगदंबा या तिसऱ्या रूपाने अवतरली आणि माजलेल्या शुंभानिशुंभांचा वध केला.  त्याच बरोबर जगत्‌कार्यासाठी वारंवार व्यक्त होण्याचे, अवतरण्याचे आश्वासनही तिने देऊन ठेवले.
                    महासरस्वतीचा अवतार शुंभनिशुंभ यांच्या वधासाठी, नाशासाठी झाला.  मधुकैकटभ, महिषासुर व शुंभ-निशुंभ हे असुर म्हणजे अहंकाराच्या उद्रेकाचे प्रतीकच होय.  महिषासुराच्या निमित्ताने अवतीर्ण झालेली तेजोरूपशक्ती मुळात अव्यक्त रूपाने सर्वत्र व्याप्त होतीच. आर्त हाक येण्याचाच अवकाश की ती प्रकट होणार होती. संकटांची परमावधी, संकटांचा अतिरेक झाल्याखेरीज आर्त हाक निघू शकत नाही. त्या नुसार शुंभ-निशुंभ या महाबलाढ्य असुर जोडीपासून अत्यंत उपद्रव पोहोचताच देवांनी या जगज्जननीची स्तुती करण्यास प्रारंभ केला.
                    कश्यपास दनुपासून शुंभ व निशुंभ आणि नमूची असे तीन पुत्र झाले.  त्यात नमूची निराळा झाला.  शुंभ व निशुंभ यांनीं महाखडतर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून कधीही मरण न येण्याचा म्हणजे अमरत्वाचा वर प्राप्त करून घेतला होता. परंतु हा वर सशर्त होता. युध्दामध्ये स्त्री कडून मृत्यू येण्याची शक्यता ब्रह्मदेवानी वर्तवली होती. परंतु या असुरद्वयांना अमरत्वाचा इतका कैफ चढला होता की, स्त्रीकडून मरण ही कल्पनाच त्यांना दखल घेण्याजोगी वाटली नाही. त्या काळात सुध्दा स्त्री ही अबला अशीच स्त्रीची प्रतिमा समाजात होती. महासामर्थ्यशाली देवादिकांचे देखिल भय नसल्यामुळे एक क्षुल्ल्क स्त्रीकडून आपणास काहीच धोका संभवणार नाही अशा मस्तीत ते होते.  त्या मुळें त्या दानवांनीं समस्त देवांना पदभ्रष्ट केले व आपणच राज्य चालवू लागले.  देव, यक्ष, किन्नर, मानव यांचे स्वातंत्र्य नष्ट झाले.  सगळीकडे सावळा-गोंधळ सुरू झाला. अनाचार, अत्याचार यांना ऊत आला त्यामुळें संत्रस्त देवांनी आर्ततेने भगवतीची करुणा भाकण्यास सुरुवात केली.  या आधीच्या अवतारात भगवतीने दिलेले वरदान त्यांना आठवले.  तयास्माकं वरो दत्तो यथापत्सु स्मृताखिलाः । भवतां नाशयिष्यामितत्‌क्षणात् परम आपदः ।।  हिमालयात जाऊन भगवतीचे स्मरण करण्यास सर्व देवांनी प्रारंभ केला.  स्तवन केले जात असतानाच देवी व्यक्त होऊ लागली, साकार होऊ लागली.  या खेपेस ती चित्‌शक्ती, तो तेजोगोल देह धारण करून व्यक्त होऊ लागली.  पण हा या खेपेस हा देह पूर्णपणे वायुरूप होता.  ज्यामुळे या वायुरूपास लौकीक देहाचा आश्रय घेणे आवश्यक होते.  योगायोग असा की, त्याच वेळी वरतकन्या पार्वती स्नानासाठी चालली होती.  तिच्या देहातील कोशाचा आधार घेऊन महामाया व्यक्त झाली.  प्रत्येक जीव हा सप्तकोशात्मक असतो.  ते कोश असे :- 1) अन्नमय. 2) वासनामय. 3) प्राणमय. 4) मनोमय. 5) ज्ञानमय. 6) विज्ञानमय. 7) आनंदमय.  त्यापैकी अन्नमय व प्राणमय आणि वासनामय या तीन कोशांचा भगवतीला काहीच उपयोग नव्हता.   म्हणूंन तिने इतर चार कोशांचा आधार घेऊन स्वतःचे व्यक्तीकरण केले व कोशांतून प्रकटीकरण झाले.  त्या मुळें तिचे नाव कौशिकी असे पडले. परम रमणीय असे रूप धारण करून ती भूमीवर वावरू लागली.
                    पुढे चण्ड-मुण्ड, धूम्रलोचन, कोटीवीर्य, धौम्र, दौर्हद तसेच रक्तबीज आदी महापराक्रमी व मायावी अशा असुरांचा नायनाट करून शेवटी शुंभनिशुंभ यांचाही नाश करून पृथ्वीवरील जुलूम, अनाचार, अत्याचार यांचा शेवट केला.  त्यामुळे प्रजाच नव्हे तर सर्व चराचर सृष्टी आनंदीत झाली.  अखिल देवांचा आनंद तर अवर्णनीय होता.  सर्व देवांनी एकत्र येऊन भगवतीचे स्तुतिगान सुरू केले.  या स्तुतीमुळे देवीला परमसंतोष झाला आणि भविष्यकाळात आवश्यकतेनुसार पुन्हा प्रकट होण्याचे आश्वासन देऊन आणि भविष्यकाळातील सर्व अवतारांचे रहस्य सांगून ती अंतर्धान पावली.     
                    पार्वतीच्या देहातून महासरस्वतीचे व्यक्तरूप धारण केल्याने ती पार्वतीचा अंश आहे.  अष्टभैरव शंकराने निर्माण केल्याने व त्यांच्यावर काशीविश्वेश्वराची स्थाने असतील त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम त्याना मिळाल्याने पार्वतीचा कालभैरव या देवाचा रखवालदार म्हणून संबंध येतो. त्यामुळे महासरस्वती व कालभैरव यांचे नाते अतूट झाले आहे.
                    शिव शंकरानीं आठ भैरव निर्माण केले.  त्यामध्ये काळभैरव हे एकाचे नाव आहे.  ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला.  शंकर संतप्त झाले आणि त्यांनीं आपल्या अष्टभैरवा मधील काळभैरव याला ब्रह्मदेवाचे पाचवे मुख कापण्याची आज्ञा केली. ब्रह्मदेव हतबल झाले व काळभैरवाने शिवाज्ञेचे पालन केले. नंतर शिवाने काळभैरवाला काशीमध्ये राहून तेथील रक्षण करण्याची आज्ञा केली.  त्या प्रमाणे तेथे तो स्थिर झाला आणि म्हणून काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वीं तेथील  काळभैरवाचे दर्शन घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर काशीहून परत जाताना यात्रेकरू आपल्या हातात काळा गंडा बांधतात तो काळभैरवाचा असतो.  तेथे येणाऱ्यावर जसे पूर्ण लक्ष असते तसे तेथून परत जाणाऱ्यावरही त्याची करडी नजर असते.  कारण तो काशीचा रखवालदार आहे. तेव्हा काशी हून परत जण्यासाठी त्याची परवानगी घेतलेली आहे याची खूण चटकन सर्वांना दिसावी म्हणूंन हातात काळा गंडा बांधून मग बाहेर पडण्याचा कुलाचार आहे.  मार्गशिर्ष अष्टमीला शिवाने त्याला निर्माण केले म्हणून या दिवशी तो ज्यांचे कुलदैवत आहे त्याची महापूजा करून त्याला महानैवेद्य अर्पण करतात. महाराष्ट्रात कुलाबा जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन व हिंदळे (सिंधुदुर्ग) येथे त्याची देवळे आहेत. दरवर्षीं देवदिपावलीस संबंधित काळे कुलोत्पन्न (वत्सगोत्री) जेथे शक्य असेल त्या देवळात कालभैरवाच्या दर्शनास जातात.  तेथेच काशीविश्वेश्वर व श्री गणपती अशी दैवते जवळपास स्थापन केलेली दिसतात.

    संकलक
    श्री. स. कृ. जोशी, एम.ए.,बी.एड.
    आचरे, मालवण, जि. सिंधूदुर्ग.
संदर्भ -
    1)    कुलधर्म, कुलाचार, कुलदैवते या ग्रंथावरून.
    2)    डॉ. र. शं. तथा दादा घाटे, पुणे यांच्या संदर्भातील लेखावरून.
    3)    महाराष्ट्रातील कुलदैवते या पुस्तकावरून.


कुलदेवता  -- काळभैरव
                    श्री काळभैरव हा मुक्काम सोरटूर तालुका व जिल्हा गदग येथील असावा असे कृष्णाजी नारायण (8) म्हणत.  मूर्ती अजानबाहू 10 x 5 फूट अशी आहे.  कृष्णाजी याना तसा अनुभव आला असावा म्हणून त्यांनी तसे म्हटले आहे.
                    सन 1944 सालीं प्रसिध्द झालेल्या कुलवृत्तांताच्या पहिल्या आवृत्तीत पान नं. 356 वर कुलधर्म आणि कुलाचार मध्ये काळभैरव हा दुय्यम दर्जाचा देव असल्याचे नमूद केले आहे.  परंतु हे चुकीचे असावे.  कारण  श्री काळभैरवाचे स्तोत्र व अष्टक पाहिले असता तो दुय्यम दर्जाचा नसल्याचे लक्षात येते.  शिवाय  श्री शनिदेव स्तोत्रात लहिले आहे की, शनिदेव काळभैरवाची पूजा करतात.  तो श्लोक असा --
शनैश्चराची मूर्ती काळी । तो जातीचा होय तेली ।।
चरण पंगु, सुरत चांगली । पूजा करी काळभैरवाची ।।57।।  (शनि स्तोत्र)
                    स्कंदांनी अगस्ती ऋषींना जी कथा सांगितली ती भक्त कवी मिलद माधव यांनीं सांगितली आहे. ती काळभैरव वरद स्तोत्र रूपाने (भूतबाधा निवारणार्थ) प्रसिध्द आहे.  श्री काळभैरव हा शिवाचा अंशावतार आहे.  तो काशी क्षेत्रात तेहत्तीस कोटी देवांचे रक्षण करण्यास उभा आहे.  श्री काळभैरवाचे दर्शन घेऊनच इतर देवांचे दर्शन घेतात.  मी वाराणसी येथे श्री काळभैरवाच्या देवळात गेलो होतो.  हे घरचे कुलदैवत असल्याने तेथे  काय चाली-रीती आहेत ते पाहिले.  तेथे नेहमी काळभैरवाची पूजा होते.  काळभैरवास 108 उडदाच्या डाळीचे वडे ह्यांची माळ करून घालावी लागते.  मी सहकुटुंब काळभैरवाची पूजा केली व वड्यांची माळ घातली.  उत्तर हिंदुस्तानात काहीकडे श्री काळभैरवाची देवळे आहेत.  काहींकडे देवास सोमरस (दारू) दिली जाते तर काहींकडे मास खंडाचा नैवेद्य असतो.  ही पध्दत इतर लोकांच्या कडून आली असावी.  चित्पावनांच्या कडून नसावी असे वाटते.  अर्थात त्या त्या देवांना तसे मागणे घातलेले असते व त्याची पूर्तता केली जाते.  श्री काळभैरव स्तोत्रांत ''स्मशाना निलयाय् ते।" असे म्हटले आहे.  त्याचे राहणे स्मशानात असून तेथून तो 33 कोटी देवांचे रक्षण करतो.  त्यास स्मशानात राहणेस शिवाचा आदेश असावा. 
                    श्री शनिदेव यांचा देव काळभैरव असल्याने लोकांना शनिच्या साडेसातीचा त्रास कमी होतो.  पण ह्याकरितां श्री काळभैरवाची पूजा व्यवस्थित केली पाहिजे.  कार्तिक कृ. 8 दिवशी जयंती निमित्त विषेश पूजा केली तर उत्तम.
                    रामरक्षा म्हणून मुलांना अंगारा लावतात. त्याच प्रमाणे शुचिर्भूत होऊन विभूती घेऊन तिन्ही सांजच्या वेळी श्री काळभैरवाचे स्तोत्र म्हणावे.  समोर रोगी किंवा भूतबाधा झालेल्या व्यक्तीस बसवावे. स्तोत्र म्हणून झालेवर विभूती लावावी (रोग्यास किंवा भूतबाधा झालेल्या माणसास) असे ओळीने 11 दिवस केले असता रोग, भूतबाधा नाहीशी होते.  अस्ति कस्ति काळभैरव। असे लहून ठेविले तर ह्या नाममात्रे भूत-खेत, पिशाच्च, सर्प, विंचू ह्यांचे पासून रक्षण होते.
जपासाठी मंत्र  -  ॐ काळभैरवाय नमः ।
    संकलक
     श्री. रामचंद्र दत्तात्रेय काळे,
    (रिटायर्ड डेप्युटी तहसिलदार, कुंदगोळ, कर्नाटक.)